श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

शिक्षणावर ते पुस्तकी आहे, पढिक पंडीत बनवणारे आहे, असा आरोप सातत्याने केला जातो. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शैक्षणिक धोरण अधीक कृतीशील, उपक्रमशील झाले आहे हे खरे, तथापि धोरण आणि कार्यवाही यात खूप तफावत दिसून येते. मुले कृतिशील बनावी, म्हणून विविध विषयातील प्रकल्प मुलांना घरी करायला दिले जातात. प्रत्यक्षात मात्र हे प्रकल्प पालकच घरी करताना दिसतात. मुलांचा सहभाग खूप कमी असतो. कात्री, पट्टी, डिंक आणून दे, इ. पुरताच त्यांचा सहभाग मर्यादित असतो. मुलांचे शिक्षण कृतीशील, उपक्रमशील व्हावे, यासाठी सिस्टेड फाउंडेशनाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. सिस्टेड फाउंडेशन म्हणजे  ( CISTED FOUNDATION – CENTRE FOR INNOVATION, TECHNOLOGY & ENTERPRENEURSHIP DEVELOPMENT ). याचे फाउंडर मेंबर आहेत, प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे. त्यांच्या प्रकल्पाचे स्वरूप आहे, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’

मुलांना खेळण्यांशी खेळायला आवडतं. मुलांनी स्वत:च खेळणी बनवली तर— मुलं क्रियाशील होतील. त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. ही खेळणी वैज्ञानिक तत्वांवर बनवली, तर क्रियाशीलता, नवनिर्मितीचा आनंद याबरोबरच त्यांची वैज्ञानिक तत्वांची समजही पक्की होईल. बाजारात अशी काही खेळणी विकतही मिळतात. उदा. डोलणारी, न पडणारी बाहुली. खाली न पडणार्याी बाहुलीमागे गुरुत्वाकर्षण हे तत्व आहे. अशा प्रकारची काही खेळणी मुलांनी स्वत:च बनवली तर? मुलांना निर्मितीचा आनंदही मिळेल आणि वैज्ञानिक तत्वेही चांगली लक्षात रहातील, हा विचार घेऊन सिस्टेड फाउंडेशन गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम करत आहे.

सिस्टेड फाउंडेशनचा हा प्रकल्प खरं तर एका जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आहे.

नवीन काही तरी करण्याच्या ध्यासातून प्रा. भालचंद्र दामोदर केळकर म्हणजेच प्रा. भालबा केळकर यांनी  एक नवा उपक्रम १९७५ साली हाती घेतला होता. तो होता शाळकरी मुलांसाठी. ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’, असं त्याला नाव देता येईल. मुलांना खेळण्यांशी खेळायला खूप आवडतं. मुलांनी स्वत:च अशी खेळणी बनवली तर? मग विचार सुरू झाला कोणत्या तत्वावर आधारित कोणती खेळणी बनवता येतील? नंतर तशी खेळणी बनवली गेली. त्याचे प्रात्यक्षिकही झाले. इथे त्यांच्यासोबत हरिभाऊ लिमये, प्रा. देशिंगकर, श्री. प्रमोद लिमये इ. मंडळी होती. यावर आधारित पुस्तकही छापले गेले. सध्या मात्र ते पुस्तक कुठेही उपलब्ध नाही. प्रकल्प महत्वाचा, शिक्षणाला एक नवी दिशा दाखवणारा होता, परंतु यातील संबंधित व्यक्ती आपापल्या व्यापात अधीक व्यस्त असल्याने त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचा व्हावा तसा प्रचार आणि प्रसार झाला नाही. हळू हळू हा उपक्रम विस्मृतीत गेला. प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे सध्या या विस्मृतीत गेलेल्या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाच्या कामात गुंतले आहेत.

१९७५ साली जेव्हा हा उपक्रम हाती घेतला होता, त्यावेळी बनवलेली खेळणी, त्यात काय सुधारणा करता येतील, नव्याने कोणत्या वैज्ञानिक तत्वावर कोणती खेळणी तयार करता येतील , (innovation and cunstraction) याबद्दल प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे यांच्यात चर्चा होते आणि नंतर खेळणी तयार केली जातात. पुठ्ठा, फळी, कागद, तार, खिळे, बॅटरी, काड्या, टाचण्या, पत्रा, रंगपेटी  यासारखे रहज उपलब्ध होणारे साहित्य आणि कात्री, डिंक, पक्कड, हातोडी, चिकटपट्टी यासारखी हत्यारे वापरून ही खेळणी बनवली जातात.  प्रत्यक्ष खेळणी तयार करण्यासाठी अनेक हातांची त्यांना मदत होते.  सध्या त्यांचे असे २० खेळण्यांचे संच तयार आहेत. आणखी ३० खेळणी बनवण्याची त्यांची योजना आहे. उदाहरण म्हणून त्यापैकी काही खेळण्यांची नावे आणि त्यामागील वैज्ञानिक तत्व बघू या. डोलणारी, न पडणारी बाहुली. गुरुत्वाकर्षण या तत्वावर हे खेळणं बनवलेलं आहे. बाजारातही अशी बाहुली मिळतेच, पण तयार खेळण्यांशी खेळताना हे तत्व मुलांच्या लक्षात येत नाही. पॅरॅशूटच्या खेळण्यात गुरुत्वाकर्षण आणि हवेचा ऊर्ध्वगामी दाब या तत्वांचा वापर केला आहे. न्यूटनचा पाळणा या खेळात ऊर्जेचे संक्रमण ( transfar of energy) हे तत्व वापरले आहे. (कॅरम या खेळात स्ट्रायकरने सोंगटी मारून ती पॉकेटमध्ये घालवायची असते. त्यातही हेच तत्व आहे.) हवेतील मत्सालय किंवा प्राणी संग्रहालय यात तरफेचे तत्व वापरले आहे.

दोन आरशात विशिष्ट कोन करून त्याच्या पुढे वस्तू ठेवल्यावर तिच्या किती प्रतिमा मिळतात? कोन कमी-जास्त केल्यावर मिळणार्याय प्रतिमांची संख्या कशी कमी जास्त होते, कोन जितका लहान, तितकी प्रतिमांची संख्या जास्त. असं बघता बघता दोन आरशात शून्य कोन ठेवला, म्हणजेच समांतर आरसे ठेवले, तर प्रतिमा कशा असंख्य मिळतात, हे दाखवता येते. या सार्याल प्रयत्नातून अनेक गोष्टी मुले स्वत:च शिकतात. शोभादर्शक बाजारात मिळतं. नळकांडं फिरवलं की आतल्या आकृती बदलतात. ते सारं पहाण्यात मुले रमून जातात. मुलांनी ते स्वत: तयार करावं. प्रथम नळकांडे तयार करावे. तीन आरशांच्या दीड इंच रुंदी व सहा ते आठ इंच लांबीचे आरसे त्रिकोण तयार करून आत बसवावेत. आत काचा, मणी, रंगीत कागद घालावेत. नळकांद्याच्या टोकाला पारदर्शक कागद लावून त्याला पुढे पुठ्ठा लावावा. पुठ्ठयाला बघण्यासाठी मधोमध छिद्र पाडावे. काचा, मणी, रंगीत कागद यांच्या कोन करून ठेवलेल्या आरशांमुळे अनेक प्रतिमा तयार होऊन नयनरम्य आकृती दिसते. नळकांडे हलवताच आतल्या आकृत्या बदलतात. शोभादर्शकाला तीन काचांच्याऐवजी  चार किंवा पाच काचा लावल्या तर…आत त्रिकोणाऐवजी चौकोन, पंचकोन तयार होईल. मग दिसणार्याय प्रतिमांमध्ये काय फरक दिसेल? मुलांना विचारप्रवृत्त करावे. निरीक्षण करायला, शोधून काढायला सांगावे. भालबा म्हणतात, ‘मुलांनी स्वत:च अशी काही खेळणी बनवली, तर ती क्रियाशील होतील. स्वत: वस्तू तयार केल्याचा आनंद मिळेल. ती बनवताना आत्मविश्वास, चिकाटी हे गुण वाढीला लागतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून जी वैज्ञानिक तत्वे मुले शिकतील ती कधीच विसरणार नाहीत. पाठांतरापेक्षा हे ज्ञान टिकाऊ स्वरूपाचे असेल. या सार्याणतून पुढची पिढी पढिक पंडित न बनता क्रियाशील बनेल.’

तत्व, विचार आणि कल्पना या आपआपल्या जागी कितीही सुयोग्य असल्या, तरी व्यवहारात त्यांची उपयोगिता सिद्ध होणं महत्वाचं असतं. सिस्टेड फौंडेशनने आपल्या ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ या उपक्रमाची उपयुक्तता आजमावण्यासाठी पलूस, देशिंग, सखराळे आणि कणेरी मठ येथील शाळेतून यासंबंधीच्या कार्यशाळा घेतल्या. २००-४००मुले होती. मुले खेळणी बनवण्यात रमून गेली होती. 

शाळेत कार्यशाळा घ्यायची ठरली की शाळाप्रमुखांशी संपर्क साधून कार्यशाळेमागचा हेतू स्पष्ट केला जातो. त्यांच्या संमतीने दिवस निश्चित झाला की जी खेळणी कार्यशाळेत बनवून घ्यायची त्याची यादी, त्यामागील वैज्ञानिक तत्व, खेळणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-साधने, त्याची चित्राकृती शाळेकडे पाठवली जाते. साधारणपणे एका ठिकाणी पाच खेळण्यांची माहिती दिली जाते. मुलांनी साहित्य आणावे, असेही संगितले जाते. न आणलेले साहित्य आयोजकांकडून पुरवले जाते. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू करताना प्रथम त्या त्या खेळण्याची माहिती सांगितली जाते. खेळणी करून दाखवली जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ५-५ चे गट केले जातात. त्यांना खेळणी करण्यास संगितले जाते. प्रत्येक गटाला वेगवेगळी खेळणी तयार करण्यास सांगितले जाते. मुले काम करत असताना अर्थातच त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यांना मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेचा अवधी तीन तासांचा असतो. त्यात काही गटात एक, काही गटात दोन, तर क्वचित एखाद्या गटात तीन खेळणीही बनतात. गट तयार करताना मुलांचे वय अथवा इयत्ता विचारात घेतली जात नाही. पाचवी ते नववी मुलांचा समावेश या कार्यशाळेत असतो.

प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि एखादा मदतनीस असे तिघे जण कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. काही वेळा शाळा स्वत: संपर्क करून पुन्हा कार्यशाळा घेण्याविषयी विनंती करते. पलूस इथे चार वेळा कार्यशाळा झाली आहे.  एका कार्यशाळेसाठी साधारणपणे दहा हजार खर्च येतो. सुरूवातीला हा खर्च, ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी…’ अशी टीका सहन करत भलाबांनीच केलाय. शिक्षण पद्धतीतील परिवर्तनची आत्यंतिक आस ( passion) हेच त्याच्यामागे कारण आहे. आता फाउंडेशन स्थापन झालय.

सध्याचे शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी बघू जाता, हा उपक्रम अधीक प्रभावीपणे चळवळीत रूपांतरित होईल, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, १४ तालुक्यांच्या गावी सायन्स सेंटर स्थापन झाली आहेत. महाराष्ट्रातील  सायन्स सेंटर स्थापन करण्यात अजिंक्य कुलकर्णी यांचे मोठेच परिश्रम आहेत. त्यांनी लखनौ, चंदीगड, दिल्ली, कानपूर, चेन्नई इ. ठिकाणी सायन्स सेंटर स्थापन केली आहेत आणि त्याचे काम-काज कसे चालावे, याचे मॉडेल पद्मनाभ केळकर यांनी तयार केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सायन्स सेंटरसाठी चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आशा ५६ शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे यांनी केले आहे. त्यांच्यामार्फत शाळाशाळातून, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समाज’ हा उपक्रम रुजत वाढत जाईल, असे वाटते.

वसई ते कोल्हापूर या पट्ट्यातील, जो डोंगराळ भाग आहे, तिथे आश्रम शाळा (निवासी शाळा) आहेत. २०१९पर्यन्त या शाळांमधून सायन्स सेंटर्स स्थापन झाली आहेत. या प्रत्येक आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि पद्मनाभ केळकर यांनी केले आहे. सूर्य उगावतो आहे. आता प्रतीक्षा आहे त्याच्या सर्वदूर पसरणार्यां झळझळित किरणांची.  

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments