श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
उरलेले आयुष्य…
☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
काही न उरले देण्याजोगे
रित्या ओंजळी रिते खिसे,
घेणे आता नको वाटते
देण्याचे लागले पिसे ||
या व्यवहारी जगात आहे
देणे – घेणे नित्याचे,
देतांना नच मनात यावे
बदली काही घेण्याचे ||
हात देऊनी बुडणाऱ्याला
काठावर घेऊन यावे,
मरणाऱ्याला रक्त देऊनी
यथाशक्य ते जगवावे ||
भले न काही देता आले
मनस्ताप तरी देऊ नये,
चटके विझवा सांगुन चुटके
हास्य द्यावया विसरु नये ||
दीन जनांचे टिपण्या आसू
आयुष्य उरले खर्चावे,
मरणोत्तरही शरीर अपुले
अभ्यासास्तव अर्पावे ||
श्वासामधले भासही आता
ध्यास घेऊनी उठतील,
दुज्यास काही देता देता
दिवस सार्थकी लागतील ||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈