? इंद्रधनुष्य ?

☆ बाहुलीचा हौद — लेखक : अज्ञात☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

 भाऊबीज… स्त्री पर्वात ‘सण’ म्हणून या दिवसाला खूप महत्त्व.

पण स्त्री इतिहासात या दिवसाला अजून एक महत्व आहे…

…आज ह्या दिवशी, म्हणजे या तिथीला… पुण्यनगरीत जवळपास १७५ वर्षापूर्वी या दिवशी एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली…ती म्हणजे… बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण.

काय आहे हा बाहुलीचा हौद ? बाहुली कोण? या हौदाचे एवढे महत्व का ?… सांगते...

मी स्वतः इतिहासाची विद्यार्थिनी…

कॉलेजमधे असताना महात्मा फुले यांचे चरित्र अभ्यासताना, कुठेतरी वारंवार डॉक्टर विश्राम घोले यांचा उल्लेख यायचा. ते फार मोठे शल्यविशारद होते. ते माळी समाजातील बडे प्रस्थ. ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते… ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. आणि त्याहीपेक्षा मह्त्वाचे म्हणजे ते सुधारक होते.

महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन  त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.

सुरुवात आपल्या घरातून करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली… हिला शिकवण्यास सुरुवात केली.

बाहुली… खरोखरच नावाप्रमाणे बाहुली. वय अवघे ६-७. अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत… बाहुलीच्या शिकण्याला डॉक्टर घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलाना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती.  किंबहुना त्यांचा याला प्रखर विरोध होता.

अनेकदा डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.

शेवटी ……. 

काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी … काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला… अश्राप पोर ती…काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली… 

… बाहुलीचा मृत्यू झाला… स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी.

आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉक्टर घोले यांनी बाहुलीचा हौद बांधला, आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे… पण  इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्युच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.

काळ बदललाय. कालपटावरील आठवणी धूसर झाल्यात. डॉक्टर विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावत पळत असतो. पूर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेलीये. फरासखाना पोलीस चौकीसुध्दा आता कोपऱ्यात अंग मिटून बसलीये… आणि त्या फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात बाहुलीचा हौद…  इतिहासाचा मूक साक्षीदार….स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून उभा आहे…

बाहुलीचा फोटो मला खूप शोध घेतल्यावर इतिहास संशोधक मंडळातील एका जीर्ण पुस्तकात साधारणपणे सहा वर्षापूर्वी सापडला…

… आज बाहुलीची आठवण … कारण आजचा तो दिवस …

तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या हौदाचा आजच्या दिवशी लोकार्पण सोहळा झाला होता… स्त्री शिक्षणासाठी आत्माहुती देणाऱ्या बाहुलीच्या निरागस सुंदर स्मृतीस मनोभावे वंदन.

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments