☆ 🇮🇳 तिरंगा 🇮🇳 ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)
🇮🇳
पूर्वी आठ आण्याला मिळायचा
आता तो दोन रूपायला मिळतो
माझा मुलगा तिरंगा
छातीला लावून फिरतो
☆
मलाही लपेटतील का?
असे तिरंग्यात
टिव्ही वरचा कार्यक्रम पाहून विचारतो
त्याकरिता देशासाठी शहिद व्हावे लागते
मी एवढ्यावरच थांबतो
☆
असतो कधी क्रिकेटचा सामना
भारताचा पाकिस्तान बरोबर
तेव्हा मात्र त्याचा आणि माझा
देशाभिमान जागा होतो खरोखर
हाती तिरंगा आणि एक पिपाणी घेऊन
दोघे बसतो टिव्ही समोर
खरेच सांगतो त्या दिवशी
बायकोच्याही जीवाला लागला असतो घोर
☆
परवा आला सांगत
झाली आहे माझी निवड एन सी सी मध्ये
देणार आहोत तिरंग्याला सलामी
स्वातंत्र्य दिनाच्या संचलनामध्ये
किती दिवस चालली होती
त्याची तयारी
पाहून सारे प्रयत्न त्याचे
माझ्या मनाला उभारी
☆
आता तो तिरंग्यासाठी
पैसे मागत नाही
सामना कुठला जिंकला म्हणून
तिरंगा घेऊन गल्लीतून फिरत नाही
तिरंग्याचे महत्व म्हणे
कळले आहे त्याला
बाप म्हणून याचाच
अभिमान वाटतो आहे मला
☆
कवी : म. ना. दे.
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈