जीवनरंग
☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
चार दिवसांपासून दुपारचे ढग येत. खूप अंधारी येई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व पावसाचें सर्व अवसान कुठल्याकुठे निघून जाई. तिनें दोन दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार. घरांतला दाणादुणा संपत आला. उद्यांला खायला कांही नव्हतें, म्हणून ती जिवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच.
झोंपडीच्या छपराच्या एका झरोक्यांतून मधून मधून उजेडाची एक तिरीप येई. तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात तिचा तान्हा कितीतरी वेळ पडून राही. नेहमीप्रमाणे तिनें त्याला टोपलीत घालून त्या ठिकाणी ठेवला. त्याच्या भोवती गुंडाळलेले फडके आणखी नीटनीटकें केलें व ती बाहेर पडली. तिनें झोंपडीला कडी घातली व एकवार घराच्या भोवताली नजर फेंकून ती झपाझप निघाली. तिनें पोराला एकटें टाकले, पण वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्याइतका तिचा पदर तरी कुठे धड होता ?
बाजार गच्च भरला होता. वादळाच्या भीतीनें सर्वांची एकच धडपड चालली होती. आपल्याजवळ छत्री आहे, आपण टांग्यांतून जाऊं – ही चार पैशाचा दाणा घेणारी दुष्काळांतली भुतें कशाच्या आसऱ्याला उभी राहतील, असा विचार कोणाच्या मनांत येणार ? एकच धांदल व एकच कोलाहल उडून गेला होता. तशांत रोजचा वारा सुटला. पण तो आज एकटाच आला नाहीं. पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्याकुट मेघांच्या बाजूने तो आला व त्याची साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडातड् मारणारे टपोरे थेंबही आले.
पांच मिनिटांत सर्व जलमय होऊन गेले. मग पहिले अवसान ओसरलें, पण उघाडीचा प्रश्नच नव्हता. पाऊस पडतच राहिला. दोन अडीच महिने जिवाचे रान करून धरणीने वाट पाहिली. पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या अलोट प्रेमाने दिली. त्यामुळे तिचें मुख प्रसन्नतेनें खुलून गेलें. झाडांना टवटवी आली घरें छपरें स्वच्छ धुवून निघाली. रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहळ धावूं लागले. मुले बाळे ‘पाऊस- पाऊस’ करीत आपल्या ओसऱ्यातून, खिडक्यांतून गंमत पहात उभी राहिली. मोठ्यांचीही कविहृदये पावसाच्या त्या प्रसन्न, उदात्त दृश्याने फुलून गेली; पाण्याच्या निनादांत तन्मय होऊन गेली.
पण ती ? ती कुठे होती? तिचा बाजार झाला का? वादळाचा पहिला थेंब अंगावर पडतात ती त्या सरी इतक्याच वेगाने धावत निघाली . तिचे छबडे त्या झरोक्याखाली होते ना? एवढ्या प्रचंड झंजावाताने एकादे कौल उडवून दिले तर ? कुठेतरी थोडेसे छिद्र सांपडले की तिथे भगदाड पाडणें हे या राक्षसी वादळाचे कामच . तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे. तो रडूं नये म्हणून केवडा मूर्खपणा केला मी ?
तिला घर किती दूर वाटू लागले! जातांना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती. आतां तिच्या पायाखालची वाट सरेना. त्यांतच रस्त्यावर पाणी साचलेले. ‘ माझा बाळ निजला असेल का ? झरोक्यांतून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसें येईल त्याला. ‘
ती विचार करीत होती का चालत होती – रस्त्यावर होती का झोंपडीत बाळापाशी होती हे तिलाच कळत नव्हते. यंत्राप्रमाणे तिचे पाय रस्त्यावरचें पाणी तुडवीत धांवत होते. डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला. गालांवर केसावरचे ओघळ वाहू लागले. पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता. झपझप पावलांनी उडणाऱ्या चिखलांनी पोटऱ्या, पाठीकडले लुगडें भरून गेले.
दुरून तिला झोपडी दिसली. दार लागलेलेच होते. बाहेरून तर सर्व व्यवस्थित होतें. जवळपासचे वृक्ष डोलून डोलून थकले होते. पण एकदा गति मिळाल्यावर त्यांच्या लहान फांद्या व पानें अजून नाचतच होती. त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळाला किती आवडे !
तिने दार उघडले. झोपडीत उजेड जास्त झाला होता. एक कौल पडलें होतें. पण तें पलीकडे. बाळापासून दूर चार हातावर त्याचे तुकडे तुकडे झाले होते. तिचा जीव खाली पडला. “निजलं आहे गुणाचं,” असें म्हणून ती चटदिशी जवळ गेली. झरोक्यांतून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली ओली चिंब झाली होती. गारठ्यानें मुठी घट्ट आवळून खूप रडल्यानंतर थकून तो पडला होता. तिनें त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली. किती उत्सुकतेनें तो तिच्या उबेत शिरला ! तिच्या डोळ्यांतूनही आनंदाच्या मृगधारा सुरू झाल्या.
जून १९३१
लेखिका – सुश्री कुसुमावती देशपांडे
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे