डॉ.सोनिया कस्तुरे
मनमंजुषेतून
☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
(अंतरराष्ट्रीय महिला दिन 2023)
नवरा बायको, दोन मुलं वा एक मूल अशी साधारण कुटुंबाची हल्ली रचना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धती आता कमी होऊ लागली आहे. या आगोदर कोणत्याही कारणाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सर्वस्वी सासरच्या किंवा माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. एका बाजूला तिची ते त्यांच्या परीने जबाबदारी उचलताना दिसत होते. दूसऱ्या बाजूला तिला कुणाकडूनही मदत न मिळाल्याने तिची खूप वाईट अवस्था होत असे. आता ही काही ठिकाणी हे पाहावयास मिळत आहे. सावित्रीजोतीबांनी शाळेची सुरुवात केली त्या काळात जे स्त्रीयांचे हाल होते ते आता कमी झाले आहे. तेव्हा पेक्षा बराच बदल झालेला आहे. त्यावेळी मुलींचे शिक्षण खूपच कमी असायचे अगदी वाचायला येण्या इतपतच होते. हल्ली मुलींचे माध्यमिक तसेत उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. त्यांचे स्वाभिमान, आत्मभान जागृत होताना दिसत आहे. अडथळे कमी झालेले नाहीत वा पुरुषसत्ताक/ पितृसत्ताक व्यवस्थेत खूप काही अफलातून बदल झालेले दिसून येत नाहीत, तरीही शिक्षणाने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढला आहे असे म्हणता येईल. सावित्रीजोतीबांच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे हे फलित आहे. हे विसरुन चालणार नाही. कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची इच्छा प्रबळ होताना दिसते आहे. त्या प्रबळ ईच्छाशक्तीला सहकार्याची जोड म्हणावी तशी मिळत नाही. सगळेच अलबेला आहे असे नाही पण जात्यापासून काॕम्पुटर, स्मार्ट फोन पर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतही उठावदार झाला आहे.
बायका स्वबळावर कुणाचाही आधार नसताना खूप घडपडताना दिसतात. यात सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद होऊ शकत नाही. करुच नये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या कौशल्याचा कुटुंबासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
जोडीदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर अथवा शेतकरी कुटुंबात व इतर व्यवसायात जोडीदाराने अनेक अडचणींना तोंड देताना आलेल्या मानसिक तणावाने स्वतःचे जीवन संपवलेले असले तरी या महिला हिंमतीने जगणं उभे करताना दिसतात. कोविडच्या काळात अनेक जणींनी जोडीदार गमावला. अशा एकल स्त्रीया न खचता पुर्णांगीनी होऊन आई व बापाची भूमिका निभावताना दिसतात. अजूनही पुनर्रविवाह म्हणावे इतके होत नाही. शिवाय विधूर पुनर्विवाहासाठी कुमारीच शोधताना दिसतात. विधवांच्या पर्यायाचा विचार पुनर्विवाहासाठी विधूर करीत नसतील तर त्यांना त्या अगोदरच्या आपत्यासहित स्विकारणे तर दूरची गोष्ट. अगदीच अपवाद म्हणून कुठेतरी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपत्यासहित विधवेशी लग्न करणारे दिसतात. फुलेंनी त्यांच्या काळात सुरु केलेले विधवा पुनर्रविवाह अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. पण विधवा बायका स्वबळावर ताठ मानेने जगताना दिसतात. किंवा काही महिला लग्न न करता अथवा लग्न राहून गेलेल्या स्वतःच्या हिंमतीवर जगताना दिसतात. हे चित्र माणूस म्हणून आनंदादायी आहे. अशांनाच मला पूर्णांगिनी म्हणायचे आहे.
माझ्या मते कर्तव्यतत्पर, निस्पृह, निष्कपट, निःस्वार्थी, परोपकारी, धेय्याला समर्पित, जगण्याची आस असलेले, मृदू पण तितकेच कठोर आणि कणखर ते नेहमी सुंदर…!
माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुंदर असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. यांचे जोडीदार तसे नावापुरतेच जोडीला होते. काही करकोळ गोष्टी सोडल्या तर मुलं जन्माला घालण्यातच जोडीदाराचा काय तो सहभाग. अन्यथा संसाराचा गाडा या माऊलींनीच पुढे ओढत नेला. जोडीदार सोडून गेल्यावरही कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता, सामाजिक व्यवस्थेला शरण न जाता, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ जगण्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. अतिशय कष्टाने, परिश्रमाने जीवनाची वाट चालत त्या जगण्यावर स्वार झाल्या. माणूस म्हणून अनेक प्रसंगाशी दोन हात करत स्वतःला जिंकत आल्या. अशा सखींचा मला खूप अभिमान आहे..! त्या खऱ्या अर्थाने पूर्णांगिनी आहेत. असे मला वाटते.
खरंतर शेतीचा शोध लावणारी, मातृत्व पेलणारी, संगोपन करणारी, समर्पणाने मानवी मुल्ये पेरणारी, शिवबा घडवणारी, वेळप्रसंगी युद्धात लढणारी, आणि युद्धापेक्षा बुद्ध मानणारी ती कधीच दुर्बल नव्हती. पण व्यवस्थेने तिला एकीकडे देवीचा दर्जा दिला त्याचवेळी तिला अबला, दुर्बल, दुय्यम ठरविले आणि तिच्यावर अन्याय होत गेला. सत्ता संपत्तीला खूप महत्त्व आले. क्रांती प्रतिक्रांती आणि परत क्रांती होत महिला सबलीकरण सुरु झाले. आता प्रत्येक जण महिलांना सक्षम करण्यात गर्क आहे. पण या सक्षम झालेल्या महिलांशी पुरुषांनी योग्य रीतीने वागावे यासाठी त्यांची मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. ही आजची खंत आहे. म्हणून पुरुष सबलिकरणाची गरज भासू लागली आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. तिच्या शिवाय जन्मच नाही. पण तिची तारेवरची कसरत चालू आहे. मदतीचा हात तिला कुणाकडून मिळत नाही. तिच्या मनात दाटलेले काळे ढग कुणाला दिसतील का? तिने पापण्यांपर्यंत आडविलेला पाऊस कुणाला जाणवेल का ? वादळातही मन सावरुन इतरांसाठी झटणारी ती कधी कुणाला उमगेल का ? आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला वेळीच साथ मिळेल का ? का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे? मुक्त वावरावे अनिर्बध, स्वतःला शोधण्यासाठी?…..
ती म्हणेल कधीतरी तळमळून “नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण.” मग काय कराल ? माणूसपणाच्या सागरात तिलाही डुंबायचे आहे. त्यामुळे वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा नाहीतर विपरीत घडेल ! आई, आईपण दोन्ही गोठून जाईल !
ग्रामीण भागातील सखी तर कुणी कितीही पसरो, ती मुकाट्याने आवरत असते. काबाड कष्ट करून मुलांना वाढवते. जगण्याच्या शोधात कामानिमित्त रानोरान भटकते. अनेक संकटांना निमूटपणे सहन करते. मध्येच जोडीदाराचा साथ सुटला तरी हिंमतीनं पोटच्या मुलांसाठी झटते. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करताना दिसते. वेळप्रसंगी अनेकांच्या समोर पदर पसरते. पण हार मानत नाही. मनातली घुसमट कोंबून ठेवते. ठेच लागली तरी एकाचवेळी डोक्यावरील घागर आणि कडेवरचं तान्हुलं बाळ अलगद सावरताना दिसते. अनेक वेदना घेऊन हसणं जपून ठेवते. तिच्या समर्पणाची, कष्टाची, आणि सहनशीलतेची कला कुणाला कधीच जमणार नाही, असे मला वाटते. अशा माणसातील पूर्णांगिनी आईला मी मनापासून मनापासून सलाम् करते. शेवटी जाताजाता माझ्याच कवितेतून मला एवढेच म्हणावेसे वाटते की ……
तू कोणाशी बरोबरी करु नकोस,
तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!
तू जन्मदात्री, तू संगोपन करणारी
तू शेतीचा शोध लावणारी
त्यागाची परिभाषा तू
सती जाणारी ही तूच
युद्धापेक्षा बुद्ध मानणारी तू
तू कोणाशी बरोबरी करु नको,
तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!
तू जिजाऊ, तू सावित्री
तू झाशीची राणी, तू रणरागिणी
तू इंदिरा, तू कल्पना चावला,
अनेक रूपात, अनेक क्षेत्रात
पाय रोवून उभी आहेस तू,
तू कोणाशी बरोबरी करु नको,
तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!
तू सुंदर आहेस, कर्तृत्ववान आहेस
चेहऱ्याला लेप लावून सजवू नकोस
तू नितळ, निर्मळ, प्रेमळ, आहेस
तू निधर्मी व विज्ञानवादी हो
तू दैववादात अडकू नकोस,
प्रयत्नवाद कधी सोडू नकोस
तूच कुटुंबाचा गाभा आहेस..
तू कोणाशी बरोबरी करु नको,
तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!
तुला कुणी विकू नये.
तुला कुणी विकत घेऊ नये..
अशी आईच्या हृदयाची माणसं
तूच घडवू शकतेस..
बलात्कार, अन्याय, अत्याचार तू
स्वतःच थांबवू शकतेस…
तू सर्व सामर्थ्याने पेटून उठू शकतेस
तू कोणाशी बरोबरी करु नको,
तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!….
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈