??

☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆

(मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”) इथून पुढे …

“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.” 

“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा   शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.

गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये  (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप”  घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.

“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.”  गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.  

त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस

मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.

खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.

— समाप्त —

© श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

Shrikaant.blogspot.com

Shrikantkulkarni5557@gm

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments