सौ. प्रभा हर्षे
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆
☆ आर्ट अफेअर – डाॅ.मिलिंद विनोद ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆
पुस्तक – “आर्ट अफेअर”
(कथासंग्रह/स्फुट लेखन संग्रह)
लेखक – डॉ मिलिंद विनोद
प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.
डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘आर्ट अफेअर’ हा कथासंग्रह वाचण्याआधी त्यांचा परिचय व श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली. उत्साहात मी पण पुस्तक वाचले आणि खूप आनंद झाला.
आनंद अशासाठी की डॉ. विनोद हे C.A.; C PA; P.HD; या पदव्या प्राप्त केलेले प्रथितयश अर्थतज्ञ असूनही, अत्यंत सोप्या साध्या भाषेत त्यांनी सर्व लेखन केले आहे. कुठेही लटांबर वाक्ये नाहीत, बोजड शब्दरचना नाही, तरीही मूद्देसूद लेखन, आर्थिक विषयांवर असलेली पकड, रुक्ष माहितीही रंजकपणे सांगण्याची हातोटी, ही वैशिष्ट्ये कथांमध्ये तर दिसतातच, पण स्फुट लेखनात जास्त दिसतात. काही गोष्टींना दुबई / गल्फ कंट्रीची पार्श्वभूमी लाभली आहे. श्री विनोद यांच्या दुबईच्या वास्तव्याशी जोडलेल्या कथा या संग्रहात आहेत, उदाहरणार्थ अँब्सेंट, Emirates अर्थात emi@rates या कथा.
ह्यातील ‘ अँब्सेंट ‘ ही कथा फार वेगळी आहे आणि मनाला चटका लावून जाते. परिक्षेच्या हॉलमध्ये एका मुलाचे आईवडील येतात. ते का बरं आले असावेत असा विचार करत असेपर्यंतच ते एका टेबलापाशी उभे रहातात. त्या विद्यार्थ्याचे आय-कार्ड, हॉल टिकेट व एक गुलाबाचे फूल त्या जागेवर ठेवतात. एक मिनिट शांतता पाळून ते तिथून निघता निघता सांगतात, की दोन दिवसापूर्वी अपघातात निधन पावलेल्या विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत. सर्व मुले आणि परिक्षक चित्रासारखे स्तब्ध होतात. हा मुलगा फक्त परिक्षेला अँब्सेंट नाही, तर आता तो त्यांच्या आयुष्यातूनच अँब्सेंट झाला आहे ह्या विचाराने लेखक खिन्न होतो. १८-१९ वर्षाच्या मुलाचा मृत्यु सहन करणे कोणत्याही आईवडिलांना फार कठीण ! ही भावना आपल्यापर्यंत ही जशीच्या तशी पोहोचते.
अशीच ‘ Emirates ‘ ही रमेशच्या आयुष्याची गोष्ट वाचण्यासारखी आहे. १२-१५ वर्षे दुबईत राहिल्यानंतर
१९९८ च्या आर्थिक संकटात रमेशची नोकरी जाते. एक वर्ष तो तेथे कुटुंबाला घेऊन कसेबसे काढतो. पण नाईलाजास्तव त्याला बायको व मुलांना मुंबईला पाठवावे लागते. दोन वर्षानंतर तो सुट्टी घेऊन येतो तेव्हाची बदललेली बायकामुले पाहून तो खंतावून जातो. आर्थिक बदलांबरोबर नीतीमत्तेतीलही बदल तो परिस्थितीप्राप्त म्हणून मान्य करतो. ही खूप कठीण गोष्ट बाजूला सारून तो आयुष्य सावरण्यासाठीची धडपड परत करू लागतो….. श्री. विनोदांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे की जणू काही घटनास्थळी आपणही प्रत्यक्ष हजर आहोत की काय असे वाटायला लागते. रमेशची सुखदुःखं आपलीच आहेत ही भावना बेचैन करते.
कथासंग्रहात एकूण ८ कथा व ११ स्फुट लेख आहेत.
सगळ्याच कथांचे विषयही वेचक व वेधक आहेत. या सर्व मधमाश्याच्या पोळ्याची राणी आहे ‘आर्ट अफेअर’ ही कथा. एखाद्या वेगवान इंग्रजी थ्रिलरप्रमाणे कथा पुढे सरकत रहाते. खिस्तीजच्या ऑक्शनमध्ये एकाच कॅनव्हासवर मागे/पुढे काढलेले भगवान कृष्ण आणि गौतम बुद्ध यांचे अतिशय वेगळ्या शैलीत काढलेले चित्र विकावयास येते. अतर्क्य किमतीला हे पेंटिंग विकले जाणार, एवढ्यात सेलर ऐनवेळी चित्र ऑक्शन मधून विथड्रॉ करतो. आणि एक जगप्रसिध्द चित्रकार उभ्या करत असलेल्या इन्स्टिट्यूटला, एका खाजगी कार्यक्रमात, भेट म्हणून देतो. हे सगळे का आणि कशासाठी हे प्रत्यक्ष गोष्टीतच वाचण्यासारखे आहे. माणसाच्या आयुष्याचा गुंता लेखक सोडवत असताना वाचकही त्यात गुंततच जातो, आणि हीच त्या गोष्टीची जादू.
मिलिंद विनोद यांना माणसाच्या स्वभावाचा अभ्यास करायला आवडते. माणसाच्या वागण्याचे/कृतींचे ते निरीक्षण करतात, त्याचा विचार करतात, पर्यायांचाही विचार करतात, व त्यातून त्या पात्रांची कथाबीजाला पोषक अशी वर्तनशैली बनते . मग कथा आश्चर्यकारकपणे पुढे सरकते व शेवटी वाचकाला चकित करून सोडते. ‘Flagship of the group’ अशा या कथेचं नाव संग्रहाला दिले यातच सर्व काही आले.
आर्ट अफेअरच्या बरीच जवळ जाणारी अजून एक रहस्यकथा म्हणजे ‘ फोटोप्लॉटर’ . लग्नाचा अल्बम वेळेवर येत नाही म्हणून फोटोग्राफरची शोधाशोध सुरू होते आणि त्यातून एक हाय टेक फायनान्शियल स्कॅमचा गुंता हातात येतो. पुढची गोष्ट लेखकाच्या शब्दातच वाचण्यात मजा आहे.
डॉ. विनोद यांचे स्फुट लेखनही स्वतंत्र विचारांचे आहे. देश सोडून जायचे असल्याने इतक्या वर्षांच्या सवयीच्या असलेल्या आयकिया स्टोअरच्या आठवणी, विमानतळावरील करोनाचा धमाका, द्वयर्थी इंग्रजी न समजल्यामुळे काहीही सांगणारी महिला, हिंदी गाण्यांवरचे प्रेम, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले आहे. ‘ अंकुर ‘ हा लेख अगदी तरल व भावस्पर्शी आहे. एक छोटे झाड जागा बदलताना हलले जाते. लहान मुलासारखे तेही घाबरते. पण मायेचा स्पर्श, ऊब मिळाल्यावर त्याला छोटा अंकुर फुटतो… सर्वच कल्पनारम्य आहे. दहा एक वाक्यात अतिशय संवेदनशील असा हा लेख आहे. असाच अजून एक लेख म्हणजे ‘ व्यथा बाबांची’ . सर्व आधुनिक बाबा ही अति बिझी माणसं ! मनात इच्छा असूनही त्यांना मुलांजवळ रहाता येत नाही. आता ते आजोबा झालेत तरी त्यांची मुले दूर आहेत, आणि त्यांच्या छोट्या नातवंडात ते आपलं मूल शोधताहेत. परिस्थिती कोणीही बदलू शकत नाही. आपल्या आठवणी मागे ठेवून मुले दूर जातात. त्या आठवणींच्या सोबत आयुष्य काढणे म्हणजे मनावर मोठा दगड ठेवणे, हे सर्व बाबाला करावे लागते. अपरिहार्य अशा ताटातुटीचे वर्णन वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.
वेगळ्या विषयावरील कथा आणि दर्जेदार स्फुट लेखन ह्यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. डॉ. मिलिंद विनोद यांच्या पुढच्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
परिचय : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈