महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 114
☆ वेदनेच्या कविता… ☆
वेदनेच्या ह्या कविता सांगू कशा
मूक झाली भावना ही महादशा..धृ
अश्रू डोळ्यांतील संपून गेले पहा
स्पंदने हृदयाची थांबून गेली पहा
आक्रोश मी कसा करावा, कळेना हा.. १
नाते-गोते आप्त सारे विखुरले
रक्ताचे ते पाणी झाले आटले
मंद मंद मृत शांत भावना.. २
ऐसे कैसे दिस आले, सांगा इथे
कीव ना इतुकी कुणाला काहो इथे
आंधळे हे विश्व अवघे भासे इथे.. ३
सांगणे इतुकेच माझे आता गडे
अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे
राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈