सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
आपण भारतीय लोक उत्सव प्रेमी लोक. भारत संस्कृती प्रधान देश. कृषी प्रधान देश. आपल्या संस्कृतीत सणांना खूपच महत्त्व आहे. सर्व सण हे पर्यावरणावर आधारित असेच आहेत. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना. शेतकऱ्यांचा थोडा निवांतपणाचा काळ. सृष्टीमध्ये नवनवीन रंग घेऊन येणाऱ्या, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि थंडीला निरोप असा हा सण म्हणजे होळी.
हा सण फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जातो. काही ठिकाणी तो दोन दिवस , तीन दिवस तसेच पाच दिवसही साजरा करतात. पौर्णिमेच्या दिवशी ‘ होळी ‘ दुसरे दिवशी धुळवड, आणि पाचवे दिवशी रंगपंचमी असा साजरा करण्याची प्रथा आहे. ‘होलीका ‘ या नावावरून ‘,होळी’ हे नाव या सणाला पडले आहे .आपल्या देशाच्या उत्तर भागात ‘ होरी ‘ किंवा ‘दोलायात्रा ‘असेही म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात कोकणात ‘ शिमगा ‘ ‘हुताशनी ‘ ‘होलिका दहन ‘ ‘ फाल्गुनोत्सव ‘ वसंतोत्सव तसेच दक्षिणेत काम दहन असेही म्हणतात.
पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते .त्यानंतर त्यांनी रंग रूपाने पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हाही या उत्सवा मागील हेतू आहे. आणखीही अशी कथा सांगितली जाते की ,लहान मुलांना पीडा देणाऱ्या ‘ होलिका ‘, किंवा ‘होलाका ‘ ‘ढुंढा’, ‘ पूतना,’ यासारख्या राक्षसींच्या प्रतिकांचे होळी पेटवून दहन केले जाते.
त्याचबरोबर आणखीही अशी कथा सांगतात की ,हिरण्यकश्यपू या अहंकारी राजाचा प्रल्हाद हा मुलगा नारायणाचा भक्त होता. राजाला नारायणाचे नाव घेतलेले पसंत नव्हते. अनेक प्रकारे तो प्रल्हादाला घाबरवत होता. जेणेकरून त्याने नारायणाची भक्ती सोडून द्यावी .राजाने आपली बहीण ‘होलीका ‘ हिच्याकरवी एक योजना आखली. ‘ होलीकेला’ अग्नीवर विजय मिळविण्याचे वरदान मिळाले होते .त्यामुळे होलीकेला राजाने सांगितले की, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बैस . त्याप्रमाणे ती प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात लीन झाला होता .इतक्यात होलिका जळायला लागली. आकाशवाणी झाली . तिला वरदानात असं सांगितलं होतं की, तिच्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर , ती स्वतः जळून जाईल. त्याप्रमाणे ती स्वतः भस्मसात झाली .आणि प्रल्हादाला काहीच झालं नाही .सृष्टीचा दृष्टांवर होणाऱ्या विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी .
होळी प्रज्वलित करताना, रचनेच्या मध्यभागी खोड उभे केले जाते . त्याला ‘माड ‘ असे म्हणतात. .त्याच्याभोवती इतर लाकडे रचली जातात. होळी प्रज्वलित करताना कर्त्याने शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. “सहकुटुंबस्य मम ढुंढा राक्षसी प्रित्यर्थं तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये” असा मंत्र म्हणून, समिधा वाहून होळी पेटवितात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला ‘पूर्वा फाल्गुनी ‘ नक्षत्र येते. त्या नक्षत्राची ‘भग ‘ ही देवता आहे. महाराष्ट्रात भगाच्या नावाने बोंबा मारत होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. यामागचे मानसशास्त्रीय कारणही आहे .मनात जे किल्मिष, द्वेष, राग ,चीड ,असे शड्ररिपू बाहेर पडून जावेत. मन स्वच्छ हॅलो अँड एमटी असे व्हावे . मनातले अमंगल अशुभ होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे. आणि चांगल्या शुभ, मंगल अशा गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा आहे. होळी शांत झाली की दूध आणि तूप शिंपडून शांत केली जाते.
उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात .इंदूर शहरात वेगळी पद्धत आणि एक शान असते .या दिवशी शहरातील सर्व लोक राजवाड्याजवळ एकत्र येऊन होळी साजरी करतात. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी, ब्रजप्रदेशातील श्रीकृष्णाच्या मथुरा , वृंदावन ,बरसाना ,नंदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम करून करमणूक केली जाते .इंग्रजीत या सणाला ” होली फेस्टिवल ऑफ कलर्स ” असे म्हणतात. वजीराला होळी दिवशी पुरुष– महिला एकमेकांना रंग लावतात. आणि महिला पुरुषांना काठीने मारतात . ही प्रथा पाहण्यासाठी लोक मुद्दाम व्रजयान या ठिकाणी जातात. आपण टीव्हीवरही प्रथा पाहतो.पहाताना गंमत वाटते.
होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘ ‘धुळवड’, असे म्हटले जाते. या दिवशी, आदल्या दिवशीच्या होळीच्या रक्षेची म्हणजे धुळीची पूजा करून ,रक्षेची प्रार्थना करतात. ” वंदितासि सुरेंद्रेण ब्रम्हणा शंगकरेणच ।
अतस्तं पाहिनो देवी भूतो भूतिप्रदा भव ।। हे देवी धुली, तू ब्रम्हा, विष्णू ,महेशानी वंदित आहेस. म्हणून तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो. आणि आमचे रक्षण कर. असे म्हणून ती रक्षा, शेण, आणि चिखल असे पदार्थ अंगाला लावून नृत्य गायनही करतात. आयुर्वेदात मडथेरपी अशाच पद्धतीची असावी.
फाल्गुन वध पंचमीचा दिवस म्हणजे ” रंगपंचमी “.महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी ग्रुप करून, एकमेकांच्या घरी जाऊन, रंग आणि गुलाल लावण्याची किंवा उडवण्याची प्रथा आहे. ” “बुरा मत मानो, होली है।असं म्हणतात. पूर्वीच्या काळी केशराचे आणि नैसर्गिक रंग उडवून आनंद लुटत असत .रासायनिक रंग उडवणे म्हणजे प्रकृती बिघडवून घेणे होय.
आता होळी साजरी करत असताना, आपणही मनातील किल्मिष, एकमेकांबद्दल वाटणारा राग सोडून देऊन नवीन वर्ष रंगा रंगात न्हाऊन जाऊन एकमेकात आदर आणि प्रेम प्रस्थापित करूया. होळीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ या.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈