डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग – ५५ – मार्था ब्राऊन फिंके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
शिकागो मध्ये मत्सराग्नि भडकलेला होता. मिशनरी तर विरोधात गेले होतेच पण बोस्टनला जेंव्हा स्वामीजी महाविद्यालयात व्याख्यान द्यायला गेले होते त्यावेळी च्या व्याख्यानाने विद्यार्थी भारावून गेले होते. इतके की,त्या दोन दिवसांच्या भेटीमुळे म्हणा किंवा स्वामींच्या दर्शनाने वा ऐकलेल्या विचाराने म्हणा, भविष्यात काहींचे जीवनच प्रभावित झाले होते. त्यातालीच एक विद्यार्थिनी होती, मार्था ब्राऊन फिंके. त्या दोन दिवसांच्या आठवणीवर मार्था तिचे आयुष्य बदलवू शकली.
मार्था ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ते स्मिथ कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं.स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी १८७५ मध्ये सोफाया स्मिथ यांनी हे महाविद्यालय स्थापन केले होते. हे कॉलेज एक वैचारिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. न्यू यॉर्क आणि बॉस्टन च्या बरोबर मध्यावर नॉर्थअॅम्प्टन हे मॅसॅच्युसेटस राज्यातले टुमदार गाव होतं. त्या गावात हे कॉलेज होतं. मार्थाचं घर थोडं जुन्या वळणाचं होतं. जुन्या संस्काराच होतं. प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते ते. त्यामुळे कॉलेजला बाहेर पाठवताना तिच्या आईवडिलांना तिची काळजी वाटत होती.बाहेर पडलेल्या मुली मुक्त विचारांच्या होतात असा सर्वांचा समज होता. कॉलेजला गेलेल्या मुली धर्म वगैरे मानत नाहीत असा अनुभव काहींचा होता.तिथे वसतिगृहात मुली राहत असत. वसतिगृहात जागा शिल्लक नसल्याने मार्था कॉलेज परिसरातच भाड्याने राहत होती.
ज्यांच्या घरात राहत होती ती घरमालकिण स्वभावाने कडक होती. पण चांगली होती. त्या कॉलेजमध्ये अधून मधून विचारवंत भेटी देत असत. असेच एकदा स्वामी विवेकानंद यांची नोहेंबर मध्ये दोन व्याख्याने असल्याचे तिथल्या सूचना फलकावर लिहिले होते. ते एक हिंदू साधू आहेत एव्हढेच त्यांच्या बद्दल आम्हाला माहिती होते असे मार्थाने तिच्या आठवणीत म्हटले आहे.ते एव्हढे मोठे आहेत हे माहिती नव्हते. त्यांची सर्व धर्म परिषदेतील किर्ति यांच्या पर्यन्त पोहोचलेलीही नव्हती.पण कुठून तरी कानावर आल की हे हिंदू साधू, मार्था राहत असलेल्या घरमालकिणी कडेच उतरणार आहेत आणि त्यांच्या बरोबर या मुलींचे जेवण पण असणार आहे. त्यांच्या बरोबर आम्ही मुली चर्चा पण करू शकणार होतो याचे तिला फार अप्रूप वाटले होते.त्यामुळे सर्वजनि घरमालकिणीवर जाम खुश होत्या. त्यांनी आपल्या या मालकिणीला उदार मतवादी म्हटले आहे कारण आपल्याकडे एका काळ्या माणसाची राहण्याची सोय करायची म्हणजे त्याला काळी हिम्मतच असावी लागते असे त्यांना वाटत होते.बहुतेक गावातील हॉटेलांनी त्यांना प्रवेश नाकारला असेल असेही त्यांना वाटलं.
मार्था म्हणते, आम्ही लहानपणापासूनच भारताचे नाव ऐकतं होतो कारण माझी आईसुद्धा हिंदुस्थानात जाणार्या मिशनर्याशी लग्न करणार होती.आमच्या चर्चमधून दरवर्षी भारतीय स्त्रियांसाठी मदतीची एक भली मोठी पेटी पाठवली जात असे. शिवाय त्यान काळात भारतबद्दल इतर माहिती अशी होती की, भारत हा एक उष्ण देश आहे. तिथे सगळीकडे साप फिरत असतात. तिथले लोक इतके अडाणी आहेत की, दगडा समोर किंवा लाकडासमोर डोके टेकवतात.बापरे . मारथाचे वचन चांगले होते तरी सुद्धा तिला भरता बद्दल फारशी माहिती नव्हती. ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीकोणातून लिहिलेली भारताची माहिती फक्त तिला माहिती होती. एखादा भारतीय भेटून त्याच्याशी बोलायला कधी संधी नव्हती मिळाली.
त्यामुळे मार्था च्या घरमालकिण बाईंकडे विवेकानंद हे हिंदू साधू उतरणार तो दिवस आला. त्या दिवशी पाहिलेले स्वामी विवेकानंद कसे होते याचं तिने वर्णन केलय की, ‘ते उतरणार ती खोली तयार करण्यात आली. भारदस्त व्यक्तिमत्व,एक कला प्रिन्स अल्बर्ट कोट,काली पॅंट ,डोक्यावर डौलदार फेटा घातलेला अलौकिक चेहर्याचा, डोळ्यात विलक्षण चमक असलेला,असा हिंदू साधू ! घरी आल्यावर सर्व जानी भारावून गेल्या. मार्था म्हणते, मला तर तोंडून काही शब्दच फुटत नव्हते.इतकी भक्तिभावाने ती हे व्यक्तिमत्व बघत होती. संध्याकाळी व्याख्यान झाले त्यानंतर प्रश्नोत्तरे.
घरी त्यांना भेटायाला तत्वज्ञानाची प्राध्यापक मंडळी, चर्चचे धर्माधिकारी, प्रसिद्ध लेखक, आले होते. चर्चा सुरू होती. सर्व मुली एका कोपर्यात बसून ऐकत होत्या. विषय होता, ख्रिश्चन धर्म – खरा धर्म. हा विषय स्वामीजींनी नव्हता निवडला, आलेल्या विचारवंत मंडळींनी निवडला होता. ते सर्व स्वामीजींना आव्हान देत होते. त्यांच्या त्यांच्या धर्माची माहिती असलेले मर्मज्ञ विषय मांडित. मार्थाला वाटले होते की स्वामीजी तर हिंदू त्यांना काय इकडचे कळणार व त्यावर कसे तोंड देणार? पण उलटेच झाले होते. स्वामी विवेकानंद आपली बाजू मांडताना, प्रती उत्तर देताना बायबल, इंग्रजी तत्वज्ञान, धर्मज्ञान, वर्डस्वर्थ, व थॉमस ग्रे यांचे काव्य संदर्भ देऊन बोलत होते. ठामपणे बोलत होते. स्वामीजींनी त्यांच्या बोलण्यातून धर्माच्या कक्षा अशा रुंद केल्या की त्यात सर्व मानवजात सामील झाली आणि वातावरण बदलून गेले. मुक्त विचारांनी दिवाणखान्यातील वातावरण भारावून गेले.या हिंदू साधुनेच बाजी मारली. त्यामुळे मी पण उल्हसित झाले असे मार्था ने लिहून ठेवले आहे. मार्था म्हणते आमच्या कॉलेज मधली मंडळी धर्माच्या बाबतीत फार संकुचित विचारांची होती. स्वतालाच ती शहाणी समजत. या बौद्धिक पातळीवरील चर्चेत स्वामीजींचा झालेला विजय मार्था च्या कायम लक्षात राहिला होता.
मार्थाने आणखी एक विशेष आठवण सांगितली आहे. तिथल्या वास्तव्यात दुसर्या दिवशी सकाळी, बाथरूममधून पाण्याचा आवाज व त्याबरोबर अनोळखी भाषेतले स्तोत्रपठण ऐकू येत होते. ते ऐकण्यासाठी सर्व मुली घोळक्याने दाराबाहेर उभ्या राहिल्या. एकत्र ब्रेकफास्ट च्या वेळी मुलींनी या स्तोत्राचा अर्थ स्वामीजींना विचारला.त्यांनी उत्तर दिलं, “प्रथम मी डोक्यावर पाणी ओततो . नंतर अंगाखांद्यावर. प्रत्येक वेळी सर्व प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून मी ते स्तोत्र म्हणतो”. हे ऐकून मार्था आणि मुली भारावून गेल्या. मार्था म्हणते, “मीही प्रार्थना करत असे पण ती स्वतसाठी आणि नंतर कुटुंबासाठी. समस्त मानवजातीसाठी व प्राणिमात्रासाठी आपलेच कुटुंब आहे असे समजून प्रार्थना करावी असे कधीच मनात आले नव्हते आमच्या”.
ब्रेक फास्ट नंतर स्वामीजी म्हणाले चला बाहेर फिरून येऊन थोडं, म्हणून आम्ही चार मुली त्यांच्या बरोबर गेलो . गप्पा मारत चाललो होतो, माला एव्हढेच आठवते की, ख्रिस्ताचे रक्त हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो. हे शब्द मला कसेचेच वाटतात असे ते म्हणाले होते.यावर मीही विचार करू लागले. मलाही हे उल्लेख आवडत नव्हते. पण चर्चच्या तत्वांच्या विरुद्ध उघडपणे बोलायचे धैर्य हवे. पण इथेच माझ्यातील स्वच्छंद आत्म्याने मुक्त चिंतांनाचा स्त्रोत त्या क्षणी खुला केला आणि मी कायमची मुक्तचिंतक झाले. विषय बदलून मी त्यांना वेदांबद्दल विचारले कारण त्यांनी आपल्या भाषणात वेदांचा उल्लेख केला होता. मी वेद मुळातून वाचावेत असे त्यांनी माला सांगितले. मी त्याच क्षणी संस्कृत शिकण्याचे ठरविले . पण ते शक्य झाले नाही पुढे.
यावरून एक गोष्ट गमतीची आठवली. उन्हाळ्यात आमच्याकडे नवीन गुर्नसी पारडू पाळीव प्राण्यांमध्ये समाविष्ट झाले. माझ्या वडिलांनी तो माझ्याकडे सोपविला. त्याचे नाव मी वेद ठेवले. दुर्दैवाने ते वासरू लवकरच मेले. माझे वडील गमतीने म्हणाले की तू त्याचे नाव वेद ठेवले म्हणूनच ते गेले.
नंतर स्वामीजी परत एकदा अमेरिकेत येऊन गेले, ते कळले नाही. मग काहीच संबंध नाही आला. पण त्या दोन दिवसात स्वामीजींच्या विचाराने मार्था चे जीवनच उजळून गेले असे ती म्हणते. तिने वडिलांना पत्र लिहून हा वृत्तान्त कळवला तर ते घाबरून गेले. आपल्या घराण्याचा धर्म सोडून ही स्वामीजींबरोबर त्यांची शिष्या होऊन निघून जाते की काय अशी त्यांना भीती वाटली.
मार्था ने तिचे हे स्वतंत्र विचार तिच्यापुरतेच मर्यादित ठेवले. तिच्या मते मी लगेच हे अमलात आणले असते तर, जीवनात मला लगेच त्याचा उपयोग झाला असता. खूप वेळ वाया गेला. पण ती निराश नाही झाली. आतापर्यंत जरी चाचपडली असली तरी विचार पेरले गेले आहेत ते उगवणारच असा तिला विश्वास होता. स्वामीजींनी सांगितलेला वैश्विक धर्म तिच्या अंतकरणात जाऊन बसला होता. ती १९३५ मध्ये जवळ जवळ ४२ वर्षानी, भारतात पहिल्यांदा कलकत्त्यात आली तेंव्हा, प्रथम ती एक प्रवासी म्हणून तिचा प्रवास सुरू झाला तर भारतात पोहोचल्यावर गंगेच्या काठावरील बेलुर मठात स्वामी विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीचे, समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण एक विश्वधर्माचे यात्रेकरू आहोत याची मनोमन खात्री झाली. तिथेच आत्मिक आणि मानसिक उन्नतीची ओढ असणार्या मार्था ने या आठवणी सगळ्यांच्या आग्रहाखातर सांगितल्या आहेत. मार्था जर दोन दिवसांच्या विचाराने एव्हढी प्रभावित झाली असेल तर आपल्याकडे हे तत्वज्ञान बारा महीने चोवीस तास उपलब्ध आहे विचार करण्याची गोष्ट आहे .
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈