सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ स्त्री जन्मा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
जन्म जरी, कष्टप्रद
आई हसे, आरामात
रम्य तो काळ सुखाचा
शैशव लाडाकोडात
बालपणी हौस भारी
नव्याची ती नवलाई
तारुण्यात स्वप्ने, जरी
लग्नाची करिती घाई
उपवर ती झेलते
आधी श्रीमंती नकार
होकार मिळे तेव्हाच
विवाह होई साकार.
संसारात हरवली
आराम तो कुठला
संपले ना समस्यांचे
डोंगर, घाम फुटला.
आराम हराम सखे
वाक्य मनी ठसलेले
वार्धक्यात कळते गं
गणित ते चुकलेले
आपले ना कुणी इथे
आपण मात्र सर्वांचे
कोडे कधी ना सुटले
पावन या स्त्री जन्माचे
बदलल्या त्या भूमिका
आराम कुठे जीवाला
रोजच्या बहुगर्दीत
आठवू कधी देवाला
घेईन आराम स्वर्गी
देवा, तूच करी लाड
उरते काम अजूनी
संपविण्या पुन्हा धाड.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
७/३/२०२३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈