डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर, “आपल्याला सार्या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा, आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं. अभ्यासाबरोबर ते सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजून घ्यावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.
परिव्राजक स्वामीजी सगळीकडे फिरून आता धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.
महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. इथून महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.
त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.
कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.
कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. २४ डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता.वर्तमानकालीन भारताचं विराट दर्शन त्यांना घडलं होतं. शतकानुशतके आपला समाज निद्रितवस्थेत आहे आणि तो आपला वारसा विसरला आहे,रूढी परंपरा यांचा दास झाला आहे असं भीषण चित्र त्यांना दिसत होतं. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈