सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
आज त्याच्या कामाचा दुसरा दिवस होता. मागच्या अंगणातला साचलेला कचरा आणि झाडं-झुडुपं साफ करण्यासाठी मी त्याला बोलावलं होतं. उन्हाळ्यात त्या अंगणात बसून बाहेर बसण्याचा आनंद घेण्यासाठीची ही तयारी होती. पूर्ण सात आठ महिने काकडून टाकणाऱ्या थंडीनंतर हवेत झालेला बदल, मनालाही हवाहवासा वाटत होता. येणाऱ्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त वेळ बाहेर बसून मोकळ्या हवेत घालवण्यासाठी या स्वच्छतेची गरज होती. कितीतरी लोकांना फोन केल्यानंतर याला निवडलं होतं मी. त्याचं नाव होतं- लीवी.
डॉ हंसा दीप
वेळेचा पक्का होता तो. कालसारखीच आज पण बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी आतमधे लागलेली होती. बाजुच्या फाटकातून तो मागच्या अंगणात आला. येताना त्यानं फाटकाच्या आत पडलेलं वर्तमानपत्रही उचलून आणलं. पहिल्याच पानावर “मला श्वास घेता येत नाहिये” अशा शीर्षकाखाली एक मोठा फोटोही छापलेला होता. त्यात एका काळ्या माणसाला खाली पाडून, पोलिसाने त्याच्या गळ्यावर आपला पाय दाबून धरलेला दिसत होता. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वर्णभेदाविरुध्द चालू असलेल्या मोर्च्यांच्या बातम्याच भरलेल्या होत्या.
“यू सी बॅड पिपूल इन दिस वर्ल्ड!”
मी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. “जगात वाईट लोकांची कमतरता नाही”, हे मी नेहमीच म्हणत असते. माझ्या मनात असतं, तर दोन सहानुभूतीचे शब्द बोलू शकले असते मी. त्याच्या मनःस्थितीचं भान तर होतं मला, पण आपलं काम करून घेण्याची चिंता जास्त होती. त्याचं लक्ष त्या बातमीत जास्त रमू नये म्हणून मी लगेच त्याच्या हातातून वर्तमानपत्र काढून घेतलं. अनावश्यक चर्चा वाढवून कोणाच्या जखमांवर मीठ कशाला चोळायचं? म्हणून मी आज काय काय करायचं आहे, ते त्याला समजाऊ लागले.
आपल्या सिगारेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडत ऐकत होता तो. त्याचे दात आवळले गेले होते. वर्तमानपत्रातल्या बातमी ळे त्याच्या मनात उसळलेला राग त्याच्या पायात उतरल्यासारखा वाटत होता. ते थोटूक राख होऊन केंव्हाच मातीत मिसळून गेलेलं होतं. पण लीवी अजूनही शांत झालेला नव्हता. त्याचं ते थोटूक पायांनी चिरडणं म्हणजे, त्या थोटकातली उरलेली ठिणगी विझवणं नव्हतं, तर त्यातून बहुदा त्याला आपल्या पायाखाली जगाला चिरडल्याचं समाधान मिळत होतं.
काल जेंव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं, तेंव्हा बघतच राहिले होते मी. फोनवर बोलताना काही कळलं नव्हतं, कोणाशी बोलतेय मी ते! बोलणाऱ्याचा आवाज जड होता आणि अगदी अदबीनं बोलत होता तो. बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी माझ्या घरापाशी येऊन थांबली होती. मी फोनवर त्याला थेट मागच्या अंगणातच यायला सांगितलं होतं. शक्यतो परके लोक घरात आतवर न आलेलेच बरं वाटतं मला. इथे मी, एक बाई एकटीच रहातेय, हे शक्यतो कोणाला कळू नये असा माझा प्रयत्न असतो. छोटी मोठी कामं करून घ्यायची तर येता जाता, इकडे तिकडे बघून लोकांना घराबद्दल बरंच काही कळून येतं. याच कारणासाठी मी जरा जास्तच खबरदारी घेत असते.
समोरून येताना बघितलं होतं मी त्याला. तो काळा होता. काळा रंग आणखी किती जास्त काळा असू शकतो, ते त्याच्याकडे बघून कळत होतं. चांगलाच उंच आणि दणकट होता तो, बघता क्षणीच भीति वाटायला लागली होती त्याची. त्यालाही कळलं असावं ते, या प्रतिक्रियेची सवय झालेली असावी त्याला.
म्हणाला, “माझ्याकडे बघू नका, माझं काम बघा!”
बरोबर बोलत होता तो. असं बोलायची त्याला गरज पडते कारण त्याचं रूप असं आहे, की त्याच्याकडे बघून अविश्वासाचा भावच निर्माण व्हावा! माणूस स्वतःला ओळखत असतो, स्वतःचे गुणावगुण त्याला चांगलेच माहित असतात. याला कळत होतं, की त्याचा चेहरा कोणालाच आवडण्याजोगा नव्हता. काळा रंग आणि मोठमोठ्या नाकपुड्या असलेलं नाक. डोक्याला टक्कल पडलेलं आणि हातात काम करून मळलेले हातमोजे आणि पायात भले भक्कम बूट! त्याच्या त्या भल्या मोठ्या, उंच, दांडग्या देहासमोर बुटकीशी मी, एखाद्या हत्तीसमोर मुंगीने मान वर करून बोलावं, तशी दिसत होते. कुठल्याही क्षणी त्यानं आपल्या पायाखाली चिरडून टाकलं, तर या मुंगीला ओरडायची पण संधि न मिळता बिचारी हे जग सोडून जायची! त्याच्या त्या व्यक्तिमत्वाच्या दडपणाखालून बाहेर यायला काही क्षणांचा अवधी लागला मला. कोण जाणे, कुठल्या देशात त्याची मुळं रुजलेली होती, पण त्याची वृत्ती स्वच्छ दिसत होती. एका कुशल कारागिराची वृत्ती! बेईमानीची खोटी गोड भाषा नाही, तर ईमानदारीची कटू झलक दिसली होती.
“एकदा माझं काम बघा, मग दुसऱ्या कोणाचं काम आवडणारच नाही तुम्हाला!” खरंच बोलत होता तो. त्यानं एका दिवसात जेवढं काम केलं होतं, तेवढं आणि त्याच्यापेक्षा चांगलं कोणी करू शकेल, ही शक्यताच नव्हती! त्याचं काम हीच त्याची ताकद बनवली होती त्यानं. हे कौशल्य काही त्याच्यात जन्मतः नव्हतं, त्यानं ते मिळवलं होतं, हेच त्याला सांगायचं होतं. आपल्या त्वचेचा रंग ठरवणं त्याच्या हातात नव्हतं. आपल्या मोठ्या आणि फुगीर नाकाला आकार देणंही त्याला शक्य नव्हतं. ज्या बाबतीत तो काही करू शकत नाही, ते त्याच्या चांगलं किंवा वाईट असण्याचं प्रमाण कसं ठरू शकेल? त्याचं रूप-रंग त्याच्या आतल्या चांगुलपणाला नाकारू शकत नाही.
आपल्या कामाचे पुरेपूर पैसे घेतो तो, त्यात कोणतीच कुचराई नाही. बोलण्यासाठी तोंड उघडलं, की त्याचे पांढरे शुभ्र दात हसत चमकून उठतात. अगदी शुभ्र मोत्यांची माळ कोणी गुंफलेली असावी, असे दिसतात. त्याचं बोलणं ऐकत असताना त्याच्या दातांच्या चमकदारपणाकडेच नजर खिळून रहाते माझी, डोळ्यांना आणखी कुठली बघण्याजोगी जागा सापडतच नाही! मला कळतंय, असा विचार करणं हा त्याच्यावर अन्याय आहे, आणि मला तो वर्णद्वेषी बनवतो. पण मी तरी काय करू! सफेत रंग कोणाला आवडत नाही? किंवा असंही म्हणता येईल, की डोळ्यांना सफेत (गोरा) रंग चांगला वाटतो, मग तो कागदाचा असो वा त्वचेचा.
मी पण काही अगदी गोरीपान कुठे आहे? दुधाने न्हायलेली आहे. वाक्प्रचार नाही सांगत, खरंच माझ्या आईनं लहानपणी दुधानी अगदी रगडून, रगडून न्हाऊ घातलं होतं मला! ती जेंव्हा मला दुधानी आंघोळ घालायची, तेंव्हा जितका वेळ माझ्या अंगावर दूध असायचं, तेवढा वेळ प्रेमानं, कौतुकानं बघत रहायची माझ्याकडे. आणि हेच आशीर्वाद द्यायची, की रोज दुधानी न्हाशील तर अशीच दुधासारखी गोरी होशील! दुधानी रोज आंघोळ करूनसुद्धा मी जशी होते, तशीच राहिले, पण आईच्या नजरेत माझा काळेपणा निघून गेला होता. आणि मला सावळा रंग प्राप्त झाला होता. तो रंग मला या परक्या देशात अगदी सुरक्षित ठेवत असे. तपकिरी (सावळं) म्हंटलं जात असे मला. काळ्या रंगावर होणारे अत्याचारही मला सहन करावे लागत नव्हते आणि गोऱ्या रंगाच्या लोकांवर होणारा हुकुमशाहीचा आरोपही माझ्यावर होत नसे. आणि चीनमधून करोना आणल्याचा दोषही मला दिला जात नव्हता!
मला हे पण माहित आहे, की माझ्याशी बोलताना लोकांची नजर माझ्या दातांवरही जात नसेल, कारण लीविच्या दातांसारखे ते काही चमकदार मोत्यांसारखे दिसत नाहीत. चहा आणि कॉफी सतत प्यायल्याने त्यांच्यावर तपकिरी रंग चढलेला आहे. कुठल्याही प्रमाणानं मोजू गेल्यास लीविपेक्षा माझी परिस्थिती दहा टक्क्यांनी अधिक चांगली आहे. मला पण कित्येक वेळा माझ्या समोर उभे असलेले गोरे लोक आपल्यापेक्षा फार उच्च पातळीवर असल्याचं जाणवलं होतं. आणि त्याबद्दल अपराधीपणाची जाणीवही झाली होती. त्या वेळी माझ्या वृत्तीतला ताठा माझ्या कामावरच्या निष्ठेमुळेच होता. आता मी निवृत्त झाले आहे, पण लीवी सारखेच रक्ताचे घोट मीही गिळले आहेत, एकदाच नव्हे, कित्येक वेळा! गायी आणि म्हशींच्या मधे घोड्यांची कातडी घेऊन वावरणारी मी, रंगावरून चाललेल्या कट कारस्थानाचा एक भाग होतेच – गोरे, काळे आणि सावळे! अंतर्मनात, आपल्या देशाचा तो इतिहासही साक्ष देत चमकून जायचा, जेंव्हा आपल्याच देशात आपलेच लोक चिरडले जात असत. गोऱ्या पायांच्या काळ्या बुटांनी केलेलं विनाशाचं तांडव! ती कटुता आजही अंतर्मनात उरलेली आहे!
ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता.
क्रमश: १
मूळ हिंदी कथा : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈