श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 146 ☆ संत सखू… ☆ श्री सुजित कदम ☆
संत सखू भक्ती भाव
दावी नाना चमत्कार
अंतरीची हरीभक्ती
पदोपदी साक्षात्कार…! १
साधी भोळी सवाशीण
सासरचा सोसे छळ
मर्यादेच्या पार नेई
दृढ निश्चयाचे बळ…! २
भावपूर्ण तळमळ
अनिवार इच्छा शक्ती
सासरच्या जाचालाही
मात देई विठू भक्ती…! ३
विठ्ठलाच्या चिंतनात
दूर झाला भवताप
युगे अठ्ठावीस उभे
विटेवरी मायबाप…! ४
नाव विठ्ठलाचे घेण्या
नाही कधी थकणार
संत सखू वाटचाल
पांडुरंग नांदणार…! ५
संत सखू वाटसरू
सुख दुःख पायवाट
जगुनीया दाखविले
प्रारब्धाचा दैवी घाट…! ६
अत्याचारी सासराला
नाही कधी दिला दोष
कृतज्ञता मानुनीया
विसरली राग रोष…! ७
दुराचारी कुट़ुंवाने
दिली प्रेरणा भक्तीची
अव्याहत हरीनाम
जोड ईश्वरी शक्तीची…! ८
दुःख दैन्य साहताना
संत सखू दावी वाट
नाही कोणा प्रत्युत्तर
पचविली दुःख लाट…! ९
पांडुरंग दर्शनाची
पुर्ण करी आस हरी
रूप सखुचे घेऊनी
नांदे पांडुरंग घरी…! १०
हरिभक्ती अनुभूती
हरिभक्ती पारायण
सांसारिक वेदनांचे
संत सखू शब्दायण…! ११
गेली पंढरीस सखू
पुर्ण केली तिने वारी.
घरकाम करताना
पांडुरंग झाला नारी…! १२
मोक्षपदी गेली सखू
इहलोक सोडूनीया
पांडुरंग आशीर्वादे
आली घरा साधूंनीया…! १३
श्रद्धा विठ्ठलाच्या पायी
संत सखू भक्ती भाव
वसवून गेला जगी
अध्यात्माचा नवा गाव…! १४
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈