सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग २ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

मागील भागात  आपण पाहीलं – महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय… आता इथून पुढे 

‘अनुरोध … नाही… श्रीमान अनुरोधजी,

मी जात आहे. आपल्याला काही संधी मिळावी आणि आपण मला बाहेर काढावं, त्यापूर्वी मी स्वत:च निघून जातेय. बस… इतक्याच दिवसाची माझी आणि आपला साथ होती.आता आणखीन मी आपल्या सोबत राहू शकत नाही. क्षणभरसुद्धा नाही.

मी कुठे गेलीय, जाणून घेऊ इच्छिता? घ्या. मीच सांगते. आईकडे जातेय मी. चिता करू नका. अंधेरी ते पनवेल मी जाऊ शकते. आईकडे अशासाठी की ती जागा सुरक्षित आहे. आपण तिथे येणार नाही. माझ्या बाबांचं ( आपले सासरे होते पण आपण नेहमीच त्यांच्याशी शत्रू असल्यासारखे वागलात. ) निधन झालं, तेव्हा वाटत होतं, कदाचित याल आपण पण आपण घरी नाही, थेट स्मशानभूमीत आलात. तिथे येऊन आपण आपला मूल्यवान वेळ का खर्च केलात कुणास ठाऊक? बिझनेस सुरू करण्यासाठी सासरे पाच लाख रुपये देऊ शकले, नाहीत, तर त्यांच्या इंजिनिअर जावयाने त्यांच्या दाह संस्काराला कशाला जावं?डिलिव्हरीसाठी मी माहेरी गेले होते.बंटीला घेऊन परत आले, तेव्हापासून आपण माझा माहेराशी असलेला संबंध नेहमीसाठी तोडून टाकलात. एक-दोनदा बाबा इथे आले होते, या फ्लॅटवर  पण आपण त्यांच्याशी असे वागलात, जसा कुणी एलियन घरात शिरलाय.

आज बंटी तीस वर्षाचा आहे. कुठे आहे बंटी? माझा मुलगा…

मला अजूनही बेड रूममधून आवाज येतो. ‘बाबा दरवाजा उघडा ना!’

‘बाबा, मी अर्ध्या तासासाठी बाहेर येऊ इच्छितो. प्लीज… मला गुदमारायला होतय इथे.’   ‘पंखा वाढव. अशाने इंजिनीअर कसा बनशील? टॉप करायचाय तुला. मी जे करू शकलो नाही, ते तुला करून दाखवायचय. आपल्या नातेवाईकात कुणीच केलं नाही. असं काही तरी तुला करून दाखवायचय.’

करून दाखवलं त्याने. बोर्डात अव्वल नंबरने पास झाला. पिळाणीतून इंजिनीअर केलं. पण आपण त्याला एका क्षणासाठीसुद्धा मोकळा श्वास घेऊ दिला नाहीत. परिणाम काय झाला? ‘

कुठे गेला बंटी?’

‘मला माहीत नाही.’

‘अशी नाही सांगणार तू!’

‘…..’

‘बोल. कधीपासून तिथे जात होता?आता काय सांगून गेलाय? असं कसं जाऊ दिलास तू त्याला?त्याच्या शिक्षणावर माझे किती तरी लाख खर्च झाले. माझी सगळी स्वप्नं चूर चूर झाली.

आपले पैसे… आपली स्वप्ने… मला पहिल्यापासून माहीत होतं, तो इस्कॉन मध्ये जाऊन तासण तास बसतो. तिथे त्याला शांती, समाधान मिळतं. त्याने आपल्यासाठी चिठ्ठी ठेवली होती ना?

‘बाबा मी जातोय. आत्तापर्यंत आपण जे सांगितलंत ते मी ऐकलं. इच्छेने, अनिच्छेने. आपण आता काही सांगू नका. कारण आता मी आपलं ऐकणार नाही. मी माझा रास्ता शोधलाय. आपण त्याला मारमारून ‘हिरा’ बनवू इच्छित होता.  आपल्याला मारणच तेवढं येतं॰ तासणं, कोरणं नाही. मी माझा मुलगा गमावला. पण बंटी वाचला. आपल्या पकडीतून सुटून स्वामी श्रीपाद बनला. कुणा नशेड्याची आई बनण्यापासून देवाच्या दयेने मी वाचले.

लकने आपल्या जीवनाचा जोडीदार स्वत:च निवडला. काय करणार? आपल्याकडे वेळ कुठे होता तिच्यासाठी? अमेयला घेऊन आपला आशीर्वाद मागण्यासाठी आली होती नं? आपण तिला आपल्या नजरेपासून दूर व्हायला सांगितलंत. काय कमी आहे अमेयत? एका बॅंकेत अधिकारी आहे. जात वेगळी आहे. एवढाच. पण इतकंच नाही.. यापेक्षाही काही जास्त आहे. आणिते आहे आपला अहंकार. आपल्या परवानगीशिवाय, या घरात दुसर्‍या कुणाला श्वास घेण्याची परवानगी नाही. सीझर झाल्यानंतर पुलक सिरीयस झाली होती. त्यासाठी अमेयचा फोन आला होता. माझं रक्त मॅच होत होतं, म्हणून दिलं. धावपळ करत आपण येण्यापूर्वी घरी आले. सगळी परिस्थिती मी आपल्याला सांगितली. पण काय म्हणालात आपण?

‘मरू द्यायचं होतं तिला. आता ती काही माझी मुलगी नाही. ती माझी कोणीच लागत नाही.’  

‘पण माझी मुलगी आहे. मुलाला गमावलं. कमीत कमी मुलगी तरी हिसकावून घेऊ नका. ‘

उत्तरादाखल कमरेचा बेल्ट साप बनून मला डसू लागला. पाठीवर, कमरेवर उमटलेल्या खुणा हळू हळू  अस्पष्ट होऊ लागल्या. पण काळजाला झालेली जखम दिवसेंदिवस खोल खोल चरतच गेली.

पुलकने पुनीतचा पाचवा वाढदिवस साजरा केला. किती आग्रहाने बोलावलं होतं त्यांनी आपल्याला. कुठल्या आजीला वाटणार नाही की एका शहरात असलेल्या आपल्या नातीला भेटावं? तेदेखील पाच वर्षांनंतर? पण आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही. …. अमेयचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. हॉस्पितलमधून फोन आला होता. आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही.माझी आई  ब्याऐशी वर्षाची आहे.एकटी रहाते. जायचं तर दूरच आपण तिच्याशी फोनवर बोलण्यालासुद्धा नकार दिलात. भाऊ याच शहरात राहतो. त्याच्या मुलाचं बारसं, घराची वास्तुशांत… अनेक कार्यक्रम झाले त्याच्याकडे. त्याने प्रत्येक वेळी बोलावलं. आपण नाही म्हणालात, त्यामुळे गेल्या बाबीस वर्षात मी त्याच्या घरी गेले नाही. त्याबद्दलही फारसं काही नाही. पण परवा आपण जे केलंत, ते अगदी असह्य झालं मला.

भावाच्या मुलाचा विवाह होता. मी आपल्याला सांगितलं, ‘त्याच्या घरातलं हे शेवटचं कार्य आहे.सगळे लोक, नातेवाईक येतील. किती तरी वर्षांनंतर माझी सर्वांशी भेट होईल. संध्याकाळी परत येईन.’

आपण म्हणालात, ‘’खबरदार जर घराच्या बाहेर पडशील तर’

‘फक्त यावेळेला जाऊ दे. एकदा डोळ्यांनी सगळ्यांना बघीन. मग पुढे आयुष्यात कधीही…’

‘गेलीस, तर परत येऊ नकोस. या फ्लॅटचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद झालाय, असा समज. मी तीन दिवसांनी चायनाहून परत येईन. गेलीस, तर लॅच बंद करून चावी आत टाकून जा. चावी मिळाली नाही, तर मी तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट करीन.’[

माझी तडफड झाली. अश्रूंची जशी झडी लागली. आणि आपण रात्री घरी उशिरा परत आलात. का? मला ‘चेक’ करण्यासाठी. माझी उत्कट इच्छा पाहून आपल्याला वाटलं होतं की आपण किती का नाही म्हणा ना, मी लग्नाला जरूर जाईन. आपण चायनाला जाणार असल्याचा मी जरूर फायदा उठवीन आणि आपण माझी चोरी पकडाल. जर मी तसं केलं असतं, तर आपण काय केलं असतंत? मला घराबाहेर काढलं असतंत, हेच नं? पस्तीस वर्षांचा माझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या काळजाच्या तुकड्यांची, माझ्या मुलांचीसुद्धा पर्वा केली नाही. त्याचं हे फळ मिळालं मला. अनुरोधजी, चोरी मी पकडलीय आपली. आपल्याला त्या दिवशी चायनाला जायचच नव्हतं. त्या दिवशी आपला कुठेही बाहेर जायचा कार्यक्रम नव्हता. मला छ्ळण्यासाठी आपण हा खोटा बहाणा केला होतात. दिवसभर इथेच आपली मीटिंग होती. आपल्या ऑफीसमधून आलेल्या एका फोनमुळे माझ्या सगळं लक्षात आलं. आपला विश्वास मिळवण्यासाठी आता डावावर लावायला माझ्याकडे काहीही नाही. एवढं मात्र जरूर सांगेन की जो स्वत:वरचाच विश्वास गमावून बसलाय, तो दुसर्‍यावर विश्वास कधीच ठेवत नाही.

आपल्या शब्दात- मी म्हणजे घरात रहाणारी एक नालायक, निरुपयोगी बाई

– o –

अनुरोधने पत्र वाचून ते सेंटर टेबलवर असं भिरकावलं, जसं काही पेपरबरोबर आलेला कागदाचा फालतु तुकडा आहे. आता ते ड्रॉइंगरूमची खिडकी उघडून बाहेर बघू लागले. बाहेर रस्त्यावरून अनेक वाहने वेगाने धावत होती. अनुरोधला वाटलं, त्याची कार या धावणार्‍या वाहनात पुढे आहे. सर्व वाहनात त्यांची कार सगळ्यात पुढे आहे. एवढ्यात त्यांची कार अचानक थांबली. कुणी तरी हवाच काढून घेतली, त्यांच्या कारच्या चारही चाकांमधली. क्षणभरासाठी रस्त्यात चक्का जाम झाला. पण दुसर्‍याच क्षणी त्यांच्या कारच्या बाजूने रास्ता काढत सगळ्या वाहनांनी आपापला वेग घेतला.

– समाप्त

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments