डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???) इथून पुढे —-

बाबांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं…. 

गेले आठ महिने अंघोळ नाही, संडास लघवीवर कंट्रोल नाही आणि त्यामुळे ती कपड्यातच होते, बाबांच्या घरातल्या लोकांनी त्यांची जरी साथ सोडली तरी सुद्धा रस्त्यावरच्या किड्यांनी, माशांनी बाबांची साथ सोडली नव्हती…. ते त्यांच्या डोक्यात आणि हाता पायावर, चेहऱ्यावर मुक्तपणे फिरत होते…!

आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा, असं तर या कीड्या आणि माशांना सांगायचं नसेल ? 

…… अडचणीत साथ सोडणारे घरातले आपले ? की संकटाच्या काळात सोबत करणारे हे किडे आणि माशा आपले ?? आपण अडचणीत सापडलो की लोक हात पकडण्याऐवजी आपल्या चुका पकडतात हेच खरं…. ! 

ज्या दिवशी बाबा मला आठ महिन्यांपूर्वी शेवटचे भेटले होते, त्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा आणखी एक झटका आला होता. ते आता जास्त हालचाल करू शकत नव्हते आणि म्हणून ते एकाच ठिकाणी पडून राहिले….

रस्त्यावर भेटलेल्या अनेकांना त्यांनी माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवा असे सांगितले, परंतू आठ महिन्यात एकाही माणसाने माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवला नाही….

रोजच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकावं…. त्यानंतर मी रस्ता बदलावा…. तिथेही पुन्हा ट्रॅफिक मध्ये मी अडकावं…. मला हे बाबा दिसावेत…. ही निसर्गाची योजना होती ! 

बाबांशी बोलत होतो, परंतु डोक्यात विचारांची गर्दी झाली….

काय करता येईल या बाबांचे ?  यांचे आत्ता आधी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे गरजेचे आहे… त्याआधी यांना संपूर्ण स्वच्छ करायला हवं… ! पुढे बघू नंतर जे सुचेल ते करू…

काही एक विचार करून, मी बाबांना म्हणालो, “ बाबा आज आत्ता शनिवारचा दुपारचा दीड वाजला आहे, मला उद्याचा दिवस द्या…. सोमवारी सकाळी दहा वाजता मी परत इथे येतो… ! “

खरंतर बाबा अतिशय गंभीर अवस्थेत होते…. त्यांना त्याच वेळी ऍडमिट करणे गरजेचे होते, परंतू कायद्याच्या चौकटीत राहून अनेक बाबी करणे अपरिहार्य असतं, आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता….!

बाबांना मी दोन पंप दिले … दर पंधरा मिनिटांनी ते पंप ओढायला सांगितले…. आठ महिने जगलात तसे आता सोमवार सकाळी दहा वाजेपर्यंत जिद्द सोडू नका, असं सांगून मी तिथून पुढल्या बाबी करण्यासाठी निघणार, इतक्यात बाबांनी मला खुणेने बोलावलं…. खूप मोठ्या मुश्किलीने ते बोलले…. “ काळजी करू नकोस , तू येईपर्यंत मी मरणार नाही…. अरे, डोळे मिटले म्हणून कोणाला मरण येत नाही…. चार चौघांनी आपल्याला खांद्यावरून खाली ठेवलं… बाजूला केलं की येतं ते मरण ! “ बाबांचा रोख त्यांच्या कुटुंबावर होता….! खरं होतं बाबांचं …. मी आता तिथून निघालो…  

शनिवार रविवार आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या… मनीषाने बाबांची पूर्ण बॅग भरली… साबण, टूथपेस्ट पासून अंडरपॅन्टपर्यंत तिने सर्व तयारी केली…न पाहिलेल्या बापाची ती मुलगी झाली होती…!  मी दाढी कटिंग चे सामान तयार ठेवले…. ‘मंगेश वाघमारे’, माझा सहकारी, याला आवश्यक त्या सर्व सूचना देऊन, सोमवारी सकाळी दहा वाजता स्पॉटवर येण्यास सांगितले…. 

रविवारची अख्खी रात्र तळमळण्यात गेली….अतिशय गंभीर अवस्थेत असलेले हे बाबा मी जाईपर्यंत जाणार नाहीत ना… ? ते असतील ना ? मी जाईपर्यंत राहतील ना ? या विचारात पहाटेचे साडेचार वाजले….

एखाद्याची जबाबदारी मनापासून घेतल्यानंतर… ती व्यक्ती पूर्णतः आपल्यावर विश्वास ठेवते… एखाद्याचा हा विश्वास जपण्यात जीवाची किती ओढाताण होते, हे मी शब्दात काय सांगू ??? 

आणि प्रश्न इथे एका बापाचा होता…. ! 

सोमवारी सकाळी लवकर सर्व तयारीनिशी मी गडबडीत निघालो,  लिफ्टमध्ये सर्व सामान घेऊन जाताना मनीषा म्हणाली, “ अरे अभिजीत गडबडीत तू बूट किंवा चप्पल घातलीच नाहीस…” – च्याआयला , गडबडीत खरंच मी पायात काही घातलं नव्हतं…

यानंतर मी पायात बूट अडकवला पण जाणीव झाली, ज्या बापासाठी चाललो आहे, त्या बापाच्या पायात सुध्दा काही नाही… मग जाताना यांना एक बूट घेतला ! हे सगळं करून स्पॉटवर जाईपर्यंत मला अकरा वाजले…. 

मी त्या स्पॉटवर पोहोचलो…. परंतु त्या स्पॉटवर कोणीही नव्हते… ज्या स्पॉट वर बाबा राहत होते तिथे मी पोहोचलो, तेव्हा मला फक्त त्यांचे रिकामे अंथरूण दिसले…. इतर काही साहित्य दिसले … पण बाबा दिसले नाहीत…!

 

हे सर्व पाहून माझं अवसान गळालं… सोमवार पर्यंत सुध्दा बाबा माझी वाट पाहू शकले नाहीत…. ते गेले, या विचाराने माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली…

 

आणि तितक्यात मला एक आवाज आला…” सर आम्ही इकडे आहोत…” . हा आवाज मंगेशचा होता…!

मी वळून पाहिलं…. आमच्या मंगेशने या बाबांना घाणीतून बाहेर काढून दुसऱ्या स्वच्छ ठिकाणी ठेवलं होतं , म्हणून मला ते जुन्या ठिकाणी दिसले नाहीत..!… क्या बात है…! 

मी सुखावलो होतो… मी येईपर्यंत जीव सोडू नका, असं मी माझ्या बापाला सांगून आलो होतो…. आज माझ्या बापानं माझा शब्द पाळला होता….मी खूप आनंदी होतो….

आज मी ऍम्ब्युलन्स आणली होती…. माझा बाप आज जिवंत आहे या आनंदात…. त्यांनी माझा शब्द पाळला या खुशीत,  मी मस्त राजेश खन्ना स्टाईलमध्ये गाडीतून टुणकन खाली उडी घेतली… रजनीकांत स्टाईलने मी गाडीची किल्ली माझ्या बोटाभोवती फिरवत, बच्चन स्टाईलने चालत बाबांजवळ पोहोचलो … ! 

हो…. माझ्या बापाने आज शब्द पाळला होता…. मी  येईपर्यंत तो जगलेला होता… ! निसर्गाने त्यांना जगवलं होतं….

मी लय खुश होतो राव …. इलेक्ट्रिकच्या खांबाच्या आधाराने या बाबांना बसवून आधी मी या बाबांची दाढी कटिंग केली… इलेक्ट्रिकचा खांब लाईट द्यायला नाही, परंतु कोणाच्या आयुष्यात प्रकाश पाडायला आज प्रथमच उपयोगी आला असावा….! 

माझ्या अंगावर ॲप्रन ….गळ्यात स्टेथोस्कोप आणि फुटपाथवर बसून मी रस्त्यावरच्या गलिच्छ दिसणाऱ्या माणसाची दाढी करतो आहे….

मला पाहणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं…!  हा नेमका डॉक्टर आहे की न्हावी आहे  ??? 

मी मात्र डॉक्टर आणि न्हावी या दोन तीरांच्या मध्ये असलेल्या “माणूस” नावाच्या “पात्रात” डुंबून, न्हाऊन निघत होतो…. ! असो….

यानंतर संडास आणि लघवीने भरलेले कपडे काढून मी फेकून दिले…. बाबा आता पूर्ण उघडे – नागडे झाले रस्त्यावर…. ते थोडे शरमले…. ! नागड्या बाबांना पाहून, इथे मला माझ्या मुलाची, सोहमची आठवण झाली, जन्मला तेव्हा नर्सने तो असाच उघडा नागडा माझ्या ओंजळीत त्याला दिला होता…. !

आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!! 

— क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments