सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९५.
या जीवनाचा उंबरठा मी प्रथम ओलांडला
त्या क्षणाची जाणीव मला नव्हती.
मध्यरात्री अरण्यात कळी फुलावी तसं मला
उमलू देणारी ती शक्ती कोणती बरं?
सकाळी उजेडात डोळे उघडून पाहिले
तेव्हा आपण या जगात परके नाही,
हे क्षणात माझ्या ध्यानी आले.
माझ्या आईच्या रूपानं निनावी आकारहीनानं मला आपल्या
हातात घेतलं आहे असं मला जाणवलं.
माझ्या मृत्यूच्या वेळी सुद्धा तीच अनोळखी शक्ती
जशी मी तिला ओळखत होतो,प्रकटेल.
जीवनावर मी प्रेम केलं तसंच मी मरणावरही प्रेम करेन,
हे मला ठाऊक आहे.
माता आपल्या उजव्या स्तनाजवळून बालकाला
दूर करते तेव्हा ते रडतं,
पण ती त्याला डाव्या स्तनाला लावते
तेव्हा क्षणात त्याला समाधान लाभतं.
९६.
मी इथून जाईन तेव्हा जातानाचा निरोपाचा शब्द
हाच असावा –
मी इथं जे पाहिलं ते उत्कृष्ट आणि अद्वितीय होतं.
प्रकाश सागरावर बागडणाऱ्या कमळातील लपलेला मध मी चाखला आणि मी पुनीत झालो.
हाच माझा निरोपाचा शब्द असावा.
अगणित आकाशाच्या खेळघरात मी खेळलो
आणि निराकाराचं दर्शन मला इथं झालं.
जे शब्दातीत आहे त्याचा स्पर्श मला झाला
आणि माझं सर्वांग थरथरून गेलं.
शेवटच व्हायचा असेल तर तो इथंच व्हावा.
हाच माझा अखेरचा शब्द असावा.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈