चित्रकाव्य
झाला फांदीचा चमचा… श्री प्रमोद जोशी ☆
☆
झाला फांदीचा चमचा,
नवनीत झाले ढग!
अशा लोण्याच्या ओढीने,
झाले बालकृष्ण जग!
☆
कृष्ण रांगत येणार,
आली चमच्या पालवी!
अशा चित्रामुळे कळे,
जग कन्हैय्या चालवी!
☆
निळ्या अनंतासमोर,
असे दिसताच लोणी!
सांगा बालकृष्णाविणा,
दुजे आठवे का कोणी?
☆
चराचर बघे वाट,
कुठुनही यावा कान्हा!
निळ्या निळ्या आकाशाला,
पुन्हा पुन्हा फुटो पान्हा!
☆
धुके लावी विरजण,
वारा घुसळतो दही!
निळ्या कागदावरती,
फांदी..ईश्वराची सही!
☆
लोण्यावर किरणांची,
आहे नजर तेजस्वी!
वाट पहात कान्ह्याची,
त्यांची प्रतिक्षा ओजस्वी!
☆
अनंताच्या भुकेसाठी,
घास व्यापतो आकाश!
सूर्य निरांजन होतो,
मग सात्विक प्रकाश!
☆
चित्रकारा नमस्कार,
त्याची दृष्टी शोधी दिव्य!
साध्या फांदी नि ढगाना,
गोकुळाचे भवितव्य!
☆
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈