श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तार…लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आज एक वेगळाच विषय मांडतोय!! जिथे जिथे म्हणून हिंदु संस्कृती विस्तारली, फोफावली, विकसित झाली, अशा जगाच्या एका मोठ्या भूभागावर आजही त्या संस्कृतीच्या खुणा ठळकपणे दिसतात! मग ते आंगकोरवाटचे मंदिर असो वा अफगाणिस्तान मधील भव्य बुद्ध मंदिर असो. त्या त्या ठिकाणी हिंदुंच्या पूजा पद्धतीतील अनिवार्य अशा विविध देवांच्या मूर्ती आढळतात! भारतात खूप ठिकाणी संगमरवराची मंदिरे असतात आहेत. पण या प्राचीन मंदिरात श्रीमूर्ती मात्र काळ्या पाषाणाचीच असते !!
आमच्या गावात पुरातन गणेश मंदिर आहे. ते अगदी हायवेला नजीकच आहे. पण त्यात मूर्ती नव्हती. खूप वर्षे ! आमची पिढी अगदी गद्धेपंचविशीत होती तेव्हा आम्ही त्या देवळाचा जीर्णोद्धार केला अन् पंढरपूरहून संगमरवरी गणेशाची मूर्ती आणली ! आमच्या बुद्धीप्रमाणे त्या मूर्तीकाराला, मूर्तीला रंग देऊ नको असे सांगितले.कारण जर का मूर्ती कुठे भंग पावली असेल तर ती जाणवावी ! यथावकाश विधीवत अर्चा वगैरे होऊन नित्यपूजा सुरु झाली ! पूजेत वापरण्यात येणाऱ्या दूध, दही, साखर, तुप, मध वगैरे बाबी अन हवामानामुळे त्या मूर्तीवर जो पावडरचा थर त्या ‘जाणत्या’ मूर्तीकाराने दिला होता, तो निघून गेला; अन् एक भयानक वास्तव सामोरे आले !! त्या मूर्तीला पोटापासून कंबरेपर्यंत तडा होता हो !असो.
मग जाणत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मूर्तीचा शोध सुरु झाला. अन नांव समोर आले ते बेळगांवचे प्रसिद्ध मूर्तीकार श्रीयुत अत्तार यांचे !!लगेचच आम्ही बेळगांवला गेलो अन अत्तारजींकडे पोहोचलो !नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले. आम्ही सारं घटीत अघटित सांगितले. त्यावर ते उत्तरले की माझ्याकडून मूर्ती हवी असेल, तर किमान एक वर्ष तरी लागेल. आम्ही कबूल झालो !
त्यांनी विचारले की मूर्ती कशी हवी ?क्षणांत आम्ही म्हटले की, दगडुशेठ सारखी हवी! मग ते विचारते झाले की तुम्हाला मूर्तीकलेतील कितपत ज्ञान आहे? मग आमची बोलती बंद! मग त्यांनीच मूर्तीकलेबाबत सखोल माहिती दिली. ते स्वत: कर्नाटक विद्यापीठात, आयकॉनॉलॉजी विभागाचे (निवृत्त) मुख्य होते. अन महत्वाचे हे की त्यांचे घराणे म्हैसूर नरेश वाडीयार यांचे पिढीजात राज शिल्पी आहेत! ते म्हणाले की तुम्ही कोणतीही पुरातन देवालये पहा, ती वस्तीत नव्हती. तर कुठे जंगलात, डोंगरावर आहेत. याचे कारण ज्या देवाचा वास ज्या स्थळी आहे तिथेच ते देवालय बांधायचे असते. उदाहरणार्थ देवीचे मंदिर जर बांधायचे असेल तर एक विशिष्ट विधी करुन ठरवावे लागते की देवीचा वास कुठे जास्त आहे ते! मग तिथे एक विहिरसदृष्य खड्डा खणण्यात येतो. ठराविक खोलीवर त्या विहिरीला जिवंत झरा मिळतो. त्या झऱ्यावर सहा ते आठ इंच जाडीचा तांब्याचा पत्रा ठेवायचा. अन त्या पत्र्यातून तीनचार इंच जाडीचा ताम्ररज्जु जमिनीवर आणायचा. त्या तांब्याच्या दोराला ‘एनर्जी थ्रेड’ असे म्हणतात. मग त्या दोऱ्यातून सप्त धातुंचे सप्त कलष ओवायचे. त्या सप्तकलशात सप्तधान्य, सप्तनद्यांचे पाणी वगैरे पवित्र वस्तू भरत भरत ती विहिर बुजवायची. आणि त्या दोराचे जे वर आलेले टोक आहे तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आणि मूर्तीच्या मूलाधार चक्राजवळ तो दोरा जोडून द्यायचा. म्हणजे मग ती देवालये निरंतर टिकतात. त्यांची ख्याती होते वगैरे!
आणि मूर्ती कोणत्या दगडाची असावी हे सांगताना ते म्हणतात की मूर्ती ही कृष्णशीळेतच हवी !
भारतात साधारण तीन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे काळा दगड, संगमरवर आणि ग्रॅनाइट! यातील ग्रॅनाइट हा नपुंसक दगड आहे. संगमरवर हा स्टोअरेज कॅपॅसीटी नसणारा दगड आहे. तर कृष्णशीळा हा दगड, तुम्ही जे जे संस्कार त्या मूर्तीवर कराल ते साठवून ठेवण्याची क्षमता अन् योग्य वेळी भक्तांना फळ देण्याची शक्ती, कृष्णशीळेच्या मूर्तीत असते ! नंतर ते म्हणाले की मी वेदात जसे वर्णन आहे, तशीच मूर्ती घडवतो ! जर वेदपाठशाला असेल तर तिथे विद्यागणेशाची मूर्ती आवश्यक. नांदत्या घरात कधीही नटराजाची मूर्ती स्थापू नये कारण ती नाट्यदेवता आहे. घराचं नाट्यमंदिर व्हायला वेळ लागणार नाही ! तसेच गणेशाच्या मूर्तीच्या हातात परशु, पाश, लाडु/मोदक ह्या बाबी अत्यावश्यकच. प्रभावलय(प्रभावळ) हवेच. त्याचा किरीटही विशिष्ट असा हवा! प्रत्येक देवतेच्या मूर्तीला एक ताल असतो. जसे विष्णूची मूर्ती नवतालात, देवीची सप्ततालात तर गणेशाची मूर्ती पंचतालातच असावी! आता म्हणाल ‘ताल’ म्हणजे काय? तर मूर्तीच्या चेहऱ्याच्या पांचपट मूर्तीचे शरीर; म्हणजे पंचताल! बघा विष्णुच्या मूर्ती ह्या उंच असतात अन् गणपतीची बैठी असते !
एवंच आम्हाला अत्तारसाहेबांनी ज्ञानी केले. मूर्ती घडवून दिली ती अगदी सुबक!
आता हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहिलेय. आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी केव्हढे ज्ञानभांडार ठेवलंय याचीही कल्पना यावी. आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची जाणीव असावी.
म्हणून हा लेखन प्रपंच!!
लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर
गोळवली, कोंकण, ९८९०८ ३९४९३
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com