जीवनरंग
☆ बायको आणि गाढव… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
उतारवयातही बायकोची कटकट कमी होत नाही, म्हणून कंटाळून त्यानं गावात जाऊन राहायचं ठरवलं. जागा आधी घेऊन ठेवलेली होतीच. तिथे फार्म हाऊस बांधलं. छोटंसं शेत होतं, त्यात भाज्या लावल्या. एक गाय घेतली, एक गाढव घेतलं. एक कुत्रा पाळला.
या सगळ्यांच्या साथीत त्याचा दिवस मजेत जायचा. पुन्हा शहरात यायचं नावही काढायचं नाही, हे त्यानं ठरवलं होतं. मात्र त्याचं नशीब त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. बायको तिथेही त्याच्या मागोमाग आलीच. दर रविवारी ती गावात यायची आणि त्याच्या डोक्याशी कटकट करायची.
` ‘हे कुठे खबदाडात घर बांधून ठेवलंय!“
“धड रस्तासुद्धा नाहीये गावात यायला!“
“कशा वेंधळ्यासारख्या पसरून ठेवल्यायंत ह्या वस्तू!“
“काय कपडे घातलेत हे? शोभतात तरी का तुम्हाला?“
“हे गाढव कशाला घेतलंय आणि? काय उपयोग ह्याचा?“
एक ना दोन.
शहरात असताना तेच, आता गावात आल्यावर तेच.
तो पार वैतागून गेला.
इथेही सुटका नाही म्हणजे काय? पण काय करू शकणार होता बिचारा? बायकोला ह्या वयात सोडूही शकत नव्हता.
गाढवावरून तर ती दरवेळी त्याचं डोकं खायची. एके दिवशी ती आली, तेव्हा त्यानंच तिला सांगितलं, “तुला गाढव नको असेल, तर तूच त्याची विल्हेवाट लाव!“
बायकोला हेच हवं होतं. तिनं गाढवाला बाजारात नेऊन विकून टाकायचं ठरवलं.
गाढवाला सोडण्यासाठी तिनं दोरीला हात लावला मात्र, त्यानं मागच्या मागे दोन लाथा मारल्या, तशी बायको कडमडली. भेलकांडत कुठेतरी जाऊन पडली. पाय फ्रॅक्चर झाला, हाताला खरचटलं, पाठही चेचली गेली. डॉक्टरांनी दोन महिने तरी घरातून बाहेर पडायचं नाही, असं सांगितलं. काळजीपोटी त्यानं तिला शहरातल्या घरातच राहायला सांगितलं, दिमतीला एक मदतनीस दिला.
ही दुर्दैवी घटना कळल्यावर जवळची मंडळी भेटायला आली. सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन त्रास देऊ नये, म्हणून त्यानं एकच वार ठरवून दिला होता. सगळे त्याच दिवशी आले.
तो डोक्याला हात लावून बसला होता.
काक्या, मावश्या, आत्या, शेजारणी, ओळखीच्या कुणीकुणी बायका येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देई.
ओळखीचे काका, मामा, शेजारचे पुरुष, मित्र येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत.
तो नकारार्थी मान हलवे.
त्याच्या एका मित्राची बायको लांबून हा प्रकार बघत होती. न राहवून तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं, “बायका जवळ येऊन काहीतरी बोलतायंत, तुमचा मित्र होकार देतोय. पुरुष जवळ आल्यावर नकार देतोय. ही काय भानगड?“
मित्र शांतपणे म्हणाला, “बायका जवळ येऊन काळजी व्यक्त करतायंत. काही लागलं तर सांगा, काकूंनी आधीच गावाला जायला नको होतं वगैरे सांगताहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करताहेत. हा होकार देतोय.“
“आणि पुरुष?“
“हं…!“ एक दीर्घ उसासा टाकून मित्र म्हणाला, “ते त्याचं गाढव दोन दिवस उधार मागतायंत!“
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈