विविधा
☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे
मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे
बाहर उजाला है, अंदर विराना
एखाद्या गाण्यातल्या काही ओळी आपल्याला आतून बाहेरून हादरून सोडतात, तशा या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा मी या ओळी ऐकतो तेव्हा तेव्हा मी आतून बाहेरून हादरून निघतो. पुन्हा पुन्हा या ओळींचा विचार करतो. सभोवतार काय चालले आहे पाहतो, वृत्तपत्रातील मथळा वाचतो, टिव्हीवर मुख्य बातम्या ऐकतो आणि पुन्हा या ओळींकडे येतो. अनेकांच्या कहाण्या या ओळींशी मिळत्या जुळत्या सापडतात. अगदी माझ्या आयुष्यातील काही काळ काही क्षण या ओळींशी मिळते जुळते सापडतात.
सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी लिहिलेले गीत आहे हे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिले आहे तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीकेचा राष्ट्रीय पुरस्कार या गाण्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याला मिळाला.
आपल्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा कोणीच सोबत नसल्याची भावना होते, अगदी परमेश्वरसुद्धा आपल्यावर रूसून बसला आहे की काय असे वाटू लागते. नेमक्या याच भावनेला गुलझार यांनी शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे – पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे. या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांशी आपण आतून सहमत असतोच असे नाही पण तरीही हे निर्णय घेतोच. याच अवस्थेचे वर्णन करताना गुलझार म्हणतात – मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे. म्हणजे माझ्या सावलीनेही आता माझी साथ सोडली आहे.
बरे हे सगळे घडत असताना आजूबाजूचा सर्व समाजच दुःखी असतो का तर नाही. सुख दुःखाचे गणित न्युटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. जेव्हा एक दुःखी असतो, तेव्हा दुसरा कोणी सुखी असतो. काळाचे चक्र फिरत राहते आणि पहिला सुखी होतो तर दुसरा दुःखी होतो. पण या संक्रमणात आपल्या मनात मात्र वादळे उठतात. कारण बाहेर कोणी दसरा दिवाळी करत असताना आपल्या मनात मात्र सुतक चालू असते. या कडव्याचे शेवट याच भावनेतून गुलझार यांनी केले आहे – बाहर उजाला है, अंदर विराना. बाहेर सगळीकडे उजळलेले आहे, आनंदी आनंद आहे आणि माझ्या आतमध्ये मात्र अंधार आहे, माझा आतमध्ये जणू ओसाड वाळवंट पसरलेले आहे.
तसे पाहिले तर संपूर्ण गाणेच भारी आहे. त्याला हृदयनाथजींच्या संगीताने सोन्याचेकडे लाभले आहे तर लतादीदींच्या स्वरांनी हे गाणे स्वर्गीय केले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे गाणे ऐकलेच असेल. माझ्यासाठी पुन्हा ऐका.
लेखक : म. ना. दे.
(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈