श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 170
☆ हळदीचे अंग… ☆
एक कळी उमलली
तिचे गुलाबी हे गाल
ओलसर पुंकेसर
रक्तरंजित ते लाल
फूल तोडले हे कुणी
कसे सुटले माहेर
काय होईल फुलाचे
डहाळीस लागे घोर
आहे गुलाबी पिवळा
आज बागेचा ह्या रंग
हाती रंग हा मेंदीचा
सारे हळदीचे अंग
वसंताच्या मोसमात
पहा फुलाचे सोहळे
दिसे फुलाला फुलात
रूप नवीन कोवळे
नव्या कोवळ्या कळीला
वेल छान जोजावते
नामकरण करून
तिला जाई ती म्हणते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈