सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 53 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९९.
जेव्हा मी सुकाणू ठेवून देतो
तेव्हा ते तू घेण्याची वेळ आली आहे हे मी जाणतो .
माझी धडपड व्यर्थ आहे. योग्य ते सत्वर करशीलच.
(सुकाणुवरचे) हात काढून घ्यायचे,पराभव स्वीकारायचा आणि माझ्या ऱ्हदयस्था, जिथं जसा आहेस, तिथं तसंच स्वस्थ राहायचं
हेच तुझं भाग्यध्येय आहे.
वाऱ्याच्या लहान झुळुकीबरोबरच माझे दीप विझून जातात. ते पेटविताना मी पुन्हा पुन्हा साऱ्या गोष्टी विसरून जातो.
पण या खेपेला शहाणपणानं मी अंधारात माझी (फाटकी) सतरंजी जमिनीवर पसरून वाट पाहात राहीन.
हे स्वामी, जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा ये आणि बैस.
१००.
आकारहीन पूर्णत्व पावलेला मोती मिळावा,
ही आशा धरून मी सागरतळाशी बुडी मारतो.
हवेत (आणि पाण्यानं) जीर्ण झालेल्या
माझ्या या बोटीतून या बंदरातून त्या बंदरात
असा हा प्रवास व भटकणे आता पुरे.
अमरतत्वात मरण पावण्याची माझी आता आकांक्षा आहे.
स्वरहीन तंतूच्या संगीताचा जिथं उगम होतो त्या
खोलीविरहित विवराच्या सभागृहात माझ्या
जीवनाची वीणा मी घेऊन जाईन.
चिरंतनाच्या स्वरांशी माझ्या वीणेचे स्वर
मी जुळवून घेईन आणि तिचा अखेरचा स्वरझंकार जेव्हा थांबेल तेव्हा शांतीच्या पायाशी माझी शांत वीणा मी समर्पण करेन.
१०१.
माझ्या गीतातून सतत मी तुझा शोध घेतला.
त्यांनीच मला दारोदार फिरवलं. माझ्या जगाचा
स्पर्श व शोध मी घेत राहिलो.
मी जे काही शिकलो ते सर्व माझ्या गीतांनीच
मला शिकवलं.त्यांनीच मला पवित्र मार्ग दाखवले.
माझ्या ऱ्हदय क्षितिजाच्या वर उगवणारे
सारे तारे त्यांनीच मला दाखवले.
सुख-दु:खाच्या अद्भुत नगरीतील ते माझे
वाटाडे झाले, या प्रवासाच्या अखेरच्या सांजवेळी
कोणत्या प्रासादाच्या द्वाराशी त्यांनी मला आणले?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈