सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 165
☆ गहन निळे नभ माथ्यावरती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
गहन निळे नभ माथ्यावरती
अचल ,आसक्त मी धरतीवरती
☆
त्या चंद्राचे अतिवेड जीवाला
काय म्हणावे या आकर्षणाला
☆
ग्रह ,तारे दूर दूरस्थ आकाशगंगा
मी इवलासा कण कसे वर्णू अथांगा
☆
शशांक म्हणे कुणी “सौदागर स्वप्नाचा”
परी जादूगार तू माझ्या मनीचा
☆
सोम म्हणू की शशी सुधांशु
चकोर जीवाचा असे मुमुक्षु
☆
किती चांदण्या तुझ्याच भोवती
गौर रोहिणी अन तारा लखलखती
☆
गहन जरी नभ तू अप्राप्यअलौकिका
कधी बैरागी मन कधी अभिसारिका
☆
कुंडलीतल्या सर्व पाप ग्रहांना
कसे समजावू मला कळेना
☆
अखंड चंद्र तो कुठे मिळे कुणाला ?
तरी मी चंद्राणी…कसे सांगू जगाला !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈