श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ स्वातंत्र्यवीर सावरकर… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
(पुण्यतिथी)
प्रखर देशभक्ती त्यागाचे तुम्ही मंगलधाम
हिंदभूमीच्या शूर सुपुत्रा तुम्हास कोटी प्रणाम
गोदातीरी नाशिक नजीक भगूर ग्राम सुरेख
तिथे जन्मले दामोदर सुत वीर पुरुष एक
भारतमाता दास्यशृंखले मधी बंदिवान
सळसळणाऱ्या तारुण्याला मिळे नवे आव्हान
जनतेवर अन्याय निरंतर ब्रिटीश सत्ता जुल्मी
विनायकांच्या मनी उसळल्या स्वातंत्र्याच्या उर्मी
विद्याविभुषीत युवक निश्चयी ध्येयधुंद झाला
बॕरिस्टर बिरुदावली मिळवुन लंडनहून परतला
स्वातंत्र्याचा ध्यास अंतरी हाती शस्त्र धरा
शस्त्रावाचुन व्यर्थ लढाई सावरकर देती नारा
टणत्कार धनुषाचा आणी तलवारीची धार
शब्द तयांचे करु लागले सत्तेवरती प्रहार
विद्रोही ठरवून तयांवर चालविला अभियोग
दोन जन्मठेपांची शिक्षा कठिण कर्मभोग
मार्सेलिसची समिंदर उडी भीषण कारावास
थरथरणाऱ्या भिंती सांगती ज्वलंत इतिहास
ग्रंथसंपदा विपुल तयांची भाषा प्रत्ययकारी
उर्दूवरही त्यांची हुकूमत लिहिल्या गझला भारी
जात-पात-विरहित धर्माचा केला त्यांनी प्रसार
नजरकैदही रोखु न शकली धमन्यांतील एल्गार
अन्न औषधे त्यागुन त्यांनी मृत्युस आमंत्रिले
धगधगणारे यज्ञकुंड ते स्वेच्छेने शांतविले
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈