श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 145 ☆ आठवांच्या आसवांनी…! ☆ श्री सुजित कदम ☆
आभाळालाही असते तुझ्या पदराची ओढ
जरी असला अंथाग तरी ममता अजोड..!
ओठी जेव्हा पहिलाच शब्द आई अंकुरतो
आईलाही तेव्हा तिचा शब्द आई आठवतो..!
आई शब्दात असतो माया ममतेचा झरा
आई शब्दानेच होतो वेदनेचा अंत सारा..!
जात्यावरची ही ओवी त्यात नशीबाच गाणं
काळ्या आईच्या कुशीत आई पेरते बियाण..!
आई स्नेहाची साऊली घाली मायेची पाखर
तिच्या साऊलीत मिळे रोज प्रेमाची भाकर..!
देवळात गेल्यावर लीन जाहलो भक्तीने
असो आई माझी सुखी देवा मागतो मागणे..!
आई विना आयुष्यची झाली आहे परवड
संकटाची रोजनिशी रोज नवी धडपड..!
तुच माझी जिजाविठा आहे तुलाच कदर
आठवाच्या आसवांनी तुझा भिजला पदर…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈