श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “तीन वर्तुळे… मी, कुटुंब, परिवार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

मी, कुटुंब, आणि परिवार हिच ती तीन वर्तुळे आहेत. जी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. प्रत्येकाची आपापली असतात. व आवड, क्षमता, सवय, स्वभाव, वय, वेळ, काम, गरज, स्थळ यानुसार यांचा आकार वेगळा असतो. तो बऱ्याचदा बदलता असतो.

व्यक्ती नुसार काही वेळा हि तीनही वेगवेगळी असतात. काही वेळा नकळत एकमेकांना स्पर्श करतात किंवा अडकलेली असतात.

ती वेगळी असली किंवा एकमेकांत गुंफलेली असली तसेच व्यक्ती कुठेही असली तरी या तीन वर्तुळातच असते. तो यातून बाहेर पडूच शकत नाही. किंवा या बाहेर राहू शकत नाही.

मी हे लहान वर्तुळ असते. यात मी, माझे, मला असे आत्मकेंद्रित विषय, विचार, कार्य असते. यात अभिमान, स्वाभिमान, अहंकार, अशा गोष्टी सुध्दा येतात. सगळ्या वाईटच असतात असे नाही. पण सगळ्या चांगल्याच असतात असेही नसते.

या वर्तुळातून बाहेर पडलो की नकळत प्रवेश होतो तो कुटुंबाच्या  वर्तुळात.

कुटुंब या वर्तुळात मी सोडून अजून काही जणांची साथ, विचार सोबत येतात. त्यांचा सहभाग आणि सहवास असतो. यात आपल्या आवडीनिवडी सोबत इतरांच्या आवडीनिवडीची भर पडते.

कुटुंब या वर्तुळात काही जणांची भर पडल्याने येथे मी नाही तर आम्ही हा विचार येतो. वर्तुळ मोठे होते त्यामुळे विचारातला मी पणा काहीवेळा सोडावा लागतो.

याही वर्तुळाच्या पलिकडे गेल्यावर प्रवेश होतो तो परिवाराच्या वर्तुळात. यात  सहभागी असणाऱ्यांची संख्या परत एकदा वाढते. त्यामुळेच मी आणि कुटुंब यापेक्षा हे वर्तुळ मोठे असते.

या वर्तुळात निर्णय घेतांना मी, आणि आम्ही पेक्षा थोडा वेगळा, व्यापक विचार करावा लागतो. काहीवेळा काही बंधने पण येतात.

एक चांगली व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्याचे वर्तुळ हे परिवाराचे वर्तुळ असते. याचा अर्थ यात स्वतःचा अथवा कुटुंबाचा विचार नसतो असे नाही. पण फक्त  मी, किंवा मी आणि माझे कुटुंब यांचाच विचार नसातो.

पहिल्या म्हणजे मी या वर्तुळात विचार असतो तो माझा. नंतरच्या कुटुंबातील वर्तुळात माझा ऐवजी विचार येतो तो आमचा किंवा आपला. आणि तिसऱ्या वर्तुळात हे दोन्ही विचार काही वेळा काही स्वरूपात मागे पडतात, आणि विचार असतो तो मी, आपला, याचबरोबर आपल्या सगळ्यांचा.

परिवार या वर्तुळाचा आकार खूप मोठा असतो. यात मी, कुटुंब याच बरोबर समाज आणि त्यातले सगळे घटक असतात. तसेच परिवाराची व्याख्या प्रसंगानुरूप काळ व काम तसेच गरज यानुसार बदलत असते.

प्रत्येकजण एक दुसऱ्याचा अंदाज घेतांना या तीन पैकी कोणत्या वर्तुळात समोरचा आहे हे बघत असतो. आणि मग त्या नुसार ते एकमेकांशी वागतात. पण असतात वर्तुळात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments