सौ राधिका भांडारकर

??

☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर 

माणसाचे नाव आणि माणसाचा पोशाख ही त्या व्यक्तीची पहिली ओळख असते.  केवळ पोशाखावरूनच त्याची जात, भाषा, प्रांत राष्ट्रीयत्व तसेच जीवन पद्धतीचाही अंदाज बांधता येतो.

 भारतामध्ये विविध पोशाख  परिधान केले जातात. पुरुषांचे वेगळे, स्त्रियांचे वेगळे. सदरा लेंगा किंवा धोतर आणि नऊवारी साडी म्हटलं की लगेच पारंपारिक महाराष्ट्रीयन स्त्री— पुरुष नजरेसमोर येतात. सलवार-खमीस, घागरा—ओढणी,  उलट्या पद्धतीची गुजराती साडी, दाक्षिणात्य पद्धतीचे विशिष्ट पोशाख, काठीयावाडी, राजस्थानी कितीतरी प्रकार!  अनेक रंगी, कलाकुसरींचे.   वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख.पोशाख हा नुसता कपड्यांपुरताच मर्यादित नसतो, तर त्या त्या पोशाखावर साजेसे असे अलंकारही त्यानिमित्ताने घातले जातात.  आणि त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांची शोभा, लज्जत ही वाढते.  अशा परिपूर्ण पोशाखातील व्यक्ती ही आकर्षक, प्रसन्न भासते.  नीटनेटक्या पोशाखातल्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव हा लक्षवेधी असतो. 

कुणी कुठला पोशाख घालावा याबद्दलही आपले अगदी पूर्वापार संकेत आहेत. नेत्यांचा वेश, समाजसेवकांचे कपडे, कलाकारांचे कपडे, संगीतकाराचा पोशाख, कचेरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेश, क्वचित  कधीतरी ड्रेस कोड,(शर्ट,पँट,टाय किंवा पारंपारिक पोशाख),शेतकरी,गुराखी,  सणासमारंभाचे पोशाख, शाळेत जाणाऱ्या मुलांचे गणवेष हे सारे ढोबळ मनाने ठरलेलेच असतात.  आणि सर्वसाधारणपणे याच प्रकारची वेशभूषा सामाजिक स्तरावर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, परिधान केली जाते. 

पोशाख आणि वय याचाही संबंध आहेच.कुमारवय, तरुण, वृद्ध अशी विभागणी पोशाखाच्या बाबतीतही होतेच. आणि व्हायलाही हवी.  जे कपडे तरुणपणी शोभतात ते म्हातारपणी अशोभनीय वाटू शकतात.  सहजच आपण बोलतोच की “असे कपडे वापरताना जरा वयाचा तरी विचार करायचा ना? 

काहीजण मात्र बिनधास्त, बेलाशक पणे भडक, चित्रविचित्र कपडे घालण्यास मागेपुढे पहात नाहीत. वयाचा विचार करत नाहीत.  पण कधी कधी या लोकांना अशाच वेशात बघण्याची, बघणाऱ्यांना ही सवय होऊन जाते.

खरोखरच विशिष्ट पोशाखावरून माणसाची एक विशिष्ट प्रतिमाही निर्माण होत  असते. जागतिकीकरणामुळे मात्र आता “ड्रेसेस” या विषयात प्रचंड उलथापालथ झालेली आहे.        

पाश्चिमात्य कपड्यांचा दिमाख, सुटसुटीतपणाच्या नावाखाली सर्रास दिसू लागला आहे.  बदलत्या काळा नुसार, जीवनपद्धतीनुसार पोशाखातला बदलही तसा स्वीकृतच आहे.  पण त्यात केवळ अनुकरण नको.  जो वेश आपण घालू, तो तितकाच सहजपणे आपल्याला निभवताही  आला पाहिजे याचेही भान ठेवायला हवे. 

स्त्रियांमध्ये   पारंपारिक नऊवारी साडी हा आता कधीतरी हौसेने, खास प्रसंगी नेसण्याचाच प्रकार उरला आहे.  फार कशाला?.. साडीची जागा सलवार-कमीसने अगदी सहजपणे बळकावली आहे. टाॅप आणि जीन्स वरचढ झालेत.

आजकाल विनोदी ,हसवणुकीचे कार्यक्रम म्हटले की पुरुषांनी स्त्रियांच्या वेशातच पेश होणे. हे विडंबनही नकोसेच वाटते.विकृत,अतिरंजीत ,अश्लील वाटते.

पोशाखातले विविध बदल आता समाजाच्या अंगवळणी पडूच लागलेत.  त्याविषयी हरकत घेण्याचे ही काही कारण संभवत नाही.  पण गैर एका गोष्टीचं वाटतं— ज्यात केवळ परदेशी अनुकरण आहे, ते म्हणजे उद्युक्त करणारे, लांडेबांडे, तोकडे, शरीर प्रदर्शन करणारे अपुरे पोशाख!  कितीही डोळे झाक करायची म्हटली तरीही यामुळे आपल्या संस्कृतीतले काहीतरी घसरत चालल्यासारखे वाटते या पोशाखांमुळे.  “शेवटी ज्याची त्याची निवड”,” ज्याची त्याची मर्जी” किंवा “उगीच काकू बाईचा शिक्का नको बसायला”  म्हणून हट्टाने केलेला उपद्व्याप असेही असेल.  दृष्टीचा ही दोष असेल. ज्या पोशाखात, आपण एखाद्या युरोपियन स्त्रीला बघू शकतो तर भारतीय नारीला का नाही?   असा प्रश्न येऊच शकतो. कशासाठी या संस्कृतीच्या भिंती?—-

 —— पण तसं नाही. या नुसत्याच संस्कृतीच्या भिंती नाहीत, तर ती सभ्यतेची कवच कुंडले ही आहेत. 

नेहमीच दूरचे डोंगर साजरे दिसतात का?

मी अमेरिकेत असताना तिथली एक तरुणी मला म्हणाली होती,

” आंटी ! मला तुझ्यासारखी साडी नेसायला शिकवशील का? मला तुझा हा ड्रेस (साडी) फार आवडतो.  तू यात किती सुंदर दिसतेस !”

 —- नेमकं मला हेच म्हणायचे आहे. कपडे घाला कोणतेही ! पण समोरच्या व्यक्तीने अगदी सहज, मनापासून म्हटलं पाहिजे,

——–” तू किती सुंदर दिसतेस!”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments