सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
“जन पळ भर म्हणतील हाय हाय” ह्या ओळी जरी सरसकट ख-या असल्या तरी काही व्यक्तींच्या बाबतीत ह्या लागू होत नाही हेच खरे. सहा फेब्रुवारी! मागील वर्षी ह्याच तारखेला आपल्यातून लता मंगेशकर गेल्या.अर्थातच आपल्यासाठी त्या इतकी मोठी गाण्यांची ईस्टेट ठेऊन गेल्यात की रोज अजूनही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आपला. त्यांना वर्षश्राद्धदिनी विनम्र अभिवादन.
ही तारीख अजून एका जादुई शब्दांची किमयागाराची आठवण करुन देणारी तारीख. आज कवी प्रदीप ह्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.
लता म्हणजे एक अद्भुत आश्चर्य, लता म्हणजे साक्षात सरस्वती, लता म्हणजे एक जादू. आणि कवी प्रदीप हे सुप्रसिद्ध गीतकार.
कवी प्रदीप ह्यांच मूळ नावं रामचंद्र नारायण द्विवेदी. कवी प्रदीप ह्यांच नाव घेतल्याबरोबर “ए मेरे वतन के लोगो” हे अजरामर गीत कानात गुंजायला लागतं. ह्या गाण्याला अतीशय सुंदर शब्दांत निर्मिलयं कवी प्रदीप ह्यांनी तर गोड गळ्याने भावपूर्ण सुस्वर गाऊन सजवलयं लता मंगेशकर ह्यांनी. हे देशभक्तीपर गीत ऐकून आजही नशा चढते देशप्रेमाची,आठवतं शहीदांचे बलिदान. 1962 मध्ये झालेल्या चीन भारताच्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.काही प्रदेश आणि त्याहूनही अनमोल असलेल्या सैनिकांचे प्राण गमवावे लागले.ह्मा गीताचे थेट प्रक्षेपण लता मंगेशकर ह्यांनी 27जून 1963 रोजी रामलीला मैदानावर केले. तेव्हा पंडीत नेहरुंच्या डोळ्यात शहीदांचे बलिदान आठवून अश्रु दाटले.ह्या गीताची रक्कम कवी प्रदीप ह्यांनी “युद्ध विधवा सहायता निधी” मध्ये वळती करायला लावली. कवी प्रदीप ह्मांनी तब्बल 1700 गीतं लिहीलीतं
त्यामध्ये “जय संतोषी माँ,चल चल रे नौजवाँ., आओ बच्चो तुम्हे सिखाए” ही गीतं खूप प्रसिद्धीस पावली.
लता मंगेशकर ह्यांच्या गाण्यांविषयी माहिती लिहायला गेलं तर पुस्तकही लहानच पडेल. लता मंगेशकर ह्या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना गौरविल्या जातं. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
लता मंगेशकर ह्यांना दिदी म्हणूनही संबोधल्या जातं.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. आजच्या पोस्ट मध्ये त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी बघू.
त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्स चा सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेत्या होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे. ज्युरींनी त्यांना हा पुरस्कार “दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी” प्रदान केला आहे.
त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायलीत.तरी त्यातून काही गाण्यांना पुरस्कार मिळालेत ते खालीलप्रमाणे.
“परिचय “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
“कोरा कागज “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,”लेकीन” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, “चोरी चोरी” चित्रपटातील ‘रसिक बलमा’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.”मधुमती”मधील “आजा रे परदेसी”,”बीस साल बाद”मधील “कही दीप जले कही दिल”,”जीने की राह” मधील “आप मुझे अच्छे लगने लगे” हम आपके है कौन मधील “दीदी तेरा देवर दिवाना” साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..!
खरंच लता मंगेशकर ह्या भारताची “शान” होत्या आणि कायम राहतील. दिदींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कवी प्रदीप ह्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुनश्च एकदा अभिवादन.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈