इंद्रधनुष्य
☆ बाण स्तंभ ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे का, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.
गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगातील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.
मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.
मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग, म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे थेट दक्षिण ध्रुव, यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ आहे.
संग्राहक – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈