मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ तुझी आठवण… ☆ मेहबूब जमादार ☆
तुझी आठवण सखे
मला विसरत नाही
तुझ्या घराची वाट
कशी हरवून जाई?
क्षण तुझ्या सहवासाचे
होते अंगणा भारून
तू जाता रानांतली
पाखरे जाती काहुरुन
तू जाता परीसरी
बाग फुलणार नाही
दिसलीस ना तू जरा
पिक डोलणार नाही
तुझ्या सौंदर्याने रात्र
चंद्राविना फुलत होती
आता तू जवळ नसता
सारी रात्र रडत होती
सखे तू असता जवळ
साऱ्या क्षणांना गं गंध
सखे तुझ्याविना आता
आज वाराही झाला बंद
कसे काढायचे दिस
मला कळतच नाही
सारे कळूनिया तुझे
पाऊल वळतच नाही…
© मेहबूब जमादार
मु -कासमवाडी पो .पे ठ जि .सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈