डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ रक्तापलीकडचं नातं! — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“ रोहित,अंगणात  खेळत बसू नकोस रे.,केवढे ऊन झालंय बाळा ! आत ये,आणि आत येऊन खेळ. चल आपण पत्ते खेळूया.” रोहितला आजीने हाक मारली. शेजारची मुलं केव्हाच घरी गेली होती. वैशाखातले ऊन नुसते भाजत होते.

रोहितला घरी जावेसे वाटेना. त्याला सारखी त्याच्या आईची आठवण येत होती आज.

नकळत्या वयाचा रोहित. जेमतेम आठ वर्षाचा ! आजीआजोबा,आई बाबांबरोबर  किती सुखात आयुष्य जात होते.

मजेत शाळेत जावे, आईबाबांबरोबर मजा करावी, शाळेतही खूप मित्र होते रोहितला. त्याचे बाबा बँकेत आणि आई मात्र घरीच होती. बाबांना तिने नोकरी केलेली आवडायची नाही. आई किती सुगरण होती रोहितची. त्याच्या मित्रांना रोहितचा मधल्या सुट्टीतला डबा फार आवडायचा—- आत्ता पायरीवर बसून रोहितला हे सगळे आठवले.

पुण्यात राहिलेल्या रोहितला हे रत्नागिरीसारखे गाव मुळीच आवडले नाही. हे गाव बाबांच्या आईवडिलांचे.

त्याचे आजी आजोबा इथेच रहात. किती मोठी वाडी, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा,…. खूप मोठे घर होते आजोबांचे. आणि राघवमामा आणि मंजूमामी…  त्यांची मुलगी सई… सगळे खूप खूप प्रेम करत रोहितवर.

रोहित होताच शहाणा मुलगा. रत्नागिरीला रोहित आईबरोबर आला, तेव्हाचे दिवस आठवले त्याला. दर सुट्टीत रोहित आई बाबांबरोबर यायचा. आजीआजोबा खूप लाड करत. मामा, सई, समुद्रावर खेळायला घेऊन जात. सुट्टी संपली की पुन्हा पुण्याच्या घरी सगळे परतत… आजीने दिलेला खूप खूप खाऊ घेऊन.

रोहितच्या बिल्डिंगमध्येही खूप मित्र होते रोहितला.  त्या दिवशी रोहितचा वाढदिवस होता. ते सगळे मित्र आले होते मजा करायला. आईने कित्ती सुंदर पदार्थ केले होते. खूप छान साजरा झाला रोहितचा वाढदिवस.

दुसऱ्या दिवशी बाबा बँकेत गेले,आणि अचानकच खूप पोट दुखायला लागले त्यांचे. मित्रांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि आईला घरी  कळवले…..  त्या दिवसापासून रोहितच्या घरातले सुख जणू हरवून गेले.

बाबांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, आणि तो बरा न होणारा आतड्याचा कॅन्सर….. 

बाबांना नोकरीवर जाणेही अशक्य झाले आणि  बँकेतली सगळी पुंजी भराभर संपत आली. रोहितचे आजीआजोबा आले, आणि म्हणाले, “ नयना, आम्ही रोहितला घेऊन जातो काही दिवस. तिकडच्या शाळेत घालू त्याला. तू इकडे  एकटी काय काय काय बघणार? तू फक्त उमेशकडे लक्ष दे. तो  बरा होऊ दे. “

सगळ्या बाजूनी गोंधळून गेलेल्या रोहितच्या आईने उमेशला विचारले. तो आधीच इतका अशक्त आणि दुबळा झाला होता. हतबल झाल्यासारखा तो म्हणाला, “ नेत आहेत, तर नेऊ देत रोहितला आई बाबा.!.तू एकटी कुठेकुठे बघणार ग? मला माहित आहे,मी यातून बरा होणार नाहीये.पण निदान तुमचे हाल नकोत.” ……  आणि रोहित रत्नागिरीला आजी आजोबांबरोबर आला. तेव्हा तो फक्त पाच वर्षांचा होता !

दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. रोहितचे बाबा कालवश झाले आणि आईला बँकेत नोकरी मिळाली.

“ आई,मला कधी ग नेणार तू पुण्याला आपल्या घरी?”

“ रोहित, माझी नोकरी अजून नवीन आहे रे. अजून आपल्या फ्लॅटचे हप्ते भरायचे आहेत, आणि मला  बाबांच्या इतका पगार नाही रे राजा ! तुला तिकडे नेऊन तुझ्याकडे कोण लक्ष ठेवणार रोहित? थोडासा थांब ! मला तरी कुठे करमते रे तुझ्या शिवाय? “ आईने रोहितला जवळ घेतले आणि डोळे पुसत ती म्हणाली. 

रोहित समजुतीने म्हणाला “ बरं आई. पण लवकर ने हं मला ! नेहमी मला तुझी, बाबांची खूप आठवण येते.आणि माझ्या शाळेची, मित्रांची पण.”

त्या सुट्टीत आईने रोहितला पुण्याला नेले. रोहितला खूप आनंद झाला. तो सगळ्या मित्रांना भेटला, बिल्डिंगमध्ये जाऊन सगळ्यांना भेटला. काही दिवसांनी आईने मग भरल्या डोळ्यांनी रोहितला पुन्हा रत्नागिरीला पोचवले.

अशी चार वर्षे गेली.

नयनाच्या बँकेत कारखानीस म्हणून एक साहेब होते. त्यांची बायको नुकतीच कॅन्सरने वारली होती. त्यांना मूलबाळ  नव्हते. त्यांनी एक दिवस नयनाला विचारले, “ नयना,जरा वेळ आहे का तुम्हाला ? लंच ब्रेकमध्ये कॉफी घ्यायला याल  बाहेर?” 

“ हो ,येईन ना सर !”  नयना म्हणाली.

—  कारखानीस साहेब अतिशय  सभ्य, सुसंस्कृत होते. उमेशला ते ओळखत होते,आणि उमेश असताना काही कारणास्तव नयनाच्या घरी येऊनही गेलेले होते. नयना सहजपणे गेली कॉफी प्यायला.

कारखानीस म्हणाले,’,वेळ न घालवता मुद्द्याचेच बोलतो.माझ्याशी लग्न कराल का?—–

“ मी तुम्हाला परका नाही, आणि माझी बायको  कॅन्सरने गेलेली तुम्हाला माहित आहेच ! मी वयाने थोडा जास्त मोठा आहे तुमच्याहून, पण तुम्ही ठरवा काय ते “ त्यांनी थेट विषयाला हात घातला– “ मला माहित आहे तुम्हाला एक मुलगा आहे ते ! मला मुलांची खूप आवड आहे, पण दुर्दैवाने आम्हाला मूल झाले नाही. मी तुमच्या मुलाला नक्की  छान आपलेसे करीन. बघा, विचार करा.”

नयनाने शांतपणे हे ऐकून घेतले. “ मला विचार करायला वेळ हवाय सर. आता आपण नवथर तरुण उरलो नाही.

हे लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच असणार– हो ना? माझा मुलगा हे कसे घेईल मला माहीत नाही. मी विचार करून सांगते तुम्हाला.” 

नयना ऑफिसमध्ये परतली. तिच्या शेजारीच वसुधा– तिची बँकेतली जिवलग मैत्रिण बसली होती.

“ काय ग नयना, अशी चिंतेत का दिसतेस? काही झालंय का? मला सांगण्यासारखे नाही का? “

“ वसू, तसं काही नाही ग !” असं म्हणत हॉटेलमध्ये काय घडले ते नयनाने वसुधाला सविस्तर सांगितले.

“ नयना,उत्तम आहे खरंच ही संधी ! मी बघतेय ना,किती ओढाताण होतेय तुझी. कर्जाचे हप्ते, रोहितचा खर्च, सगळं काही तुला बघायला लागतं आहे. आणि ते अवघड जातेय तुला. साहेब फार सज्जन माणूस आहे. मला वाटतं तू 

याचा जरूर विचार करावास  आणि त्यांना ‘ हो ‘ म्हणावं. “ 

“ अग पण रोहितचं काय ? किती अडनिडं वय आहे गं त्याचं. आधीच आजी आजोबांकडे नाईलाजाने राहतोय तो.

पुढच्या शिक्षणासाठी मला तिकडे नाही ठेवायचंय त्याला.” 

यावर वसुधा म्हणाली, “ हे बघ नयना, असा किती दिवस तो तिकडे राहणार ग? आता त्याला तुझी खरी गरज आहे .

तू त्याला आता तुझ्या घरी आण यंदापासून… ऐक. हळूहळू मग होईल ग सगळं सुरळीत.” 

नयना  त्या मे महिन्यात रत्नागिरीला गेली. रोहितला म्हणाली, “ रोहित,तू आता माझ्याबरोबर पुण्याला चल.

आता तुझी सगळी महत्वाची  वर्षे सुरू होतील शिक्षणाची. तुला मी पूर्वीच्या शाळेत ऍडमिशन घेऊन देईन.

मी भेटून आलेय सरांना. मग काय म्हणतोस?” 

रोहितने आनंदाने उडयाच मारल्या. “आई खरंच? पण तुला सगळा खर्च झेपेल ना ग? इथे आजीआजोबा सारखे म्हणतात,‘ का राहिलीय तिकडे एकटी कोणास ठाऊक. यायचे की इथे. जळ्ळी मेली ती नोकरी, .! लेकरू इथे  ठेवलंय आणि राहिलीय तिकडे  एकटी.’ “ –रोहितने आजीची नक्कल केली.नयनाला हसू आले. “ रोहित,काळजी पोटी बोलते आजी तसे. पण तू नक्की आनंदाने येशील ना रे?” 

रोहितने आईला मिठी मारली. “आई, मी खूप शिकेन, मोठा होईन, मग बघ. तुला काही कमी नाही पडू देणार !”

नयनाच्या डोळ्यात पाणी आले.

— क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments