सुश्री सुनिता गद्रे
वाचताना वेचलेले
☆ उत्तरायण… ब्रिटिश नंदी ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
शरशय्येवर पडल्या पडल्या भोवतालच्या काळोखातील हालचालींचा मागोवा घेत पितामह भीष्माने सोडला एक सुस्कारा… आता आणखी थोडाच अवधी राहिला….
आसमंतातील मलमूत्राचा दुर्गंध अजूनही पुरता गेला नव्हता, तरीही तो त्रासदायक राहिला नाही.
कुरुक्षेत्राच्या दिशेने येणाऱ्या थंडगार वाऱ्यांसमवेत येणारी सडक्या मांसाची दुर्गंधीही आताशा नासिकेला जाणवत नाही.
काळोखात दडून गेलेली सारी घटिते आणि अघटिते रात्री-अपरात्री दचकवत नाहीत….
तो शस्त्रांचा खणखणाट, रथांचा घरघराट, सैन्याचा थरथराट, वायवास्त्रांचा भरभराट, भयकारी विस्फोटांची मालिका, धराशायी होणाऱ्या सैनिकांच्या किंकाळ्या, अश्वांचे असहाय खिंकाळणे, आकांत……. सारे काही अठरा दिवसात संपले ,फक्त अठरा दिवसात….
…. आपण अजूनही येथे उत्तरायणाच्या प्रतीक्षेत तिष्ठत आहोत ! …..
इतक्यात ….
दूरवर थांबला एक रथ, पाठोपाठ वाजली पावले, आणि ऐकू आली रेशमी वस्त्रांची राजस सळसळ.
मिटल्या डोळ्यांनीच भीष्मांनी ओळखले……. “युगंधरा,ये ! तुझीच प्रतिक्षा होती…..”
मध्यरात्री उठून आलेल्या वासुदेवाने वाकून स्पर्शली ती क्षताक्षत वृद्ध पावले.
युगंधराचा युगस्वर काळोखात घुमला……
” गांगेया, सूर्याच्या उत्तरायणासोबतच तुझीही पावले मोक्षाच्या दिशेने पडतील. मला अंतिम समयी बोलून घेऊ दे !
मला स्मरते आहे तुझे लखलखीत चरित्र …… पिता शंतनुचा लंपट हट्ट, तुझी उग्र प्रतिज्ञा, सावत्र बंधू चित्रांगद- विचित्रवीर्याचा निर्ममपणे केलेला प्रतिपाळ, अंबा-अंबालिकेवर तू लादलेला अनन्वित नियोग प्रयोग, आणि तुझे शतवीर्यवान पौरुष, तुझ्या उग्र मंगल व्यक्तिमत्त्वाचे प्राखर्य ! परंतु, असे असूनही देवव्रता, ऐनवेळी तू सत्याची कास सोडलीस !…. हे युद्ध तुला टाळता आले असते, शांतनवा !”
युगंधराचे बोल ऐकून भीष्म हसले……
” विधीलिखित कोणाला टळत नाही, हे तूच सांगितलेस ना रे पार्थाला? देवकीनंदना, तुझा चातुर्यचंपक फुलू दे तुझ्या द्वारकेत किंवा आता बदललेल्या हस्तिनापुरात. मरणाच्या दारातल्या म्हाताऱ्याला निदान बोलण्यात तरी गुंडाळू नकोस ! जे युद्ध टाळणे तुला जमले नाही, ते मला कसे जमावे, विश्वंभरा? “
निरुत्तर होऊन वासुदेव कृष्ण निरोप घेऊन निघाला, तेव्हा पूर्वेकडे आरक्त नभामध्ये कोवळे सूर्यबिंब प्रकट झाले होते…. उत्तरायण सुरू झालेले पाहून पितामह भीष्मांनी दोन्ही हात जोडले……
…. भारतीय युद्ध अठरा दिवसात संपले नाही, ते अजूनही सुरूच आहे, असे म्हणतात.
रचना: प्रीतीश नंदी
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈