सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – “दुसरी बाजू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
आठ मार्च,महिलादिन. आजकाल बरेच ठिकाणी महिलादिन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरे केले जातात.खरंतरं महिलादिनी सरसकट महिलांची अपेक्षा असते की हार,बुके सत्कार समारंभा ऐवजी तिला आधी एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र भावना,स्वतंत्र आवड आणि स्वतंत्र मत असलेली व्यक्ती म्हणून आधी समजून घेतल्या जावं, तिच्या कष्टांची दखल घेतल्या जावी.
आपण सगळ्याजणी तशा नशीबवान. आपण अशा घरात जन्म घेतला जेथे कदाचित महिलादिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता पण संपूर्ण वर्षभरच जणू महिलादिन असल्यासारखी मोकळी हवा,मोकळा श्वास, मुलगी म्हणून कुठलिही दुय्यम दर्जाची वागणूक आपल्याला कधीच मिळाली नाही त्यामुळे माहेरी महिलादिन हा काही वेगळा साजरा करावा असे प्रकर्षाने कधीच वाटले नाही.
पुढे लग्न झालं. ति.आईंनी एका महिलेचं दुसऱ्या महिलेशी कसं सख्य असू शकतं हे आम्ही एकाच छताखाली तीस वर्षे म्हणजे मी त्यांच्याजवळ राहून शिकायला मिळालं,त्यामुळे वेगळा महिला दिन साजरा करायचा विचार खरतर मनात आलाच नाही.
“अहो”नी संसाराच्या वाटचालीत तो सुरळीत आणि व्यवस्थित चालविण्याचा कासरा मोठ्या विश्वासाने हाती निश्चींतपणे सोपविला. अर्थातच आपले स्वतः चे बाबा सोडून , मग अहोंपासून नंतरची पिढी “मेन वील बी मेन “असल्यासारखी तोंडाने कौतुक कधीच करणार नाही पण नजरेतील विश्वास कधीकधी त्याहीपेक्षा जास्त सांगून जातो. त्यामुळे ही नजरेतील पसंतीची पावती हाच माझा महिलादिन.
पुढे लेक मात्र नवीन पिढीप्रमाणे महिलादिन स्पेशल म्हणून फेसबुक वर पोस्ट टाकू लागला,पिझ्झा पार्टी घडवू लागला.आणि असं करतांना आईमुलातं मित्रमैत्रीणीचा मोकळेपणा कधी आणि कसा येतं गेला तेच कळलं नाही.पण जेव्हा व्यंकटेश अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून ते महत्वाच्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्यात आधी.,बेझिझक मला सांगू लागला तोच माझा महिलादिन ठरला.
पुढे नोकरीच्या ठिकाणी जेव्हा सहकारी वर्ग आपल्यावर कामाची जबाबदारी सोपवून ते काम निटनेटकं होऊनच पुर्णत्वाला मी नेणारच ही खात्री, विश्वास बाळगून निश्चींत होऊ लागला नं तोच माझा महिलादिन ठरला.
तसेच मित्रमैत्रीणी, जवळील लोकं, माझा रोजचा वाचक वर्ग हा माझ्यातील लेखणीला, माझ्या भावनांना, विचारांना, माझ्या सवयींना हा माझा पेक्षाही जास्त ओळखू लागला आणि माझ्यावर भरभरून प्रेम करु लागला तोच माझा महिलादिन ठरला.
असो बरेच वेळा सत्कारसमारंभ, बुके,फुलं आणि गिफ्ट ह्यांच्यापेक्षाही ही भावनांनी जोडलेली नाती बाजी मारुन जातात नं तेव्हाच खरा महिलादिन धुमधडाक्यात साजरा झाल्याचा फील येतो हे मात्र खरं.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈