सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 47 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
८७.
किती आशेनं मी तिला शोधायला निघतो.
माझ्या खोलीच्या कोणत्याही
कोपऱ्यात ती मला सापडत नाही.
माझं घर छोटं आहे.
एकदा हरवलेली वस्तू त्यातून पुन्हा मिळत नाही.
तुझं निवासस्थान अफाट आहे.
हे स्वामी हरवलेली ती वस्तू शोधायला
मी तुझ्या दाराशी आलो आहे.
सायंकालीन आकाशाच्या सोनेरी छताखाली
उभं राहून माझे उत्सुक डोळे
तुझ्या चेहऱ्याकडे मी लावतो.
जिथून काहीच नाहीसं होणार नाही
त्या शाश्वताच्या काठावर मी आलो आहे.
आशा,सुख,दृष्टी जी आसवांतूनही पाहू शकते –
हे काहीही नाहीसं होणार नाही.
माझं रिकामं आयुष्य त्या सागरात इतकं
बुडवून टाक की ते पूर्णपणे आतपर्यंत भरू दे.
मला एकदाच त्या विश्वाच्या पूर्णतेचा
मधुर स्पर्श अनुभवू दे.
८८.
भग्न मंदिरातील देवते!
वीणेची तुटलेली तार तुझं स्तवन गीत गात नाही.
सायंकालीन घंटानाद तुझ्या पूजेची वेळ झाली
हे सांगणार नाही.
तुझ्या भोवतीची हवा स्तब्ध, शांत आहे.
उनाड वासंतिक वारा
तुझ्या निर्जन निवासात शिरतो.
आपल्या बरोबर तो फुलांचा सुगंध आणतो.
पण ती फुलं तुझ्यावर पूजेत उधळली जात नाहीत.
पूर्वीचा तुझा पुजारी अजून भटकतो आहे.
आपली तेव्हाची मन:कामना पूर्ण होईल असं त्याला वाटतं.
सायंकाळी जेव्हा उन आणि सावल्या धुळीच्या अंधारात मिसळून जातात
तेव्हा मनात आशा धरून थकून -भागून तो या
भग्न मंदिरात येईल.
त्यांच्या पोटात तेव्हा भूक असेल.
भग्न मंदिरातील देवी,
आवाज, गोंगाट न करता उत्सवाचे किती दिवस
तुझ्या मंदिरात येतात.
दिवा न लावताच किती तरी रात्री
प्रार्थना, पूजा न करताच जातात.
तल्लख बुद्धीचे किती कारागीर
नवनवीन मूर्ती बनवतात. त्या मूर्ती त्यांची वेळ
येताच विस्मृतीच्या विरून जातात.
फक्त भग्न देवालयातल्या मूर्तीच
मृत्युहीन विस्मरणात अपूजीत राहतात.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈