सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एक गौरगोपालदासजींची छोटीशीच पण भरपूर समज देणारी आँडीओक्लीप ऐकली.गौर गोपाल दास सांगतात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, पण तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित करता की सुखावर, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. गौर गोपाल दास यांनी साधू संतांच्या बाबतीत म्हटले, की संसारी माणसालाच दुःख असते असे नाही, तर सन्यस्त माणसालाही दुःख आहेच. कारण जोवर आपण देहाने या जगात आहोत, तोवर राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार चिकटलेले असणारच. तसेच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसा लागणारच, शारीरिक व्याधी होणारच, थंडी, ऊन, वारा, पाऊस  यांचा जाच होणारच. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही आपण त्यातून स्वतःसाठी जर आनंद शोधायचा ठरवले तरच आनंदी राहू शकतो.

ही क्लीप ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपलं जितकं नुकसान येणाऱ्या संकटाने होतं त्याच्या कित्येक पट  जास्त नुकसान ते संकट प्रत्यक्ष यायच्या आधीच्या भितीने, कल्पनेने आपलं आँलरेडी होऊन जातं फक्त आपल्या ते लक्षात येत नाही वा जाणवत नाही. काही वेळा आपण करीत असलेल्या अवास्तव काळज्याचं आपले जास्त मानसिक खच्चीकरण करतात.

मानवी स्वभाव मोठा अनाकलनीय आहे. बरेच वेळा आपल्या स्वतःला “बाबापुता” करुन स्वतःच्या मनाला कुरवाळयला,सांत्वना द्यायला फार आवडायला लागतं,मग आपण ते सहाणेवर गंध उगाळल्यासारखं आपल्याच दुःखाचे, व्यथांचे वेटोळे ,फेरे स्वतःभोवती फिरवीत बसतो आणि इथेच आपला घात होतो.

स्वतःच्या मनाला कणखर बनवून संकटाला दटके सामना करायला फक्त आणि फक्त तुम्हीच शिकवू शकता.

..सद्यस्थितीत नैराश्याने ग्रासलेले लोक परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. याचे कारण शोधायचे झाले तर लोक स्वमग्न होत आहेत. आपल्या विषयात अडकून राहिलो कि आपल्याला आपले प्रश्न मोठे वाटतात आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. दर दिवशी नवीन आव्हाने, नवीन प्रश्न समोर येणारच आहेत, मात्र प्रश्नांनी समस्यांनी खचून न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला तर आपणही आनंदी होऊ शकतो. म्हणजेच काय तर राग, दुःख, त्रास आपोआप येऊन आपल्याला चिकटणार आहेच, पण त्यातून आनंद आपल्याला जाणीवपूर्वक निवडावा लागेल.

…कुठल्याही संकटाचा कमी जास्त प्रकोप हा आपल्याला वाटणा-या भितीशी संलग्न असतो.नुकत्याच आलेल्या संकटाच्या लाटेनं हे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करुन दिली.ह्या भितीचा उगम हा काळजी मधून होतो.काळजीचा अतिरेक झाला की त्याची जागा भिती घेऊ लागते आणि भीतीची का एकदा मनावर पकड बसली की संकटाचा उद्रेक सुरू होतो.

कुठलही नवीन संकट सामोरं येऊन उभं ठाकलं की त्याबद्दलची भिती मनात घर करुन बसते,नव्हे अगदी ठाणच मांडून बसते.त्या संकटाची तीव्रता ही परिस्थिती पेक्षाही आपल्या मनाच्या अवस्थेतील काळजी,भीती ह्यांनी वाढते.

पण ह्या मनाने लाऊन घेतलेल्या भितीलाही शेवटी कुठेतरी मर्यादा ही असतेच.कालांतराने ही भितीही आंगवळणी पडल्यासारखी मानगुटीवर चढूनच बसते.पण नंतर एकवेळ अशी अवस्था येते की ह्या काळजी,भिती ची कमाल मर्यादा ओल्यांडल्या जाते आणि मग त्या क्षणापासून त्यातील हवाच निघून जाते.मनात निर्माण झालेली भिती हीच परिस्थिती बिघडवण्यास जास्त कारणीभूत असते.नोकरी घरकाम, वाचन लेखन वा तत्सम आपल्या आवडत्या कला ह्या सारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं तर मग परिस्थिती चुटकीसरशी सकारात्मक होते.

कदाचित काही वेळी परिस्थिती फारशी बदलली जरी नसली तरीही स्वतः मधील बदलांमुळे ह्या संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतं हे नक्की. त्यामुळे सभोवताली निरभ्र आकाश आणि घेतलेला मोकळा श्वास सुखावू लागतो.काळजी जरुर घ्यावी पण काळजी करीत बसू नये हे मात्र कोरोनानेच शिकविले

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments