जीवनरंग
☆ “एक लगीनगाठ…” भाग 2 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆
(मागील भागात आपण पाहिले – यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते. आता इथून पुढे –
दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यावर दहाच्या दरम्यान तिथला लक्ष्मी-विलास पॅलेस पाहायला जायचे होते. आप्पाना त्यात फार औत्सुक्य नव्हते, मात्र श्रीकांतला तो पहाण्यात खूप उत्सुकता होती. रमेश आणि सुजाता दोघेही बरोबर होते. काकांमुळे या दोघांनाही इथले कांही कर्मचारी ओळखत होते. काकांच्या त्या घरापासून अर्धा कि. मी. आत अंदाजे चारशे-पाचशे एकरातील निसर्गरम्य परिसरातील तो लांबीला अंदाजे पाचशे फूट , रुंदीला दोनशे फूट आणि तितकाच उंचीला असलेला प्रशस्त महाल म्हणजे जाणत्याना पडणारे एक स्वप्न असावे इतका तो देखणा होता. कांही कांही वास्तूंचे शब्दात वर्णन अशक्य असते, बस्स …पाहायचं आणि जेवढं डोळ्यात सामावेल तेवढं स्मृती पटलावर कोरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा , एवढं करणं शक्य होतं. आप्पा तटस्थपणे पहात होते, माई विस्मयाने पहात होत्या व श्रीकांत जे दिसतंय त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करीत होता. भारतीय, पर्शियन आणि इटालियन वास्तुकलेचा अद्भुत संगम असा तो महाल होता. आतून त्यांच्या नियोजित वापराप्रमाणे शैली व बाहेरून बव्हंशी इटालियन शैली असावी असे श्रीकांतला वाटले. सुजाता व रमेश त्यांना जे माहीत होते ते सांगत होते , पण त्या ऐकीव इतिहासाच्या पलीकडील ती बांधलेली, ठेवलेली, तासलेली, रंगविलेली कलाकृती होती. तिथल्या दर्शनीय वस्तू श्रीकांतने केवळ पुस्तकातून वाचलेल्या होत्या. नाही म्हणायला राजा रविवर्मा यांनी पुरुष आकारात साकारलेली व भिंतीवर माउंट केलेली धार्मिक चित्रे सर्वांच्या मनाचा ठाव गाठून गेली. धावत धावत सगळ्या तलवारी, भाले, स्टेच्यु, मूर्ती, वॉल हँगिंग, चित्रे, दगड, धोंडे, खडे, पुस्तके, राजांच्या वंशावळींचे माउंटिंग, सादर केलेली मांडणी, तिथली अनेक दालने, सगळे सगळे पाहायला अडीच ते तीन तास लागले. जेंव्हा सर्वजण बाहेर आले, तेंव्हा एखाद्या जादूनगरीतून आल्यासारखे त्या सर्वांना झाले. घरापर्यंतचे जाणे आणि दुपारचे भोजनदेखील लक्ष्मी-विलास च्या चर्चेत संपले.
सायंकाळी पाच वाजता चहा झाल्यानंतर आप्पानी एका गंभीर विषयाला तोंड फोडले. श्रीकांतच्या ध्यानी मनी नसलेला तो विषय होता. आप्पा बोलले ,
“श्रीकांत, आपण फक्त यशवंतला भेटायला आणि बडोदा पाहायला आलेलो नाही, तर आठ वर्षांपूर्वी तुझ्या आक्काच्या लग्नात ठरविलेले एक महत्वाचे वचन निभावायचे आहे व ते तुझ्या आयुष्याशी संबंधित आहे. खरे म्हणजे त्यासाठी आपण आलोय .”
श्रीकांतच्या कांहीच लक्षात नाही आले. तो थोडा सावरून बसला. यशवंत काकांनी सुजाताला व रमेशला तिच्या खोलीत जायला सांगितले. त्यानंतर माई बोलली, ” श्रीकांत, त्यावेळी आम्ही खूपच अडचणीत होतो. यशवंत भाऊजी पुढे आले नसते तर आक्काचे लग्न मोडल्यात जमा होते. त्यांनी मदत केली हे खरेच, पण त्यावेळी ते सहज बोलून गेले की माझे पैसे मला परत मिळणार याची खात्री आहे. पण मला व्याज नको आहे. योग्य वेळी श्री साठी माझी मुलगी तुम्ही सून म्हणून पदरात घ्या. आम्ही यावर कांहीच बोललो नाही. मात्र ‘ज्या त्या वेळी बघू ‘ असे तुझे बाबा मोघम बोलले होते. आता भाऊजी आजारी आहेत व त्यांना चिंता सुजाताच्या लग्नाची आहे. ही गोष्ट आम्हाला भाऊजीनी आधीच पत्रामध्ये कळविली होती. ‘आम्ही बडोद्याला येतो व तेंव्हा मुलांच्या इच्छेने ठरवू’ असे मोघम उत्तर तुझ्या बाबांनी दिले होते. तू दिवाळीला घरी येणार व त्यानंतर बडोद्याला यायचे त्यांनी आधीच ठरविले होते. मात्र मागील आठ वर्षात आम्हीही सुजाताला पाहिले नव्हते. आता दोन दिवस आपण एकत्र आहोत . आम्हा दोघांनाही सुजाता सून म्हणून पसंत आहे. भाऊजींचे म्हणणे आहे की श्री वर कोणताही दबाव नको. म्हणून ही बाब केवळ आपल्या पाचजणांत असेल. तू तुझे स्पष्ट मत द्यायला मोकळा आहेस. मात्र तू सर्व बाजूनी विचार करून निर्णय घ्यावास. तुझे शिक्षणाचे एक वर्ष अजून शिल्लक आहे व भाऊजीना त्यांच्या डोळ्यासमोर हे लग्न व्हावे असे वाटतेय. कारण त्यांचे हे अनिश्चित असलेले आजारपण. त्यांना स्वतःबद्दल भरोसा नाही आणि तुझ्या बाबांपुढे त्यांनी त्यांची व्यथा सांगितली आहे. तुझ्या आक्काच्या लग्नात जी आपली स्थिती होती, त्याच आर्थिक विवंचनेतून ते आज वाटचाल करताहेत. त्यांना तुझ्या बाबांकडून खूप आशा आहेत.”
सकाळच्या लक्ष्मीविलास पॅलेस च्या सुखस्वप्नातून श्रीकांतचे विमान अलगद त्याच्या संसाराच्या धावपट्टीवर उतरले. त्याच्यासाठी पटकन कांही उत्तर देणं शक्य नव्हतं. खरं म्हणजे तो त्याच्या आप्पांवर मनातून भडकला होता. पण ही गोष्ट आप्पानी किंवा माईने आधी सांगितली असती तर तो बडोद्याला आलाच नसता ! ही म्हातारी माणसे ‘आतल्या गाठीची असतात’ हेच खरे , तो मनोमन उसळला. त्याने सांगितले की ‘आप्पा, मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हो…. रमेशला घेऊन जातो.’ आणि तो बाहेर पडला. पाच मिनिटांनी रमेश बाहेर आला व तो त्याला बोलला, “अरे चल … आपण पिक्चरला जाऊ.” रमेश ‘होय’ म्हणून पुन्हा घरात गेला व बाहेर आला. आणि दोघे निघाले. श्रीकांत थोडा विमनस्क होता, पण हे रमेशला दाखवणे जरुरीचे नव्हते. भटकताना रस्ता चुकू नये म्हणून केवळ त्याने रमेशला बरोबर घेतले होते. पाच-दहा मिनिटे दोघे चालले असतील. मध्येच तो बोलला , ” रमेश, जवळपास एखादे मंदिर आहे का रे. आपण तिथे जाऊन बसू थोडा वेळ “
रमेशने रिक्षा थांबवली व बोलला , ” काका, सुर्यमंदिर ला जायचंय .” आणि रिक्षा धावू लागली. रिक्षावाले काका रमेशच्या ओळखीचे असावेत. साधारण वीस मिनिटांनी रिक्षा थांबली. पैसे न घेताच रिक्षावाले काका निघून गेले. श्रीकांतला आश्चर्य वाटले. त्याने म्हटले , “अहो…. पैसे घ्या ना ….” काका हसले व निघून गेले होते.
“दादा, काका पैसे नाहीत घेणार. बाबांनी त्यांना मागे कधी चार वर्षांपूर्वी खूप मदत केली आहे. आता बाबांना दवाखान्यात नेताना, आणताना व रात्रीही हे काका आमच्यासाठी खूप वेळ देतात.” रमेश बोलून गेला.
सूर्य मंदिर खरंच खूप छान बांधलं होतं. कोणाही नवीन व्यक्तीने खुश व्हावं. पण श्रीकांतचं मन थाऱ्यावर असेल तर ना? अजून तिसऱ्या सेमिस्टर ची लास्ट टर्म आणि बी. इ च्या शेवटच्या वर्षाच्या दोन टर्म, खिशात स्वतःची कमाई शून्य, ‘बायको’ या विषयाबाबत मित्र-मंडळींमध्ये फक्त जोक आणि जोक्स केलेले दिवस आणि आप्पा म्हणताहेत ,” लग्न कर. तेही त्यांनी आधीच ठरविलेल्या मुलीशी . साला…. हे माझे आयुष्य आहे की आप्पांची मालमत्ता …. वाटेल ते ठरवायला ? साला…. ही सुजाता , हिच्या काय मनात आहे कुणास ठाऊक ? तिलाही अद्याप खूप शिकायचे असू शकते ना ? साला …. ही मोठी माणसे समजतात कोण स्वतःला? ” श्रीकांतच्या मनात असलेच असंबंध विचार येत होते व जात होते. रमेशबरोबर तो फक्त शरीराने होता. तो कुठेकुठे नेत होता व हा ‘देखल्या देवा दंडवत’ घालीत होता. पण सुर्यमंदिरा बाबत जे कांही रमेशने ऐकवले ते सगळे ‘नळी फुंकली सोनारे … इकडून तिकडे गेले वारे ‘ अशी श्रीची स्थिती होती . त्याने अचानक रमेशला विचारले , ” का रे , तुझ्या दीदीचे लग्न करणार आहेत हे तुला माहिती आहे काय? “
“बाबा आजारी पडल्यापासून सारखे हेच म्हणताहेत व त्यामुळे दीदी खूप गंभीर असते. बाबा आजारी पडल्यापासून तिने हसायचेच थांबवले आहे. तुम्ही घरात आल्यापासून बाबांच्या चेहऱ्यावर आम्हाला ‘हासू’ दिसले. नाहीतर ते गप्प गप्प असतात. त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”
क्रमश: भाग २
मूळ लेखक – आनंद बावणे
संग्रहिका – सुश्री हेमा फाटक