श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
इंद्रधनुष्य
☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
गावातले मोठ्ठ सरकारी हॉस्पिटल. चांगलं चार पाच मजली. हॉस्पिटलच्या इमारतीवरील घड्याळतला काटा रात्रीच्या नऊ वर सरकला. तसे फ़ार काही वेळ झाली नव्हती पण बाहेर रास्त्यावर आज का कोण जाणे रात्रीचे बारा एक वाजले असावेत असे वाटणारी भयाण शांतता होती.
हॉस्पिटलच्या आत सर्व रोगी आपापल्या रूममध्ये आपापल्या कॉटवर पडले होते. काहीजण झोपी गेलेले, काही झोपण्याच्या तयारीत, काही कॉटवर बसलेल्या नातेवाईकांशी बोलत होते.
हॉस्पिटलमधल्या मोठ्या हॉल मधील कोपऱ्यातील कॉटवर एक पेशंट अत्यवस्थ होता. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. तो पेशंट सत्तरीच्या घरात असावा. चेहरा सुकलेला. डोळे खोल खोल गेलेले.
डॉक्टर शेजारीच होते त्या पेशंटच्या. त्याला तपासायला आले असावे. कॉट शेजारच्या टेबलावर त्याचे वैद्यकीय रिपोर्ट होते. ते पाहून अधिकच गंभीर होताना दिसत होते डॉक्टर. गेले पंधरा दिवस झाले औषधे, इंजकशनाने त्याला होतं असलेल्या जीवघेण्या वेदना कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत होते.तेथेच असलेली नर्स त्या पेशंटची खूप काळजी घेतं होती.
सारे आसपासच्या कॉटवरील पेशंट, डॉक्टर आणि ती नर्स काय समजायचे ते समजून गेली होती. डॉक्टरांनीनर्सच्या कानात काही सांगितले. हळुवार पावलांनी त्यांनी वार्ड सोडला.
रिसेप्शन काउन्टरवरला फोन उचलला. टेलेफोनची डायल फिरवली……
पठाणकोट लष्करी छावणीतला फोन वाजला.
‘ मी डॉक्टर, मोकाशी, गव्हर्मेंट हॉस्पिटल मुबंईहून बोलतोय.’
‘ हां जी, मै कॅप्टन बालवरसिंग….’
‘ बालवरर्सिंगजी ये देखो भाई डॉक्टर मल्होत्राको फौरन मुंबई हॉस्पिटलमे भेज दो. पेशंट सिरीयस है. ‘
बोलून फोन खाली ठेवला.
त्या वृद्धाची अवस्था खूपच वाईट झाली होती. डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न चालला होता त्याचा. ओठ हालत होते त्याचे पण ओठातून शब्द बाहेर येतं नव्हते. आपली एहलोकांची यात्रा संपत चालल्याचे त्याला त्या अवस्थेत कळले असावे. त्याचा जीव एकुलत्या एक मुलात गुंतला होता. त्याची अखेरची भेट व्हावी वाटत असावे त्याला. त्याचा चेहरा सांगत होता हे. मरणाच्या दारात माया माणसाला अडकवून ठेवते. माणसाच्या जवळ येत त्याला बिलगते.
औषध एका प्याल्यातून नर्सने त्या विकलांग पेशंटच्या ओठाशी लावले. औषध ओठातून गळून पडले.
नर्सने मनगटी घड्याळात पहिले. रात्रीचा एक वाजला होता. वार्डच्या दाराशी हालचाल झाली. नर्सने दाराच्या दिशेने पहिले….
डॉक्टर मोकाशी एक लष्करी जवानांस बरोबर घेऊन येतं होते.
नर्सने त्या विकलांग वृद्ध पेशंटच्या अंगावरील चादर नीट केली. डॉक्टर मोकाशी व जवान दोघेजण वृद्ध पेशंट जवळ आले. जवानाने पहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा हलली नाही. चकित झाले डाक्टर आणि नर्स. आपला वडील मरणासन्न आहे हे दिसत असूनही त्याची स्तब्धता जीव कापून गेली.
काही क्षणात त्या जवानाच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.
‘ बाबा, तुमचा मुलगा भेटायला आला आहे. ‘ म्हणत ओक्सबोकशी रडत जवान त्या पेशंटच्या अंगावर पडला.वृद्धाचा सुरकुत्या पडलेला हात आता
जवानाच्या पाठीवरून फिरू लागला.विकलांग वृद्धाच्या डोळ्यात आनंद धो धो वहात होता.किलकिल्या डोळ्यात तो विकलांग वृद्ध मुलाला साठवून घेतं होता. अस्पष्ट अस्पष्ट मुलांची आकृती दिसत असावी त्याला. त्या मुलाच्या अस्पष्ट दर्शनाने सुखावला होता तो. थरथरत्या ओठानी तो वृद्ध मुलाचे हात चुंबत होता. डोळ्यातून त्याचे दोन अश्रू टपकले काना खालून त्या जवानाच्या हातावर पडले
वृद्धाचे ओठ समाधानाने थरथरत होते. जवानांने आपला हात त्या वृद्धाच्या हाती दिला. वृद्धाचे डोके कपाळ कुरवाळू लागला. जवानांच्या खांद्यावरून फिरणाऱ्या वृद्ध हाताचा वेग मंदावत चालला… मंदावत .. मंदावत थाम्बला. वृद्धाने मान टाकली. जवानांने त्याचा हात वृद्धाच्या हातून सोडवला. वृद्धाकडे पहिले थोडेसे. चादर ओढून घेतली त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर.
त्या भयाण शांततेत घड्याळाची टिक टिक फक्त जीवघेणा आवाज करीत होती. वृद्धाच्या कॉट शेजारील टेबलावरील औषधाच्या अवाक होतं उघड्या पडल्या होत्या.
‘ सिस्टर, हा पेशंट कोण होता ? ‘
त्या जवानांने विचारले. या प्रश्नाने त्या नर्सला धक्काचं बसला.
‘ हे काय तुमचे वडील ना ते ? त्यांना ओळखत नाही ?
नर्सने प्रतिप्रश्न केला.
‘ नाही हे माझे वडील नाहीत. चुकीच्या माहितीमुळे मी इकडे आलो. आल्यावर मी जाणले. या वृद्धाची काहीच मिनिटे राहिलीत. त्याला फक्त मुलाला अखेरचे भेटायचे होते. हे मला समजले. खरे सांगण्यात आता अर्थ नाही. त्यांच्या क्षीण झालेल्या दृष्टीला मुलगा ओळखता आला नाही. जवानच त्याचा मुलगा झाला.माझा हात त्यांच्या हाती दिला. हात हाती येताच समाधानाने त्याने प्राण सोडला.
जड अंतकरणाने तो जवान दवाखान्याच्या वार्डाबाहेर पडला. नर्स त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.
लेखक – श्री शशिकांत हरिसंगम
वालचंदनगर
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈