श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
कशाले काय म्हनू नये…
अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…
बिना कपाशीनं ऊले
त्याले बोंड म्हनू नये…..
हरिनाम हि ना बोले
त्याले तोंड म्हनू नये……
नाही वाऱ्याने हालंल
त्याले पान म्हनू नये…
असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.
पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)
आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो. आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.
आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.
नाही केले अपडेट…..
त्याला स्टेटस् म्हणू नये..
नाही बदलले चित्र…..
त्याला डी.पी. म्हणू नये.
नाही आला मेसेज……
त्याला गृप म्हणू नये.
नाही काढले फोटो…….
त्याला सोहळा म्हणू नये.
ज्याने केले नाही फॉरवर्ड……
त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.
जो जागेवरच थांबला…….
त्याला नेट म्हणू नये.
जो वेळेवर संपला…..
त्याला नेटपॅक म्हणू नये.
ज्याने नाही झाला संपर्क…….
त्याला रेंज म्हणू नये.
ज्याने दाखविला नाही रस्ता…….
त्याला मॅप म्हणू नये.
जी लवकर डिस्चार्ज झाली……
तिला बॅटरी म्हणू नये.
ज्याचे दिले नाही उत्तर……..
त्याला गुगल म्हणू नये.
जी भरते लवकर……
त्याला मेमरी म्हणू नये.
ज्यात नाही नवे ॲप……
त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….
त्याला मोबाईल म्हणू नये.
शेवटी तर असे म्हणावे लागेल की……
ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..
त्याला माणूस म्हणून नये.
जिथे नाही वाय फाय……..
त्याला घर म्हणू नये.
कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.
सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈