श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 150 ☆ संत चोखामेळा… ☆ श्री सुजित कदम ☆
वैदर्भीय संतकवी
संत चोखोबा महार
सामाजिक विषमता
दूर केली तत्त्वाकार…! १
दैन्य दारिद्रय वैफल्य
गेले चोखा त्रासुनीया
जाती बांधव उद्धार
आला विठू धावुनीया…! २
हरिभक्त परायण
झाला आप्त परिवार
परमार्थ अध्यात्माचा
केला प्रचार प्रसार…! ३
चोखामेळा कर्म गाथा
साडे तीनशे अभंग
विठ्ठलाच्या चिंतनात
दंग झाले अंतरंग…! ४
नामस्मरणाचा वसा
गुण संकीर्तन ठेवा
जातीभेद झुगारून
केली समाजाची सेवा…! ५
भावविश्व चोखोवांचे
वास्तवाचे संवेदन
अन्यायाची अनुभूती
वेदनांची आक्रंदन…! ६
भक्ती काव्य व्यासंगाने
दिला वेदनेस सूर
चोखोबांच्या अभंगात
भाव भावनांचा पूर…! ७
जात संघर्षाची तेढ
दूर केली संघर्षाने
स्पृश्य अस्पृश्य विवाद
दिला लढा प्रकर्षाने…! ८
भक्ती तळमळ निष्ठा
चोखा प्रेमाचे आगर
भाव विभोरता शब्दी
चोखा भक्तिचा सागर…! ९
कुटुंबाने जोपासली
संत कवी परंपरा
पत्नी पुत्र बहिणीने
अभंगार्थ केला खरा…! १०
कर्ममेळा पुत्र आणि
पत्नी सोयरा आरसा
बंका निर्मळा आप्तांनी
नेला पुढे हा वारसा…! ११
प्राणसखा ज्ञानेश्वर
चोखोबांच्या अभंगात
विठू पाटलाचा दास
संत चोखा समाजात…! १२
गावकुस कामकाज
झाला एक अपघात
चोखा झाले स्वर्गवासी
विठू नाम अंतरात…! १४
चोखोबांच्या हाडातूंन
विठ्ठलाचा होई नाद
भक्ती अनादी अनंत
घाली पांडुरंगा साद….! १५
संत चोखोबा समाधी
महाद्वारी पंढरीत
विचारांचा झाला ग्रंथ
देवालय पायरीत…! १६
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈