श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

मंगळावरील खडक आणि तुटलेले खडक /धूळ यांचे नमुने तपशीलवार अभ्यासासाठी पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळसंस्था NASA व युरोपची अंतराळ संस्था ESA संयुक्तपणे काम करीत आहेत. मार्स पर्सव्हरन्स रोव्हर हा या आंतरराष्ट्रीय व अंतर्ग्रहीय योजनेचा पहिला चरण आहे. त्याचे काम मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करणे व संग्रहित करणे हे असून हे काम तो व्यवस्थितपणे करत आहे. आज अखेर त्याने शास्त्रोक्त पद्धतीने अकरा नमुने गोळा करून ते संग्रहित करून ठेवले आहेत. त्याने कमीतकमी तीस नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये हे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील व अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्याचे परीक्षण केले जाईल. जेथे पर्सव्हरन्स कार्यरत आहे त्या जेझेरो क्रेटरच्या आसपासच्या परिसरात पर्सव्हरन्सच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ‘मंगळ नमुना परत’ योजना आखण्यात आली आहे. यात दोन मोहिमा अंतर्भूत आहेत. पहिल्या मोहिमेअंतर्गत एक यान जेझेरो घळीत किंवा त्याच्या आसपास उतरेल, पर्सेव्हरन्सने मंगळ भूमीवर निर्धारित जागी ठेवलेले नमुने हस्तगत करेल व हस्तगत केलेले नमुने घेऊन मंगळावरून उड्डाण करून मंगळाच्या कक्षेत येईल. दुसऱ्या मोहिमेअंतर्गत दुसरे यान मंगळाच्या कक्षेत जाऊन हे नमुने ताब्यात घेईल व २०३३ साली हे नमुने सुरक्षितपणे पृथ्वीवर आणेल. अंतराळविज्ञानाच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या ग्रहावरून गोळा करून आणलेले हे नमुने एका कळीच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील आणि तो प्रश्न म्हणजे : कधीकाळी मंगळावर जीवन अस्तित्वात होते का? पृथ्वीवरील अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने तपासल्यानंतरच आपणास वरील प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

NASAESA हे कसे साध्य करणार आहेत हे आपण पाहू :

अ) सन २०२८ च्या मध्यावर नमुना पुनर्प्राप्ती लँडर (sample retrieval lander) मंगळावर उतरवला जाईल. त्याच्यावर नासाने तयार केलेला मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण आणि इसा (ESA) ने तयार केलेला नमुना हस्तांतरण बाहू (sample transfer arm)असतील. या लँडर बरोबर दोन हेलिकॉप्टर्ससुद्धा पाठवली जातील.

ब ) मंगळावरील नमुनेअसलेली पेटी घेऊन पर्सेव्हरन्स रोव्हर लँडर जवळ येईल. लँडर वरील नमुना हस्तांतरण बाहुच्या सहाय्याने ही पेटी मार्स एसेन्ट व्हेईकल या अग्निबाणाच्या टोकावरील एका कप्प्यात ठेवण्यात येईल.

ब-१) अलीकडेच नासाने केलेल्या अभ्यासावरून पर्सेव्हरन्स रोव्हरची कार्यक्षमता २०३० पर्यंत अबाधित राहील असा निष्कर्ष निघाला आहे. पण काही अनपेक्षित कारणांमुळे जर २०३० पर्यंत पर्सेव्हरन्स रोव्हर कार्यक्षम राहू शकला नाही तर लँडरवरील हेलिकॉप्टर पर्सेव्हरन्सने नमुन्याची पेटी ज्या जागेवर ठेवली असेल त्या जागेवर जाऊन ती पेटी उचलेल व अग्निबाणाच्या वरच्या कप्प्यात आणून ठेवेल. या हेलिकॉप्टर्सची रचना मंगळावर सध्या कार्यरत असलेल्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर सारखीच असेल पण त्यास चाके असतील जेणेकरून नमुन्यांची पेटी घेण्यासाठी ते पेटीच्या अगदी नजीक जाऊ शकेल; तसेच पेटी उचलण्यासाठी त्याला एक लहानसा हात (arm) असेल.

क ) इसाने तयार केलेला पृथ्वी परत ऑर्बिटर (earth return orbiter) २०२७ सालच्या मध्यावर प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. त्याच्यावर नमुने हस्तगत, प्रतिबंध आणि परतीची प्रणाली (capture, containment and return system) तसेच पृथ्वी प्रवेश वाहन असेल. हा ऑर्बिटर मंगळाच्या ठरलेल्या कक्षेत प्रवेश करून मंगळाभोवती भ्रमण करेल.

ड ) मंगळावरील खडकांच्या नमुन्यांची पेटी घेऊन मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण मंगळभूमीवरून उड्डाण करून earth return orbitar ज्या कक्षेत भ्रमण करत असेल त्या कक्षेत येईल. ऑर्बीटरमध्ये असलेली परतीची प्रणाली हे नमुने हस्तगत करून पृथ्वी प्रवेश वाहनात ठेवेल. त्यानंतर हा ऑर्बिटर मंगळाची कक्षा सोडून पृथ्वीकडे मार्गक्रमण करेल. पृथ्वीच्या जवळ आल्यावर ऑर्बीटरपासून प्रवेश वाहन वेगळे होईल व पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून २०३३ साली सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरेल.

इ ) वैज्ञानिकांद्वारा या नमुन्यांचे अत्याधुनिक उपकारणांद्वारे परीक्षण केले जाईल. त्यानंतरच ‘ मंगळावर कधीकाळी जीवन होते का? ‘ या बहुप्रतिक्षित प्रश्नाचे उत्तर मिळेल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल –  [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments