जीवनरंग
☆ इस्तू आणि पदर – ☆ प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके ☆
“चल बास झालं गं आता!” आपल्या बारा-तेरा वर्षांच्या लेकीचे, नलिनीचे केस विंचरत बसलेल्या कांताबाईंनी म्हटलं आणि फणी बाजूला ठेवली. नलिनी उठून तोंड धुवायला मोरीपाशी गेली. स्वत:च्या केसांमधून मोजून तीन-चार वेळा घाई-घाईत फणी फिरवून कांताबाई उठल्या, दोन्ही हात खसाखसा स्वच्छ धुतले. “मी एवढं पापड देऊन येते मेसमध्ये. तोवर तू भाजी फोडणीला टाकशील का?” त्यांनी पिशवीत पापडांची चवड भरता भरता नलूला विचारलं.
“आई, येताना मेस मधूनच काहीतरी भाजी घेऊन ये की चवदार एखादी!” नलूने उत्तरासोबत पर्यायही सांगितला तशा कांताबाई म्हणाल्या, ”आज तुझ्या आवडीचा आंबट चुका असेल मेसमध्ये!” यावर नलू आराशात बघतानाच ओरडली….. “मी करते कांदा-बटाटा किंवा बटाटा-कांदा, किंवा दोन्ही मिक्स!” आणि यावर दोघी मायलेकी मनमुराद हसल्या! नलूला आंबट भाजी अजिबात आवडत नसे. आज घरी कुणी पाहुणे येणार होते, ते नलूला समजलं होतं, त्यामुळे आईने आज जरा बरी चवदार भाजी करावी, असं नलूला वाटून गेलं होतं.
एका वस्तीत राहणाऱ्या कांताबाईंचे यजमान शेजाऱ्याशी झालेल्या किरकोळ भांडणात हकनाक जीवाला मुकले. नलू त्यावेळी पाच वर्षांची होती. कुठंही जा, मुलीवर असा प्रसंग येणं हे माहेरच्यासाठी बरीचशी अडचणींची स्थिती असते. माहेरी भावजया आलेल्या असतात,आई-वडिलांच्या आर्थिक बोलण्याला कमी किंमत असते आणि भावांना त्यांचा वाढता संसार पेलायचा असतो. त्यामुळे माहेरी जाऊन राहण्याच्या विचारांचा दोरखंड कांताबाईंनी लगेचच कापून टाकला होता.
यजमानाच्या घरी, म्हणजे कांताबाईंचे सासर, आधीच दुष्काळाच्या योगानं गाव सोडून मुंबईच्या झोपडपट्टीत जाऊन राहिलेलं, त्यामुळे दिवसा-कार्याला आलेली सासरची आणि माहेरची मंडळी, ”काही लागलं तर सांग!” एवढं म्हणण्यापेक्षा जास्त काही म्हणूही शकत नव्हती आणि देऊही शकत नव्हती. आणि कांताबाईंना कुणाकडे काही मागण्याचा सरावही नव्हता!
पंधरवडा-महिन्यातच कांताबाई आपल्या पाच वर्षांच्या नलूला घेऊन या दुसऱ्या वस्तीतल्या लहान खोपटात रहायला आल्या होत्या. खोपटं लहान म्हणून भाडंही कमी होतं, पण म्हणून वस्तीपातळीवरच्या अडचणी कमी नव्हत्या.
एवढ्याशा पोरीला कुणाच्या भरवशावर घरी टाकून बाहेर कामावर तरी कसं जाणार बाईमाणूस? म्हणून मग कांताबाईंनी पोरीला सोबत येऊ देतील अशा घरांत धुण्या-भांड्यांची कामं पत्करली. सदैव सावचित्त असलेल्या कांताबाई कामाच्या ठिकाणच्या घरांतील पुरूषांशी जेवढ्यास-तेवढ्या वागत-बोलत असत. कुणी काही म्हटलं की म्हणायच्या, “जग खूप चांगलं असेल हो खूप. पण आपल्याच वाट्याला एखादा इस्तू आला तर करायचं काय? त्यापेक्षा कुणी चढेल म्हणो, शिष्ट म्हणो… आपण आपलं खाली मान घालून कामाशी काम ठेवलेलं बरं.”
इस्तू म्हणजे विस्तव…निखारा! आणि याच वास्तवाच्या विस्तवाचा चटका कांताबाईंनी त्यांच्या सावत्रबापाकडून सोसला होता!
पुढं घरच्या घरी मसाले, पापड करून देण्याचं काम मिळालं. आता नलू दुसऱ्यांच्या नाही तर आपल्या आईच्या घरी, तिच्या नजरेसमोर राहणार होती. नलू पाटी-पेंसिल आणि पोळपाट-लाटणं या दोन्ही आयुधांमध्ये लवकरच तरबेज झाली. शाळेत जाताना मस्तपैकी चटणी-रोल तिचा ती करुन घेऊन जाई.
मेसमध्ये जाताना नलूला सायकलवर बसवून शाळेत सोडणे आणि तिला शाळेत स्वत जाऊन घेऊन येणे, हे तत्व कांताबाईंनी कितीही त्रास झाला तरी पाळले होते. कांताबाईंना सायकल फक्त एकाच प्रकारे चांगली चालवता यायची….. खाली उतरून! नंतर नलू त्यांच्यापेक्षा चांगली सायकल चालवू लागली. पण वस्तीच्या उतारावरून नलूला सायकल चालवण्याची परवानगी नव्हती.
वस्तीतल्या इतर अनेक मुली इतर मुलींच्या पालकांच्या दुचाक्यांवर तिघी-तिघी बसून जायच्या. नंतर काहींनी रिक्षा लावल्या. पण कांताबाईंनी त्यांची सायकल सोडली नाही. थोडक्यात, वस्तीजवळच्या सोसायटीमधल्या एखादी ‘मम्मी’ आपल्या मुलीबाबतीत जेवढ्या ‘काळजीवाहू’ असेल तेवढ्याच काळजीवाहू कांताबाई सुद्धा होत्या!
अशीच आठ-नऊ वर्षे आणि कांताबाईंच्या काळजाच्या वहीतील पानेही उलटून गेली. फक्त या पानांवर काळजी तेवढी कायम होती. नलूला नेमकं किती शिकवायचं याचा हिशेब त्यांच्या मनात पक्का होता. बारावी संपेपर्यंत अठरा वर्षे पूर्ण होतात मुलांना. नलू दहावीला असतानाच नात्या-गोत्यातल्या एखादा मुलगा नजरेसमोर ठेवायचा आणि वेळप्रसंग आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख पाहून अक्षता टाकायच्या, हा त्यांचा बेत.
पण कसं कुणास ठाऊक, कांताबाईंच्या मनाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर कुठूनशी ओल्या थेंबांची टपटप वाजली. तिच्या गावाकडचा गहिनी तिच्या मेसमध्ये जेवताना दिसला तिला अचानक. पापड देण्यासाठी गेलेल्या कांताबाईला त्याने पहिल्याच नजरेत ओळखलं. ‘इथंच आलोय कायमचा रहायला, एका साहेबांच्या गाडीवर ड्रायवरचं काम लागलंय, त्यांच्याच बंगल्यात रहायची सोय होणार आहे’, असं काहीबाही सांगत होता तो. मात्र सोबत कोण राहतं याबद्दल अवाक्षर नाही.
तसा गहिनी कांताबाईंच्या शाळेत एक दोन वर्षे पुढच्या वर्गात होता. होता म्हणजे फक्त शाळेत यायचा म्हणून होता म्हणायचं.
आपण कुठं राहतो हे आपण याला नाही सांगितलं तरी त्याला ते मेस मधून आज ना उद्या समजणारच होतं म्हणून कांताबाईंनी त्याला आपल्या वस्तीतला पत्ताही मोघमपणे सांगितला. दोघांचा जाण्या-येण्याचा रस्ता एक पडला. एकदा तर त्याने घाईघाईने चालत निघलेल्या कांताबाईंना चक्क त्याच्या मोटारीतून मेसपर्यंत लिफ्टही देऊ केली होती. पण कांताबाईंनी ते टाळले होते.
एके दिवशी गहिनीने कांताबाईंना रस्त्यावर गाठून थेट लग्नाचीच मागणी घातली. कांताबाई बावरून गेल्या. त्याने पहिली बायको सोडली होती आणि त्याची चौदा वर्षांची पोरगी त्याची बायको सोबत घेऊन गेल्याचं त्यानं लपवलं नाही.
गहिनील्या शाळेत असताना आपण आवडत असू, हे त्यांना ठाऊक होतं. पण त्याला आवडणाऱ्या आपण काही एकमेव नव्हतो, हे ही त्या लहान वयात सुद्धा जाणून होत्या. आणि आता ही अवचित मागणी ऐकून सुरूवातीला गांगरलेल्या कांताबाई लगेचच सावरल्या. “एक मुलगी आहे पदरात. तिच्यासह मला स्विकारावं लागेल!” त्यांनी आपली महत्त्वाची अट सांगितली आणि गहिनी पटकन हो म्हणाला. “अगं,माझी पोरगी सुद्धा तुझ्याच मुलीच्या वयाची आहे की!”
कांताबाईंच्या एका साहेबांनी अगदी म्हातारपणी लग्नगाठ बांधल्याची आठवण कांताबाईंच्या मनात होतीच. पण हे असं मोठ्या लोकांच्यात चालतं, अशी त्यांची समजूत.
नाही म्हणायला, कांताबाईंच्या एका वयस्कर मालकीण बाईंनी ‘एकटं राहू नकोस!’ असा प्रेमाचा सल्लाही दिलेला त्यांना आठवला. त्या बाईंनी ‘पुनर्विवाह’ असा शब्द उच्चारलेला, पण कांताबाईंना तो ‘पूर्ण विवाह’ असा ऐकला होता! “हो,बाई, विवाह करायचा म्हणजे पूर्णच केला पाहिजे की!” असंही त्यांना कांताबाई म्हणून गेल्या होत्या. आणि मग चूक लक्षात आल्यावर हसल्याही होत्या.
गहिनी एका दिवशी संध्याकाळी थोडा उशीर करूनच कांताबाईंच्या घरी आला. सोबत त्याच्या नात्यातली एक बाई होती… जी कांताबाईंच्याही दूरच्या नात्यातली असावी. नलू काही आणायला गल्लीतल्या किराणा दुकानात गेलेली होती.
गहिनी आत आला. हातातली पिशवी खाली ठेवली. पिशवीत बहुदा काही खायला आणलेलं असावं. एक पातळासारखं पॅंकिंगही होतं सोबत. गहिनी आणि सोबतची बाई, कांताबाईंनी टाकलेल्या चादरीवर बसले. त्यांची नजर घरभर भिरभिरती होती. कांताबाईच्या नवऱ्याच्या मळकट फोटोकडे गहिनीने एक ओझरती नजर टाकली.
कांताबाईंनी घरातल्या कंदिलाची वात जराशी मोठी केली. काल पासून वीज गायब होती तिच्या घरातली. तेवढ्यात नलू दुकानातून परतली आणि घरात अनोळखी माणूस पाहून दारातच थबकली.
घरातल्या कंदिलाच्या उजेडाने दारात उभ्या असलेल्या नलिनीची अंधारी बाह्य आकृतीच गहिनीला दिसत होती. त्याने त्या अंधारातूनही नलिनीकडे पाहिले आणि पहात राहिला.
कांताबाईंनी गहिनीच्या डोळ्यांकडे पाहिले आणि तिला तिच्या सावत्र वडिलांचे डोळे आठवले. “नलू, अगं परत दुकानात जा. तीन किलो जवारी दे म्हणावं भैय्याला. आणि तशीच मागच्या गिरणीत उभं राहून दळूनच आण….जा!” असं म्हणून कांताबाईंनी नलूला परत पिटाळलं! पाहुणे बहुदा आज जेवायला घरी थांबणार असा नलूने अंदाज बांधला.
“गहिनी, विचार बदललाय मी. ह्या पोरीचं नीट सगळं बयजवार झाल्याशिवाय मी काही दुसऱ्या घरोब्याचा विचार करणार नाही”
हे ऐकून गहिनी आल्यापावली निघून गेला. कांताला याही वेळी कितीही पटवलं तरी ती ऐकणार नाही याची त्याला खात्रीच होती.
अर्ध्या-पाऊण तासाने नलू परतली. घरात मघाशी आलेला पाहुणा नव्हता. “गेले होय पाहुणे?”
“नले, तुझं लगीन झाल्यावर तु मला तुझ्या सोबत तुझ्या घरी ठेवशील का गं म्हातारपणी?” कांताबाईंनी भाकरी करायला घेता-घेता नलूला विचारलं आणि डाव्या हातानं चुलीतून एक निखारा बाहेर ओढला…जरा जास्त पेटला होता म्हणून. भाकरी करपली असती.
तिच्या बोटांना तो विस्तव थोडासा भाजला तेंव्हा ती बोटं, भाकरी मळण्यासाठी घेतलेल्या पाण्याच्या लोटीत चटकन बुडवली. “आत्ता भाजला असता बघ इस्तू! आणि पदरावर पडला असता तर मोठा भोसका पडला असता!”
आपल्या लग्नाच्या आणि आईला घरात ठेवून घेण्याच्या प्रश्नावर नलू म्हणाली, “आई, अगं अशी काय बोलतीयेस… आपण आपला घरजावईच बघू….!”
यावर दोघीही हसल्या. कांताबाईंनी चुलीत जोरात फुंकर घातली आणि त्या प्रकाशात दोघा माय-लेकींचे चेहरे उजळून निघाले!.
लेखक – श्री संभाजी बबन गायके
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈