श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ हसताय ना! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा, ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार. चमत्कृतीचा ईनोद नि शाब्दिक कसरतीवर शारीरिक चमत्कारिक अंगविक्षेप अश्या अनेक क्लुप्त्या दाखवून हसायला लावणारे अनेक टि. व्ही. कार्यक्रम सतत चौवीस तास डोळ्याना सुखवत मुखाला हसवत असतात… दुसऱ्याच्या व्यंगावर (वर्मावर टिप्पणी करून) केलेला विनोदाला हसणे हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावच असतो नाही का? रस्त्यावरुन चालणारा अचानक पाय घसरुन पडला तर सगळया पहिले हासतो ते आपण… फजिती, विचका झाल्याचा विकृत आनंदच तो असतो आपल्या हास्यातून बाहेर पडतो.. पण ते का खरे निखळ हसणे असते..पू्र्वी सर्कस येत असत त्यात विविध जोकर उलट्या सुलट्या उड्या आणि कसरती द्वारे प्रेक्षकांना हसवत असत… मेरा नाम जोकर सिनेमा पाहिलेला तुम्हाला आठवत असेलच.. जो माणूस आतून खरोखर दुःखात बुडालेला असतो तोच चेहऱ्यावर आपलं दुख लपवून दुसऱ्याला जास्त हसवत असतो हे ही आपल्याला ठाऊक आहेच की… पण खरी गोष्ट अशी आहे की तो आपल्याला हसवत नसून तो आपल्या आतल्या दु:खावरच हसण्याचा उपाय करत असतो.. हसण्यासाठी जन्म आपुला हे वाक्य जो सतत जपत राहतो त्याच्या पुढे सगळी संकटे दु:ख चार हात लांबच राहू पाहतात. साहित्यिक हलके फुलके नर्म विनोद सगळ्या वाचकांना हसवत असतात, व्यंग चित्र, अभिनयातून साधलेले विनोद, ही सारी उदाहरणे निखळ हास्य निर्माण करतात.. ती अक्षर कलाकृती अक्षय आनंदाचं हास्य फुलवित असते. म्हणून आजही भाईंची सगळी पुस्तकं तेच हास्य देत असतात.. धीरगंभीर प्रवृत्तीच्या लोकांना विनोदाचं वावडे असल्याने ते तर कधीच हासत नाहीत नि दुसऱ्यालाही हसवत नाहीत.. पण काही काही वेळा तीच माणसं हसण्याचा विषय होउन बसतात… मग हिच माणसं टवाळा आवडे विनोद म्हणून हाकाटी पिटत बसतात…दैनंदिन जीवनातील कंटाळवाणे, नीरस धबगडयात मनोरंजनासाठी चार हास्याचे कण मिळावेत म्हणून तर सिनेमा,नाटक, टि. व्ही. वरील कार्यक्रम पाहिले जातात..तसं पाहिलं तर विनोदाला कुठलाच विषय वर्ज्य नाही..आदी नाही अंतही नाही… पण ताळतंत्र सुटलेला विनोद हास्य निर्माण करत नाही तर त्या विनोदाची कीव करायला लावतो… हसणं हा जन्मजात गुण मानवाला मिळालेला असून तो आबालवृद्धा़ना तितकाच हवाहवासा असतो..स्त्रियांवर तर विनोदाला कळस गाठला जातो.तसा नवरोजीही यातून सुटलेला नसतो बरं… थोडक्यात काय विनोदाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व स्पर्शी असल्याने ते ज्याला लुभावते तोच त्यातून हासू निर्माण करतो… स्वता हसतो नि दुसऱ्याला हसवतो..
… आताच्या काळात तो जूना शब्द प्रयोग ‘हसावे कि रडावे’ आता कुचकामी ठरला आहे.. आता फक्त हसतच राहावे असे वाटते…हल्लीचे राजकारण त्यात अग्रेसर आहे.. त्यामुळे सर्कस, सिनेमा, नाटक बंद पडली आहेत… एकापेक्षा एक धुरंधर विदूषक आपली विनामूल्य मनोरंजनातून हसवत असतात.. मेडिया त्याचं विस्ताराने प्रसिद्धी करण करत असतो, पेपर तर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पाना पर्यंत विनोदाची विविधता पेरूनच असतो..
… एव्हढी सगळी साधने तुम्हा आम्हाला सतत हसत राहा म्हणून कानीकपाळी ओरडून सांगत असताना आपण हसयाचं नाही?…टिआरपी वाढण्यासाठी तरी आपल्याला हसायला हवं ना?… मग
…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा, ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈