वाचताना वेचलेले
महा पंचाक्षरी द्रौपदीची थाळी… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर
थंडीत भाज्या
मिळती ताज्या
खाव्यात रोज
म्हणती आज्या…. १
दिल्ली मटार
हिरवागार
करंज्या करा
चटकदार…. २
वांगं भरीत
झणझणीत
घाला फोडणी
चरचरीत…. ३
खीर , हलवा
घालून खवा
काजू पिस्त्याने
मस्त सजवा…. ४
सार नी कढी
सांबार वडी
उंधियोमध्ये
वालपापडी…. ५
वरण भात
लिंबाची साथ
तूप हवेच
सढळ हात… ६
सलाड ,फळ
कधी उसळ
कधी झटका
शेव मिसळ… ७
मेथी लसूणी
डाळ घालूनी
पालक, चुका
ही बहुगुणी… ८
शिळी वा ताजी
अळूची भाजी
मसालेभात
मारतो बाजी… ९
चिंचेचे सार
सूप प्रकार
सोलकढीही
पाचक फार… १०
गाजर, मुळे
हादगा फुले
शेवगा शेंगा
खा कंदमुळे… ११
शेपू दोडका
घेवडा मका
खा,नाक मुळी
मुरडू नका…. १२
कडू कारले
करा आपले
आरोग्यासाठी
आहे चांगले… १३
माठ, चवळी
खावी टाकळी
केळफूल नि
घोळू,तांदळी…. १४
मूग कढण
भेंडी, सुरण
चिंच खोबरे
लावा वाटण…. १५
सुरळी वड्या
शुभ्र पापड्या
पापडां साथ
देती बापड्या… १६
बीट काकड्या
करा पचड्या
वाटली डाळ
कोबीच्या वड्या… १७
पोळी आमटी
लोणी दामटी
खर्ड्याची वर
थोडी चिमटी… १८
चटकदार
मसालेदार
जेवण कसे
खुमासदार… १९
कांदा, बटाटा
आलं टमाटा
व्यंजनी मोठा
असतो वाटा…. २०
मिर्ची लसूण
घाला वाटून
खा बिनधास्त
पण जपून…. २१
कढीपत्त्याची
नि पुदिन्याची
चटणी खावी
शेंगदाण्याची…. २२
चणा, वाटाणा
बेताने हाणा
गुळासवे खा
दाणा, फुटाणा…. २३
पॅटिस, वडे
भारी आवडे
कांद्याची भजी
फक्कड गडे… २४
तूप भिजली
स्वाद भरली
पुरणपोळी
पक्वान्नातली…. २५
लोणचे फोड
जिला न तोड
सुग्रास घासां
शोभेशी जोड… २६
भाजी नि पाव
कधी पुलाव
भाज्या घालून
खा चारीठाव…. २७
कधी मखाणे
पनीर खाणे
मश्रूम पण
योग्य प्रमाणे…. २८
मनमुराद
घ्यावा आस्वाद
मठ्ठा जिलबी
केशर स्वाद… २९
श्रीखंड पुरी
जाम जरुरी
बासुंदी विना
थाळी अपुरी… ३०
मांडी ठोकून
बसा वाकून
जेवणे शांत
मौन राखून…३१
देवाचा वास
वेळेला घास
समजावे ही
सुखाची रास…. ३२
बसे पंगत
येई रंगत
लज्जतदार
खाशी संगत…. ३३
थंडीत मस्त
रहावे स्वस्थ
हे खवैय्यांनो
तुम्ही समस्त…. ३४
नियम स्वस्त
व्यायाम सक्त
वर्ज आळस
राहणे व्यस्त…. ३५
थोडे जेवण
थोडे लवण
तब्येतीसाठी
हवे स्मरण.. ३६
भागते भूक
हेच ते सुख
खाताना रहा
हसत मुख…. ३७
बांधावा चंग
व्यायामा संग
सांभाळा सारे
खाण्याचे ढंग…..३८
साहित्य कृती
ह्या पाककृती
जपूया सारे
खाद्य संस्कृती…३९
गृहिणी भाळी
तिन्ही त्रिकाळी
अन्नपूर्णेची
द्रौपदी थाळी… ४०
मुखी सकळ
मिळो कवळ
हीच प्रार्थना
हरिजवळ…. ४१
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈