सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जय हिंद !!

पुण्यातील साळुंके विहार सर्वांना माहीतच असेल पण हे साळुंखे कोण आहेत ? हे कित्येकांना माहीत नाही.

पुण्यातीलच नाही तर साळुंखे विहारमधील देखील कित्येकांना याची माहिती नाही ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे.

तर चला जाणून घेऊया —

सांगलीमधील मणेराजुरीचा आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीचा महावीर चक्र विजेता पांडुरंग साळुंखे यांनी बुर्ज जिंकून दिले आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीला पंजाब थिएटर अवॉर्डसह बरेच काही मिळवून दिले.

सन १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या पश्चिमेकडील भागामध्ये, पंजाब सेक्टरच्या उत्तरेकडच्या भागू कमानपासून ते दक्षिणेकडील पुंगापर्यंतच्या महत्वाच्या पट्टयातील भिंडी, अवलक, बेहलाल, तेबूर, मेहरा, छागकला, गोगा, दुसीबंद, फतेहपूर या अत्यंत महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानी फौजांनी अचानक हल्ला केला.

३ डिसेंबर १९७१ रात्री ११.०० वाजता पाकिस्तानी सेनेतील अत्यंत कडवी समजली जाणारी बलुची पठाण रेजिमेंटच्या ४३ व्या बटालियनने प्रचंड संख्याबळाच्या ताकतीने आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रॉकेट लॉंचर, मशीन गन्स, तोफांनी भारतीय चौक्यांवर बेछूट हल्ला चढविला. त्या तुफानी हल्ल्यासमोर चौक्यांवर तैनात असलेले एइ चे जवान टिकाव धरू शकले नाहीत. आणि पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवला. पाकिस्तानी सैन्यांचा कब्जा असलेल्या उंचावरील चौक्या परत मिळविणे मोठे आव्हान होते. त्याठिकाणी डेरेदाखल असलेल्या पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनने आव्हान स्वीकारले. चौक्या सोडून आलेल्या “एइ” जवानांच्या मदतीने पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या जांबाज सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, कडव्या बलुच पठाणांच्या बलाढ्य सेनेवर मराठा सैनिक तुटून पडले. पंधरा मराठा बटालियनच्या वीरांनी केलेला प्रतिहल्ला (Counter Attack) यशस्वी करुन अनेक चौक्या परत मिळवल्या. आता दोन्हीकडील फौजा समोरासमोर होत्या दुसीबंद, बेहलोक, गोगा, उंचावरील चौक्यांवरून पकिस्तानी फौजांना खदेडणे कठीण काम होते. १५ मराठा खाली मैदानी भागात होती. मदतीला वैजंता  (विजयंता) रणगाड्यांचा ताफा होता. परंतु उपयोग नव्हता. कारण शत्रू उंचावर होता. त्यांचे रणगाडाभेदक रॉकेट लाँचर तैनात होते. भारतीय सेनेसाठी नैसर्गिक वरदान असलेल्या या चौक्या आता पाकी सैन्यांना वरदान ठरत होत्या.

१५ मराठा सैन्यांची नामुश्की पाहून पाकिस्तानी सैन्य जणू जशन साजरा करीत होते. हवेत गोळीबार करुन मराठा सैन्यांना हिणवत होते. आव्हान देत होते. नाचत होते. खाली तैनात असलेल्या १५ मराठा जवानांचे रक्त खवळत होते. पण आदेश मिळत नव्हता. माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डिसेंबरची सहा तारीख उजाडली. मोहीम प्रमुख मेजर रणवीरसिंग यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. तेव्हा माघार घेण्याचे संकेत मिळाले. परंतु अंतिम निर्णय मेजरसाहेबांवर सोडण्यात आला. मैदानातून माघार घेतील ते मराठे कसले ? दुसीबंद चौकीवर तैनात असलेले पाकिस्तानचे रॉकेट लाँचरचा मोठा धोका होता. अखेर एकवीस वर्षाचा जवान पांडुरंग साळूंखे याने पुढकार घेतला. मेजर साहेबांना म्हणाला, ‘ सर शत्रूच्या रॉकेट लॉंचरचा मी बंदोबस्त करतो. तुम्ही रणगाडेसह चाल करुन दुसीबंदवर ताबा मिळवा.’ त्याचा हा आत्मघातकी निर्णय कोणालाच पटला नव्हता. माघारही घ्यायची नाही. दुसरा पर्याय नाही.

शेकडो तानाजी, संभाजी अंगात संचारलेला पांडुरंग क्रॉलिंग करत, सापासारखा सरपटत खाचखळग्यातून मार्ग काढत दुसीबुंदच्या दिशेने निघाला होता. शत्रूच्या रॉकेट लाँचरवर कब्जा करायचा एकच ध्यास होता. शत्रूची नजर चुकवत चुकवत पांडुरंग उंचावरील अंतर कापत होता. क्रॉलिंगमुळे पोटावर हातापायावर जखमा झालेल्या. भारतीय सेना एवढ्या उंचावर येऊ शकत नाही अशी खात्री असल्यामुळे बलोची गाफील होते. खाली मराठा सैनिक माघार घेण्याच्या हालचाली शत्रूला जाणवत होत्या. पांडुरंग सरपटत सरपटत वरती पोहोचला. संध्याकाळी पावणेसातची वेळ, थकव्यामुळे डोळ्यावर अंधारी येत होती. थंडीतही घशाला कोरड पडलेली. पाण्याचा घोट घ्यायला वेळ नव्हता. एक एक क्षण महत्वाचा होता. पांडुरंगने संध्याकाळच्या संधीप्रकाशातही शत्रूचे रॉकेट लॉंचरची पोस्ट हेरली. शत्रू काही प्रमाणात गाफील असला तरी रॉकेट लाँचरचा ऑपरेटर सावध होता. अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून पांडुरंगने रॉकेट लाँचरधारी बलोची आडदांड पठाण सैनिकावर प्रहार केला. अचानक झालेल्या प्रहाराने बलोच कोसळला. एक क्षणही वाया न घालवता पांडूरंगने रॉकेट लाँचरचा ताबा घेतला. आणि शत्रुच्याच दिशेने बार उडवला. (धडाम धूम) खाली मेजर साहेबांना हा इशारा होता. वर दुसीबुँद चौकीवर एकच खळबळ माजली. दुसीबुद चौकीवर पाक सैन्यानी पांडुरंगला घेरला. जास्त लोकांनी चौकीवर चढाई केली असावी असा त्यांचा समज झाला. म्हणून बलोची पठाणांची धावपळ चालूच होती. याच संधीचा फायदा घेऊन विजयंता रणगाड्यांचा ताफा दुतर्फा धुरळा उडवत, आग ओकत आगेकुच करीत सुसाट निघाला. पांडुरंगने रॉकेट लाँचर खाली फेकले होते. दुसीबुंद चौकीवर पांडुरंगला पाकिस्तानी सैन्यांनी चारही बाजूने घेरले. एकटा पांडुरंग आणि अनेक पाकिस्तानी सैन्य तुंबळ युद्ध चालू होते. इतक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी दुसीबुद चौकी हादरुन गेली. १५ मराठा बटालियनचे मावळे दुसीबुंदच्या गडावर पोहोचले. दोन्ही सैन्य समोरासमोर, गुत्तम गुत्तीच्या या लढाईत मराठ्यांच्या प्रतिहल्ल्यासमोर कडव्या बलोची पठाणांनी नांगी टाकली. हत्यारे टाकून पाकिस्तानी सैनिक पळाले. कित्येकांना मराठ्यांनी ठार केले. कित्येक पळता पळता रावी नदीत बुडाले. तर सुमारे दोनशे बलोची पठाणांच्या प्रेतांना वीर मराठ्यांनी रावीच्या पात्रात जलसमाधी दिली. शिवाय दोन ट्रक पाकिस्तानी सैन्यांची हत्यारे, दोन RCL गन माऊंट असलेल्या जीप गाड्या ताब्यात घेऊन, पंधरा मराठा जवानांनी एक विक्रमच केला. इकडे पांडुरंग बाळकृष्ण साळुंखे या अवघ्या एकवीस वर्षीय योध्याच्या शरीराची चाळण झाली होती. अखेरची घटका मोजताना मोहिम फत्ते झाल्याच्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून पांडुरंग वीरगतीस प्राप्त झाला.

शहीद पांडुरंग साळूंखे यांच्या शौर्याला महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सन्माननीय महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते हा शौर्य पुरस्कार वीरमाता श्रीमती सुंदराबाई बाळकृष्ण साळुंखे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्कालिन प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी यांनी मणेराजुरी गावात महावीरचक्र विजेता शहिद पांडुरंग साळूंखे यांच्या घरी जाऊन वीरमाता सुंदराबाई यांच्या गळ्यात पडून त्यांचे सांत्वन केले. आज मणेराजुरीच्या चौकात शहीद पांडुरंग साळूंखे यांचा पुतळा बसविला असून दरवर्षी सहा डिसेंबरला मराठा रेजिमेंटचे अधिकारी मिलीटरी बँडसह संचलनाद्वारे शहीद पांडूरंग साळुंखे यांच्या पुतळ्याला महावीर चक्र घालून मानवंदना दिली जाते.

बेळगावला मराठा रेजिमेंटच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा त्यांचा पुतळा आहे. मणेराजुरी येथील शाळा कॉलेजला सुद्धा शहीद पांडुरंग साळूंखे यांचे नाव दिले आहे. या धनघोर युद्धात पंधरा मराठा बटालियनला बुर्ज बटालियन हा किताब मिळाला, तर बेस्ट बटालियन म्हणून सन्मान ट्रॉफीने पंधरा मराठा लाइट इंफन्ट्रीला गौरविण्यात आले. या लढाईत बटालियनचे अकरा जवान शहीद झाले. मेजर रणवीरसिंगसह पाच जवान जखमी झाले.

एक महावीर चक्र, चार वीरचक्र, तीन सेना मेडल, दोन मेशन इन डिस्पॅच, असा पंधरा मराठा बटालियनचा शौर्याचा इतिहास आहे. पाकिस्तानची सर्वात कडवी समजली जाणारी ४३ बलोच रेजिमेंटचा असा दारुण पराभव मराठ्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानने ४३ बलोच रेजिमेंट रद्द केली.

जय हिंद !

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments