श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कल्याणमस्तु… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘आपले कल्याण देवच करीत असतो’ हा मनातला भाव ‘इदं न मम’ या भावनेतून उमटत असेल तर ते योग्यच आहे.पण आपल्या आयुष्यात खूप कांही चांगलं घडतं, आपल्याला यश मिळतं, आपल्या अपेक्षा पूर्ण होतात तेव्हा सर्वसाधारणपणे ‘माझ्या कष्टांचं फळ मला मिळालं, मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं’ हाच विचार उघडपणे व्यक्त केला नाही तरी ठळकपणे मनात असतोच. अडचणीच्या, संकटाच्या वेळी मात्र हिम्मत न हारता ती परिस्थिती स्विकारून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द महत्त्वाची असते.पण अशावेळी हतबल होणारे, देवानेच आपल्या मदतीला धावून यावे, अडचणींचा परिहार करावा यासाठी देव देव करणारेच अनेकजण असतात. आपल्या हातून एखादी चूक घडली तर देवानेच मला दुर्बुद्धी दिली अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन त्याचा दोष स्वतः स्विकारण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते. अशी माणसे यशाचं, उत्कर्षाचं श्रेय देवाला देऊन ही त्याचीच कृपा असं वरवर म्हणतही असतील कदाचित पण त्या त्यावेळी मनातला त्यांचा अहं मात्र  अधिकाधिक टोकदारच होत जात असतो.

माणसाच्या प्रवृत्तीचं हे विश्लेषण अर्थातच ‘कल्याण’ या शब्दाबद्दल विचार करत असतानाच नकळत घडलेलं. त्याला कारणही तसंच आहे.

‘कुणाचं कल्याण करणारे आपण कोण? परमेश्वरच खऱ्या अर्थाने कल्याण करीत असतो’ हे गृहित, कल्याण या शब्दाचे असंख्य कंगोरे सर्वांचे क्षेमकुशल ध्वनित करणारे आहेत हे आपण समजून घेतले तर ‘ कल्याण करणारे आपण कोण? ते परमेश्वरच करीत असतो’ हे गृहित मनोमन तपासून पहायला आपण नक्कीच प्रवृत्त होऊ.हे व्हायला हवे.अन्यथा ‘कल्याण हे ईश्वरानेच करायचे असते’ हाच ग्रह मनात दृढ होत जाईल.

‘कल्याण ‘या शब्दात लपलेले या शब्दाचे विविध छटांचे अर्थ आपल्यालाही आपल्या गतायुष्यातले अनेक क्षण पुन्हा तपासून पहायला नक्कीच प्रवृत्त करतील.

कल्याण म्हणजे क्षेम. कल्याण म्हणजे मंगल, कुशल शुभ. कल्याण म्हणजे भद्र, श्रेय, सुख आणि स्वास्थ्यही. आनंद, सौख्य, मांगल्य, बरं, भलं म्हणजेही कल्याणच. सुदैव, भाग्य, हित, लाभ, ऐश्वर्य,या शब्दांतून ध्वनित होणारं बरंच कांही ‘कल्याण’ या एकाच शब्दात सामावलेलं आहे. उत्कर्ष, भाग्योदय, अभ्युदय, भरभराट, प्रगती या सगळ्यांनाही ‘कल्याण’च अभिप्रेत आहे!

या वरील सर्व शब्द आणि अर्थ यांच्यामधे जे लपलेलं आहे ते ते आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर वेळोवेळी आपल्याला मिळालेलं आहेच. कांही क्वचित कधी निसटलेलंही. जे मिळालं ते माणसाला वाटतं आपणच मिळवलंय. पण ते मिळायला, मिळवून द्यायला, ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायला आपल्या आयुष्यात त्या त्यावेळी डोकावून गेलेले कुणी ना कुणी निमित्त झालेले असतातच. बऱ्याचदा हे आपल्या लक्षांत तरी येत नाही किंवा अनेकजण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तरी करतात. खरंतर त्या त्या वेळी निमित्त झालेल्या कुणाला विसरुन न जाता त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण जाणिवपूर्वक मनोमन जपायला हवी. ‘अहं’चा वरचष्मा असेल तर ती जपली जात नाहीच.आणि जे ही कृतज्ञता जपत असतात ते त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांची त्यांची अडचण दूर करायला अंत:प्रेरणेनेच प्रवृत्तही होतात. ही नेमक्या गरजेच्या वेळी आपल्या संपर्कात येऊन आपल्याला मदत करून जाणारी माणसं परमेश्वराची कृपाच म्हणता येईल.

‘त्यांच्या रूपाने परमेश्वरच मदतीला धावून आला ‘असा भाव जेव्हा कृतार्थतेने एखाद्याच्या मनात निर्माण होतो त्याचा हाच तर अर्थ असतो.

एखाद्या मनोमन कोसळलेल्या माणसाला आपण नकळत सावरणं, आपल्या कृतीने, आपुलकीने एखाद्याच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालणं हे त्या त्या व्यक्तिसाठी किती मोलाचं  असतं हे मला माझ्या आयुष्यातले सुखदुःखाचे प्रसंग आठवताना अनेकदा तीव्रतेनं जाणवतं.

खुशालीची, आपुलकीची पत्रं येणं,पाठवणं कालबाह्य झालेलं आहे. पण ती जेव्हा त्या त्या काळातली गरज होती तेव्हा ती गरज निर्माण झालेली होती  परस्परांबद्दल मनात जपलेलं प्रेम आणि आपुलकी यामुळेच. तिकडे सगळं ‘क्षेमकुशल’ असावं ही मनातली सद्भावना इतरांचं ‘कल्याण’ चिंतणारीच असायची.

आदरभावाने नतमस्तक होऊन नमस्कार करणाऱ्यांसाठी मनातून उमटणारा ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद आंतरिक सदभावना घेऊनच उमटत असल्याने खऱ्या अर्थाने फलद्रूप होण्याइतका कल्याणकारी निश्चितच असायचा.

काळानुसार होणाऱ्या सार्वत्रिक बदलांच्या रेट्यात होणाऱ्या पडझडीमुळे हा सद्भाव त्याची आंतरिक शक्ती हरवत चाललाय असं वाटायला लावणारं सर्वदूर पसरु लागलेलं निबरपण  माणसाच्या मनातल्या हितकारक भावनाही निबर करत चाललाय आणि तोच ‘जनकल्याणाला’

सुध्दा मारक ठरत चाललाय हे आपल्या लक्षातही न येणं हाच सार्वत्रिक कल्याणातला मुख्य अडसर आहे.तो दूर होईल तेव्हाच ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद सशक्तपणे उमटेल आणि खऱ्या अर्थाने सफलही होईल!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments