श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 147 ☆ संत सावता माळी… ☆ श्री सुजित कदम ☆
अरणचे दैवू माळी
पंढरीचे वारकरी
संत सावता जन्मले
कुटुंबात शेतकरी…! १
वृत्ती सज्जन धार्मिक
शुद्ध चारित्र्य सचोटी
नाम सावता शोभले
सांप्रदायी ठैव मोठी…! २
पिढीजात शेतकरी
फुलवला शेतमळा
ऐसी माळियाची जात
हरी भक्ती कळवळा….! ३
भक्ती आणि संसाराचा
साधुनीया ताळमेळ
बागायती शेतमळा
शेतीसाठी दिला वेळ…! ४
मोट नाडा बैलजोडी
सावत्याची ही पंढरी
मोक्ष मुक्ती नको म्हणे
नांदे विठ्ठल अंतरी…! ५
जप जाप्य कर्मकांड
हवा कशाला देखावा
पिकवोनी शेतमळा
त्यात विठ्ठल शोधावा… ! ६
अनासक्त वृत्तीतून
साधियला परमार्थ
कांदा मुळा भाजी संगे
दिला सात्विक भावार्थ…! ७
अंधश्रद्धा दांभिकता
घणाघाती केले वार
नामसंकीर्तन करा
पहा विठ्ठल साकार…! ८
नीतिमत्ता, सहिष्णुता
निर्भयता सदाचार
ईश्वरास आळविले
सावत्याने शब्दाकार…! ९
कर्मयोग सावत्याचा
निष्ठा जीवन अभंग
नवरस परीपुर्ण
रससिद्ध काव्य रंग…! १०
शांत वत्सल करुण
दास्य भक्ती अभंगात
राखी सावत्याचा मळा
नाचे विठ्ठल मळ्यात…! ११
देई सावत्या संदेश
वाचे आळवावा हरी
केली नाही कधी वारी
आला विठू शेतावरी…! १२
वैकुंठीचा देव त्यांनी
मेळवीला संकीर्तनी
माळी सावत्याचे घरी
विठू रंगला कीर्तनी….! १३
संतवाणी सावत्याची
जनलोकी प्रासादिक
हरिभक्ती वानवळा
झाला अभंग पौष्टिक …! १४
कर्म कर्तव्याची जाण
हीच खरी ईशसेवा
शेतमळा राखणीने
दिला हरी भक्ती ठेवा…! १५
आषाढीच्या वारीतून
संत जाती पंढरीला
पांडुरंग करी वारी
येई अरणी भेटीला…! १६
नवे शब्द रुपकांनी
शब्द मोती अभंगात
निजरूपे विठ्ठलाची
सावत्याच्या अंतरात..! १७
आषाढीची चतुर्दशी
घेई सावत्या निरोप
समाधिस्थ होता क्षणी
अभंगांचे फुले रोप…! १८
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈