डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(मी तुमच्यातलाच एक आहे,पण बाई म्हणून नाही जगणार !”) — इथून पुढे —
लक्ष्मी आणि इतर बायका बघतच बसल्या. “ अरे, तुला टोचा मारून मारून दुनिया जगू देणार नाही पोरा ! तुझ्यावर कधीतरी बलात्कार होणार, असे घाणेरडे आंबट शौकी लोक आहेत बाबा दुनियेत !”
“ मावशी, तुम्ही वाचवाल ना मला? तुमच्यातला एक काहीतरी वेगळं करू बघतोय, तर मला द्या ना संधी. नाहीच जमलं तर आहेच, भीक मागत फिरणं हो.” लक्ष्मी, शबनम गहिवरल्या. त्यांनी श्यामची अलाबला घेतली. “ कर पोरा काय हवं ते ! आहे आमची वस्ती तुझ्यामागं. चला ग ! ए पोरा, लक्ष आहे आमचं तुझ्यावर. मोकळा सोडणार न्हाय. न्हाय जमलं तर यावच लागलं झक मारत ! चला गं !’
श्यामने सुटकेचा निश्वास टाकला. सगुणा घाबरून त्या सगळ्यांकडे बघत होती. “ लेकरा,ह्याला मी जबाबदार आहे ! का घेतली मी असली औषधं आणि तुझा नाश केला रे.”
“ आई,असं म्हणू नको ! माझ्याच नशिबात हे होतं. एवढं होतं तर त्याच वेळी मारून टाकायचस गं. तुम्ही आणि मी सुटलो असतो.” उद्वेगाने श्याम म्हणाला. “ काय ग हे माझं आयुष्य. खेचराची जात आमची. धड बाई नाही की धड पुरुष नाही. काय आहे ग मला भावी आयुष्य?”
शामचा तोल सुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. “ आई,मी बाहेर शांत असतो, पण आत शंभर मरणं मरत असतो. मला लोकांसारखे साधे सरळ आयुष्य नाही. मरण सुद्धा नाही ग माझं नॉर्मल. कशाला मला जिवंत ठेवलंस? त्याच वेळी मारून टाकायचं ना!”
सगुणाने त्याला मिठीत घेतले. “नको लेकरा असं बोलू. कोणी नसेल तर मी जिवंत असेपर्यंत तुला आधार देईन. मला असं त्या लक्ष्मीसारख्या लोकांत नाही रे जाऊ द्यायचा तुला पोरा. निदान देवानं कला दिलीय हातात, तर उपयोग कर बाळा त्याचा. “
श्याम हळूहळू शांत झाला. त्याने डोळे पुसले, आणि कॉलेजला निघून गेला. श्याम सगळ्या परीक्षा उत्तम श्रेणीने पास झाला. त्याच्या हातात स्वयंपाकाची दैवदत्त कला होती. त्याने केलेले केक्स आणि त्याची डेकोरेशन्स भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावत.
अशीच शेवटच्या वर्षी कुकिंगची स्पर्धा होती. दिल्लीहून मोठे मास्टरशेफ आले होते.
सर म्हणाले, “ श्याम, तू का भाग घेत नाहीस? तुला नक्की बक्षीस मिळेल. नाही मिळाले तर निदान या मोठ्या लोकांशी ओळखी तर होतील ना? आता हे शेवटचे वर्ष तुमचे ! भविष्याचा विचार करायला हवा तुम्ही मुलांनी.”
श्याम खिन्न हसला.म्हणाला, “ सर,तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेत हेच खूप आहे हो माझ्यासाठी.. माझी टवाळी,कुचेष्टा नाही झाली आपल्या कॉलेज मध्ये.”
सरांना भरून आले. “ श्याम,तू माझ्यासाठी एन्ट्री दे. कोणी काही का म्हणेनात. लक्षात ठेव, परीक्षकसुद्धा तुला हिणवतील, कुचेष्टा करतील, पण तू हरु नकोस. तुझ्या बोटातली जादू येऊ दे जगासमोर ! “
वर्गातील मुलांनीही आग्रह केला आणि श्यामने घाबरत एन्ट्री फॉर्म भरला. त्याच्या वर्गातली टॉपर शलाकाही होती फॉर्म भरायला. “ श्याम, तू भरलास फॉर्म म्हणजे मी कसली येणार रे फायनल राऊंड पर्यंत !”
श्याम निष्पापपणे म्हणाला, ” शलाका, मी नको का भरू फॉर्म? तुला पुढे खूप चान्सेस आहेत ग ! माझं काय, मला अंधारच आहे बघ सगळा.”
शलाकाने त्याचे डोळे पुसले.” वेड्या, सहज कौतुकाने म्हणाले रे मी ! तू जिंकतोस की नाही बघच ही स्पर्धा. मी आहे की तुझ्याबरोबर! “
श्यामची प्राथमिक फेरीत निवड झालीच. त्याने केलेले दोन पदार्थ केवळ लाजवाब होते. त्याला सिलेक्ट केले तिथल्या तिथे. श्यामची खरी स्पर्धा सुरू झाली. कधी नावे सुद्धा न ऐकलेले पदार्थ आणि त्या कृती. वर प्रात्यक्षिक चालू असताना, धैर्य खच्ची करणाऱ्या परीक्षकांच्याच कॉमेंट्स.
फिनालेपर्यंत पोचला श्याम. एव्हाना, टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलाच माहीत झाला होता श्याम.त्याचे उत्कृष्ट पदार्थ तर त्यांना आवडूच लागले. कोणालाही सुचणार नाहीत असे पदार्थ तो दिलेल्या मोजक्या सामानात आणि वेळात सहज करून दाखवी.
हळूहळू चेष्टा करणाऱ्या परीक्षकांचाही आवडता झाला श्याम. शेवटच्या तीन स्पर्धकात शलाकाही पोचली होती.
आज चार स्टार असलेल्या मिशेलिन शेफ कुणाल ने केलेला चार मजली केक करून दाखवायचा होता. ५० मिनिटात कुणालने तो करून दाखवला. सामान, कृती आजीबात लिहिलेली नव्हती. सगळे नुसते लक्षात ठेवूनच ९० मिनिटात, पॅन्ट्रीतून सामान आणण्यापासून सर्व काही करायचे होते.
बेल वाजल्याबरोबर सगळे धावत सुटले आणि सामान घेऊन आले. श्यामनेही कामाला सुरुवात केली.
शेफ कुणाल जवळ आले, म्हणाले, “ काय श्याम ! इथपर्यंत मजल मारली खरी,पण बाकीचे दोन कॉम्पिटीटर कमी नाहीत बरं का. जरा चूक झाली तर घरी जायचे लगेच !”
श्याम शांतपणे काम करत होता.
शेवटच्या पंधरा मिनिटात, मोठे मोठे शेफ स्पर्धा बघायला आमंत्रित केले होते. सगळीकडे बातमी पोचली होती — एक तृतीयपंथी मुलगा फायनलपर्यंत पोचलाय. कौतुकमिश्रित कुतूहलाने सगळे वरच्या गॅलरीतून तिघांचे फायनल टचेस बघत होते.
तिघांच्यात शलाकाचा केक केवळ अप्रतिम झाला होता. लोकांना खात्री होतीच, शलाकाच विनर होणार म्हणून.
फायनल आईसिंग करताना शलाकाच्या लक्षात आले की,आपण आईसिंग शुगर विसरलोय. ती हताश झाली. टीव्हीवर लाइव्ह प्रोग्रॅम दाखवत होते. श्यामने कुणाल सरांना विचारले “ सर माझं सगळं काम झालंय. मी देऊ का उरलेली शुगर त्यांना?”
कुणाल हसले. म्हणाले, ” नो.इथे कोणी कोणाचे नसते श्याम ! अशी मदत केलेली चालत नाही दुसऱ्या कँडीडेटला. सो स्वीट आर यू डिअर.”
वेळ संपल्यावर तिघांचेही केक ट्रॉलीवरून नेऊन परीक्षकांना दाखवले गेले. तीनही परीक्षकांनी खाऊन बघितले आणि कुणाल उठून उभे राहिले. ” श्याम मी कबूल करतो, तू आज हा केक माझ्यापेक्षा उत्तम करून दाखवला आहेस. तू जन्मजात शेफ आहेस खरा.”
तिन्हीही परीक्षकांनी एकमुखाने शामचा केक उत्कृष्ट ठरवला. होताच तो सर्वोत्तम. श्यामला मास्टरशेफचा मानाचा कोट कुणालने चढवला. पंचवीस लाख रुपये आणि एक टीव्ही शो असे भव्य प्राइझ त्याला मिळाले.
श्याम हुंदके देऊन रडायला लागला. त्याची खेडवळ आई, वडील, भाऊ, सगळे घाबरून,अंग चोरून प्रेक्षकांत बसले होते.
श्याम म्हणाला, ” मी तृतीयपंथी आहे, हे मी कधीही लपवून ठेवले नाही. देवाने आमच्यावर फार मोठा अन्याय केलाय, पण मी त्याला कधी दोष दिला नाही. आज त्याच देवाने, ही कला माझ्या हातात ठेवली आणि तुमच्यासारख्या लोकांनी माझे कौतुक केले. मला दुसरे काही नको. हे श्रेय माझ्या आईला देईन मी. मला ती लहानपणापासून बरोबर स्वयंपाक करायला न्यायची. माझी आई अतिशय सुगरण आहे. कदाचित त्याचमुळे मी केटरिंग करायचा निर्णय घेतला असावा. आणि सर्वात महत्वाचे, शेफ नेहमी हॉटेलमध्ये आत असतो, लोकांसमोर थोडाच येतो? मला लोकांसमोर यावे लागणार नाही आणि मी असा असल्याने सतत किचन मधेच असेन – हाही एक फायदाच की !”
साधा सरळ श्याम लोकांना मनापासून आवडला. शामच्या आईची पण एक मुलाखत घेतली गेली. तेव्हा तर ती रडलीच. म्हणाली, “ या माझ्या लेकराने लई सोसलय हो लोकानो. किती अपमान, किती चेष्टा. शाळेतून पळून यायचं पोरगं. इथपर्यंत तुम्ही मायबापानी आणलं. असंच लक्ष राहू द्या.”
श्यामचं नाव एका रात्रीत जगभर झालं. एक तर तो खरोखरच या सन्मानाला पात्र होता. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांप्रमाणे सहज हार न मानता, जिद्दीने त्याने कॉलेजशिक्षण पुरे केले होते.
—- आज ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला तृतीयपंथी होता.
आज श्याम भारतात रहात नाही. त्याला मास्टरशेफ किताब मिळाल्यावर देशोदेशी बोलावणी आली. श्यामने बँकॉक पसंत केले, जिथे त्याच्यासारख्या तृतीयपंथीयांना समाजात हीन लेखत नाहीत.
आज श्यामचे बँकॉकला मोठे स्टार हॉटेल आहे, आणि त्यात मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत फक्त आणि फक्त तृतीयपंथी लोकच काम करतात.
— बँकॉकमधले अतिशय नावाजलेले अप्रतिम हॉटेल !! “ श्याम’स् हॉटेल !!!”
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈