सौ. सुचित्रा पवार
काव्यानंद
☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆
☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆
राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या….
भूमीवरी पडावे
ताऱ्यांकडे पहावे
प्रभूनाम नित्य गावे
या झोपडीत माझ्या..
पहारे आणि तिजोऱ्या
त्यातून होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या
या झोपडीत माझ्या
जाता तया महाला
‘मज्जाव’शब्द आला
भीती न यावयाला
या झोपडीत माझ्या.
महाली मऊ बिछाने
कंदील श्यामदाने
आम्हा जमीन माने
या झोपडीत माझ्या..
येता तरी सुखे या
जाता तरी सुखे जा
कोणावरी ना बोजा
या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे
देवेन्द्र तो ही लाजे
शांती सदा विराजे
या झोपडीत माझ्या..
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
– कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆
झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता,
गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक.
मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या परिस्थितीची ती एक ढाल असते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे.प्राप्त परिस्थितीत सुखी राहण्याचा जणू आनंदी मंत्र!
राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या….
राजाचा महालसुद्धा माझ्या झोपडीपुढं फिका आहे कारण त्याला इतका खर्च करून बांधलेल्या महालात जी सुख समृद्धी लाभल्या ती माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये काहीच खर्च न करता अनुभवतो आहे.कोणती सौख्ये कवी अनुभवत आहे?
भूमीवरी पडावे
ताऱ्यांकडे पहावे
प्रभूनाम नित्य गावे
या झोपडीत माझ्या..
साधी गोष्ट आहे!तुम्ही सहजच माझ्या झोपडीतल्या जमिनिवर झोपलात तर आकाशात नजर जाईल आणि असंख्य लुकलुकत्या चांदण्या तुमचं मन वेधून घेतील.ते चांदण्याचे आभाळ दिलासा देत असतानाच मुखात मात्र प्रभूचे नाव नित्य असते कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे.हे चांदण्यांचे आकाश,ही हवा, हा स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचीच तर रूपे आहेत!त्याच्याच कृपेने आपण हे सारे अनुभवतो आणि श्वासदेखील घेतो.या माझ्या झोपडीत फक्त इतकेच करायचेआहे.
महालात हे काहीच तुम्हाला अनुभवता येणार नाही.
पहारे आणि तिजोऱ्या
त्यातून होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या
या झोपडीत माझ्या
महालात रात्रंदिवस पहारेकरी दाराशी असतात, गस्त घालतात.संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या अवजड तिजोऱ्या असतात तरीही तिथं चोरी होतेच पण झोपडीत माझ्या ही भीती मुळीच नाही.माझ्या झोपडीला दरवाजा नाही,पहारेकरी नाहीत की लुटारूनी चोरून नेण्यासाठी ऐहिक संपत्तीदेखील ;त्यामुळं चोरी होऊच शकत नाही. अष्टौप्रहर माझी झोपडी कुणालाही सामावून घेण्यास सज्ज असते.असे असूनही चोर मात्र कधीच चोरी करत नाहीत.(कारण ऐहिक असते त्यालाच लोक मौल्यवान म्हणतात आणि आत्मिक अदृश्य चिरंतन असते त्याला मात्र सोडून देतात)
जाता तया महाला
‘मज्जाव’शब्द आला
भीती न यावयाला
या झोपडीत माझ्या..
महालात तुम्ही सहज जावयाचे म्हणले तर पहारेकरी लगेच अडवतात,आत जायला मज्जाव अर्थात बंदी असते पण इकडं माझ्या झोपडीच्या शब्दकोशात मज्जाव हा शब्दच नाही.ती कुणालाही सहजच आत सामावून घेते.कुठलाही पहारेकरी तुम्हाला दरडावणार नाही की भीतीही घालणार नाही.सहजच कुणीही यावे न माझ्या झोपडीत विसावावे.
महाली मऊ बिछाने
कंदील श्यामदाने
आम्हा जमीन माने
या झोपडीत माझ्या..
महालात सर्वांना झोपायला मऊ मऊ बिछाने असतात.परांच्या गाद्या,मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला ऊबदार पांघरुण असतात.वर छताला छान छान ,आकर्षक झुंबरे,प्रकाशासाठी कंदील- शामदाने लटकवलेली असतात.छान,शांत झोपेसाठी सर्वप्रकारच्या सोयी सुविधा केलेल्या असतात पण तरीही सुखाच्या झोपेची शाश्वती नसते; मात्र आमच्या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते,जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.
येता तरी सुखे या
जाता तरी सुखे जा
कोणावरी ना बोजा
या झोपडीत माझ्या..
महालात जाताना सर्वसामान्य माणसाला एक अनामिक भीती,दडपण असते.तिथल्या भव्य -दिव्यपणाने उर दडपतो; पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही.माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केंव्हाही आनंदाने यावे-जावे,इथं कुठलंच भय नाही की अवघडलेपण वाटणार नाही.
पाहून सौख्य माझे
देवेन्द्र तो ही लाजे
शांती सदा विराजे
या झोपडीत माझ्या..
असं हे झोपडीतलं वैभव आणि सौख्य पाहून प्रत्यक्षात इंद्राला सुद्धा लाज वाटते,इंद्रसुद्धा माझ्या झोपडीचा आणि तेथील सौख्याचा हेवा करतो,यापेक्षा झोपडीतली महानता मी काय वर्णावी?माझ्या या झोपडीत नेहमीच शांतता वसते.आणि जिथे शांती तिथेच सौख्य आणि समाधानही.
अगदी साध्या सोप्या शब्दात तुकडोजी आपल्या झोपडीचे वर्णन करतात.माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते हेच यातून सूचित होते.माणूस भौतिक सुखांच्या मागे लागतो आणि चिरंतन,शाश्वत मनाची शांती हरवून बसतो.कितीही सुख मिळाले तरी त्याचे मन भरत नाही आणि हाव सुटत राहते.यातच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवते आणि सुखाची निद्रा देखील.
एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरील खोपसुद्धा अशीच असते ना?खोपीत सुद्धा हेच सुख असते.
काय नसते या झोपडीत?
समोरील शेत शिवार,नाना पाखरांचे नाना आवाज,भिरभिरता मोकळा वारा,काम करून भूक लागल्यावर खाल्लेली अमृताहून रुचकर खर्डा भाकरी महालातील पंच पक्वान्नाला मागे सारते.
सुखाचे परिमाण आपल्या मनातच असते.म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथली माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसे दुःखी असतीलच असेही नाही.
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈